मुंबई पोलीस आयुक्तालयातील शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण; शहीद जवानांच्या कुटुंबीयांचीही घेतली भेट
मुंबई, दि. २६ : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण होत असताना, या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना प्राण गमावलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा दलातील जवानांच्या शौर्याचे स्मरण करण्यात आले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्तालयातील शहीद स्मारकाला भेट देत हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. दहशतवादी हल्ल्याच्या वेळी देश आणि मुंबईच्या सुरक्षेसाठी लढताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते. गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस व प्रशासकीय अधिकारीही या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्या दुःखात सहभागी होत सहवेदना व्यक्त केल्या. २६/११ च्या हल्ल्यातील शहीद जवानांचे बलिदान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेला त्याग यांचे स्मरण या अभिवादन कार्यक्रमातून करण्यात आले.

