राज्यातील २३ टक्के शाळांचे प्रशासन, शिक्षक भरती आणि सेवाशर्तींसाठी नवी कायदेशीर चौकट; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेलाही प्राधान्य
मुंबई, दि. २६ : राज्यातील खासगी अनुदानित शाळांचे कामकाज, व्यवस्थापन आणि कर्मचारीविषयक बाबींवर अधिक स्पष्ट नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. ‘महाराष्ट्र खासगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, २०२६’च्या प्रारूपाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील एकूण शाळांपैकी सुमारे २३ टक्के शाळा खासगी अनुदानित आहेत. या शाळांमध्ये राज्यातील ४७ टक्के विद्यार्थी शिक्षण घेत असून, एकूण शिक्षकांपैकी ३७ टक्के शिक्षक या संस्थांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे या शाळांचे प्रशासन, शैक्षणिक गुणवत्ता आणि कर्मचारीविषयक प्रश्न यांच्यासाठी एकसंध नियमावली असण्याची गरज व्यक्त होत होती.
विद्यमान कायद्यांतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न
सध्या खासगी अनुदानित शाळांशी संबंधित बाबींचे नियमन महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ आणि नियमावली १९८१, माध्यमिक शाळा संहिता तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ यांच्या आधारे केले जाते. मात्र, या तरतुदींच्या अंमलबजावणीत काही मर्यादा आणि उणिवा जाणवत असल्याने स्वतंत्र व व्यापक कायदेशीर चौकट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रस्तावित विधेयकात सुमारे २० प्रकरणांचा समावेश आहे. शाळांच्या प्रशासनावर शासनाचे नियंत्रण, शाळेचा दर्जा वाढवणे, अतिरिक्त तुकडी सुरू करण्यास मान्यता, शाळा समितीची रचना आणि अल्पसंख्याक अनुदानित शाळांसाठी स्वतंत्र तरतुदी यांचा त्यात समावेश असेल.
शाळा बंद करणे, हस्तांतरण आणि व्यवस्थापनातील वादांवरही नियम
शाळा, तुकडी किंवा माध्यम बंद करण्याची प्रक्रिया तसेच खासगी शाळांचे परस्पर संमतीने हस्तांतरण याबाबतही विधेयकात तरतुदी प्रस्तावित आहेत. व्यवस्थापनातील वादामुळे प्रभावित झालेल्या शाळांमधील शिक्षक भरतीसाठी विशेष व्यवस्था करण्याचाही विचार करण्यात आला आहे.
शाळेच्या नियमित वेळेनंतर मैदान, इमारत आणि इतर सुविधांचा वापर कशा पद्धतीने करता येईल, याबाबतही नियम निश्चित केले जाणार आहेत. समान स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये वेगवेगळे निर्णय होऊ नयेत, यासाठी एकसमान कार्यपद्धती लागू करण्याची तरतूद प्रस्तावित आहे.
शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती आणि तक्रार निवारणावर भर
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती, त्यांच्या सेवाशर्ती, शाळांना दिले जाणारे अनुदान आणि पदभरतीची प्रक्रिया या महत्त्वाच्या विषयांनाही विधेयकात स्थान देण्यात आले आहे. शाळा न्यायाधिकरण आणि तक्रार निवारण समितीची तरतूद करून कर्मचारी तसेच संबंधित घटकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव आहे.
याशिवाय दंडात्मक तरतुदी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई, लेखे व लेखापरीक्षण, अपील आणि पुनर्विलोकन यांसारख्या बाबींचाही समावेश करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य
खासगी अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शिक्षणाचा दर्जा आणि प्रशासनाची जबाबदारी निश्चित करणे हे प्रस्तावित कायद्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींचे संरक्षण, पारदर्शक आणि गुणवत्ताधारित भरती तसेच शाळांच्या कामकाजात उत्तरदायित्व आणण्यावरही भर दिला जाणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० यांमध्ये गुणवत्तापूर्ण व पारदर्शक शिक्षणव्यवस्थेवर भर देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित विधेयकाद्वारे खासगी अनुदानित शाळांच्या नियमनासाठी स्वतंत्र कायदेशीर व्यवस्था उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने विधेयकाच्या प्रारूपाला पुढील विधिमंडळीन प्रक्रियेसाठी मार्ग खुला झाला आहे. या कायद्याच्या अंतिम स्वरूपानंतर राज्यातील खासगी अनुदानित शाळांचे प्रशासन आणि कर्मचारीविषयक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत.

