Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

विशेष: वाचा! कोरोनामुळे बंद असलेल्या न्यायालयाच्या एका ज्येष्ठ वकिलाचे मनोगत

न्यायदानाचे कारखाने बहुतांशी बंदच !
पलीकडे पाहण्याची दुर्मिळ संधी !
रचनात्मक दृष्टिकोन असायलाच हवा !

आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी, आपले हक्क प्राप्त करण्यासाठी, गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी, प्रतिपक्षाला नामोहरम करण्यासाठी, आपलंच खरे हे सिद्ध करण्यासाठी आणि अशा विविध कारणांसाठी सर्वसामान्यांनी दाखल केलेली अनेक प्रकरणे सर्वच न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. मुंगीच्या पावलाने का होईना हि प्रकरणे निकालात निघत असताना कोविड -१९ च्या प्रादुर्भावाने हे न्यायाचे कारखाने बहुतांशी बंदच पडले आहेत. दूरचित्रसंवाद सारख्या अत्याधुनिक माध्यमातून न्यायालयाचे कामकाज चालविण्याचे प्रयत्न अत्यंत तोकडे, निष्प्रभ आणि ठराविक पक्षकारांनाच परवडणारे आहेत. उच्चभ्रूवर्गातून सर्वोच्चपदी पोहोचलेल्या आणि हस्तिदंती मनोऱ्यातून न्यायदान करणाऱ्या व्यक्तींना सर्वसामान्यांच्या प्रकरणांची गंभीरता आणि भीषणता समजणे काहीसे कठीण आहे. वृक्षाखाली बसून अथवा चावडीमध्ये न्याय देणाऱ्या पंचमंडळींचे स्मरण त्यांना करून द्यावेसे वाटते. कोविडच्या या संकटात उन्हाळ्याची सुट्टी रद्द केल्याचे वर्तवून नेहमीप्रमाणे काम चालू नसतांनाही न्यायालयाचे दरवाजे उघडे असल्याचा मानभावीपणा न्यायसंस्था करीत आहेत, हि लाजिरवाणी गोष्ट आहे. सारेचजण आपापल्या हिताची आणि अर्थार्जनाची काळजी घेत आहेत. कोणालाही दोष देता येत नाही.

गेले दोन महिन्याहून अधिक काळ न्यायालयातील ते अभूतपूर्व क्षण पाहावयास मिळत नाहीत. वकिलांबरोबर पक्षकारांच्या भेटी-गाठी, त्यांना दाखविण्यात येणारी आशा, प्रकरणांत विशेष दम नसला तरी पक्षकाराचा कज्जेबाजीचा आग्रह, अन्याय दूर करूच असा भरोसा, प्रतिपक्षाला कोर्टात खेचाच यासाठी तगादा, कागदपत्रांचे जंजाळ, प्रथम फी पदरात पडून घेण्यासाठी वकिलांच्या वेगवेगळ्या पद्धती, न्यायालयातील कर्मचारीवृंदाशी संधान, त्याचबरोबर भरपूर अभ्यास, प्रकरण (खटला) न्यायालयासमोर सुनावणीस आणण्यासाठी अथवा पुढे ढकलण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न, हरकती दूर करण्यासाठी आटापिटा , केवळ मेंशन करून तारीख मिळविण्यासाठी प्रचंड रांगा आणि गयावया, अखेर प्रकरण सुनावणीस आल्यानंतर आणि सुदैवाने प्रतिपक्षाचा वकील हजर झाला तर न्यायालयासमोर होणारे साक्षीपुरावे, कधी अभ्यासपूर्ण तर कधी व्यावहारिक युक्तिवाद आणि दीर्घ काळाने प्राप्त होणारा न्यायालयाचा आदेश, ज्याला न्यायदान म्हणून संबोधले जाते या साऱ्या प्रक्रिया एखाद्या कारखान्याप्रमाणेच असतात. या व्यवसायात अकुशल, निमकुशल, कुशल आणि अतिकुशल व्यक्तींचा द्रुश्य-अद्रुष्य स्वरूपात सहभाग असतो. म्हणूनच अगदी उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्याही बदल्या दुसऱ्या राज्यात बिनबोभाटपणे आणि कारणे जाहीर न करता होत असतात. असो, न्यायालयाचा आदेश म्हणजे न्याय. असा आदेश कधी आपल्या पक्षकारांच्या बाजूने तर कधी विरुद्ध. अशा आदेशाने अथवा न्यायनिर्णयाने अशिलाचे समाधान झाले नाही तर पुढील प्रक्रिया सुरूच राहते. असंतुष्टता, भांडखोरपणा, गुन्हेगारी वृत्ती, अहंकार, सूडबुद्धी असे घटक तर अशा कारखान्यांचा कच्चा माल आणि वकीलवर्गाचा मुख्य आधार. आपल्या समोरील दाव्याला कायद्याचा मुलामा देऊन पक्षकाराबाबोबर आपलेही हित साधण्याचा वकिलांचा अभ्यासपूर्ण प्रयत्न असतो. त्यात काही वावगे नाही. कायद्यामधील तरतुदिचा समोरील तथ्ये आणि परिस्थितीनुसार निकाल देणाऱ्या न्यायाधीश महाराजांची विचारसरणी आणि दृष्टी कशी असेल याचाही अभ्यास वकीलवर्गाला आणि पक्षकाराला करावा लागतो. केवळ कायदा समजणे महत्वाचे नाही तर न्यायाधीश समजणे महत्वाचे असते , असे बोलले जाते. असो, ज्याला थोर आणि प्रतिष्ठित व्यवसाय समजले जाते, त्या माझ्याच वकिली व्यवसायाविषयी एव्हढे उघडपणे लिहिणे बरे नव्हे. नकळतपणे माझेच वस्त्रहरण होईल. प्रत्येक व्यवसायात असेच चालते असे म्हणून ठिगळ लावण्याचा प्रयत्न न करता डोळ्यावर पांघरुण घेणे योग्य, चीड आली तरीहि.

या प्रदीर्घ आणि अनिश्चित टाळेबंदी नव्हे ‘टाळेखाली- खिसाखाली’ मध्ये शांतपणे बसण्याची आणि विचार करण्याची संधी मिळाली . दिस जातील, दिस येतील. पुन्हा ‘माय लॉर्ड’ चे आवाज घुमू लागतील. धापा टाकीत आणि काळ्या रंगाचे डगले सांभाळीत वकील मंडळी पळू लागतील. शीरा ताणीत युक्तिवाद करतील. पदरी पडेल त्याचा स्वीकार करतील आणि न्यायदान व्यवस्था अखंडपणे चालू राहील या उमेदीने मी पुन्हा एकदा कायद्याची पुस्तके चाळली. आपल्याकडे असलेल्या प्रकरणांची अधिक माहिती संकलित केली. ही प्रकरणे चालवितांना कोणत्या अधिनियमांचा आणि मार्गदर्शक निर्णयांचा आधार लाभेल याची जंत्री केली. वेबिनार पहिले आणि ऐकले. कमतरता लक्षांत घेतल्या. सहकाऱ्यांना मदत केली . माझे भूतलावरील अस्तित्व जाणून घेण्यासाठी आणि न्यायालये केव्हा सुरु होतील हे विचारण्यासाठी पक्षकार व्हाट्सअपवर मेसेज पाठवितात. त्वरित उत्तर देऊन पक्षकारांच्या आशा-अपेक्षा जीवंत ठेवतो. प्रत्यक्षात नाही म्हणून स्वप्नामध्ये ‘माय लॉर्ड’ चा धावा करीत बरळत असल्याची तक्रार कानी पडते. व्यवसायाव्यतिरिक्त पुस्तकांचे वाचन केले. पुन्हा ‘पूल’कीत झालो. ‘कऱ्हेच्या पाण्यात ‘डुंबलो, ‘रायगड’ वर जागलो, खांडेकरांच्या दुनियेत विसावलो. फडकेंच्या शृंगारिक लेखनात रमलो. काव्य प्रसवलो. नव्या-जुन्या मित्रांशी संवाद साधला. आरोग्यविषयक येणारे सल्ले ऐकतो, वाचतो आणि पाळतोही. दूरचित्रवाणीवरील करमणुकीच्या कार्यक्रमात रंगून जातो. कोर्टाच्या कँटीन मधील पदार्थांची चव विसरलो. घरपण अनुभवले. आपल्या गरजा किती कमी असू शकतात ही समजले. शेवटी, व्यवसायाशी आपली बांधिलकी असतेच. पक्षकारांचा विश्वास जपायलाच हवा. अवतीभवतीची परिस्थिती भीषण आहे. बदल होईल ही सुद्धा खात्री आहे. या कोरोनाच्या विरुद्ध आता जनहित याचिका ठोकलीच पाहिजे, असाही सल्ला भाबडेपणाने दिला जात आहे. प्रज्ञा, शील, करूणा आणि मैत्रीच्या मानवतावादी मूल्यांना अधिकाधिक अंगीकृत करून नवीन जीवन पद्धतीला सामोरे गेले पाहिजे. या संक्रमण अवस्थेत आरोग्य सेवा पुरविणाऱ्या , कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या आणि अन्य क्षेत्रातील ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि ज्या व्यक्ती आजही प्राणपणाने या कोरोना युद्धाशी लढत आहेत त्यांचे विस्मरण केव्हाही होणार नाही. अत्यावश्यक सेवा सुरु ठेवतांना त्यांनी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी बाळगली. नव्या युगाचे ते योद्धे आणि निर्माते आहेत. त्यांना शतशः प्रणाम! होणारे बदल हे निश्चितच उल्लेखनीय आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारे असतील. न्यायदान प्रक्रियेमध्ये फार मोठे बदल संभवतील. व्यवसायात टिकण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील. जुन्या पद्धतींना पूर्ण विराम मिळेल. शासनाला सर्वंकष धोरणे राबवावी लागतील. या सर्व कोलाहलात माणुसकीला आणि सद्वर्तनाला जपावे लागेल. यासाठी लागणारी अखंड ऊर्जा आपल्याला रचनात्मक विचारसरणीमधूनच मिळणार आहे. आपण सारे मिळून या आव्हानाला सामोरे जाऊ आणि आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपापल्या परीने कसोशीने प्रयत्न करण्याचे कर्तव्य पार पाडू असे आशादायक चित्र निश्चितच निर्माण झाले आहे .

ऍड. जयप्रकाश सावंत, अभिवक्ता
मुंबई उच्च न्यायालय,

(नवी मुंबई)

Disclaimer: प्रस्तुत लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं असून महाराष्ट्र वार्ता फक्त माध्यम आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *