Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नेतोजी साकारणाऱ्या कश्यप परुळेकर ने अल्पावधीतच जिंकली प्रेक्षकांची मनं !

असा राहिला प्रतिशिवाजी नेतोजी पालकरांची भूमिका साकारणाऱ्या कश्यप परुळेकरचा मागील काही वर्षांतला प्रवास

“स्वराज्य धर्म रक्षणार्थ” अशी आरोळी उठल्या सारखा आवाज होतो, सफेद घोड्यावर, मराठा मावळ्याच्या पोषाखात एक मावळा येतांना दिसतो. इकडे खुद्द महाराज ह्याच्याच येण्याची वाट पाहत आहेत आणि इकडे घोडा थांबतो. तो मावळा घोड्यालाही महाराजांच्याच दरबाराबाहेर थांबायचय हे व्यवस्थित समजतं म्हणून त्याचं कौतूक करण्यासाठी त्याची पाठ थोपाटतो. दरबाराकडे अभिमानानं पाहतो. खाली उतरतो आणि दरबारात जातो. तो मावळा येताच महाराजांच वाट पाहाणं संपतं. ” आलात नेतोची काका?” असं महाराज विचारतात आणि आपल्याला दिसतं की तो मावळा दुसरा तिसरा कोणी नसून ज्यांना प्रतिशिवाजी म्हटलं जातं असे नेतोजी पालकर आहेत. नेतोजींना पाहताच महाराज बाकी दरबाऱ्यांकडे सुचक पाहतात. दरबारी आदेश ओळखतात आणि महाराजांना मुजरा घालत दरबारात फक्तं महाराज आणि नेतोजीच राहतील ह्याची खात्री करतात. दरबारी जायला लागल्यावर नेतोजींना शंका येते, ते महाराजांकडे पाहतात आणि त्यांना कळून चुकतं की एक नवी योजना महाराजांच्या डोक्यात शिजतेय आणि त्यासाठीच आपल्याला सांगावा धाडलाय. पण महाराजांच्या डोळ्यात त्यांना वेगळीच चिंता दिसते. ते विचारतात ” महाराज, उरी चिंता कसली? फकस्त सांगा, जिवाची बाजी लावू आम्ही’ असं म्हणत छाती ठोकतात.. महाराज जरा थांबून थेट प्रश्न विचारतात, “शत्रूच्या गोटात सामील व्हाल?” “स्वराज्यासाठी आमच्या विरूध्द लढू शकाल?” अख्खा जन्म स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्या दोन गोष्टींसाठी वाहून घेण्याची शपथ घेतलेल्या नतोजींना हा प्रश्नं म्हणजे “गद्दारी” करायला लावण्यासारखा किंवा “जित्तपणी मरण पत्करायला” लावण्यासारखा वाटतो. त्यांचे डोळे आणि कान आता जे एकलं पाहीलं त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यांचा हात “गद्दारी’ च्या नुसत्या विचारानच कंबरेशी असलेल्या समशेरीवर जातो.

पण महाराज सयंमानं त्यांच्या खांद्यावर हात ठेवत सांगतात ” स्वराज्यासाठी” आणि हा शब्द पुन्हा एकताच नेतोजींना थेट रायरेश्वरावरची शपथ आठवते.. आणि ते महाराजांना सांगतात ” स्वराज्यासाठी, ते बी मंजुर हाय आमास्नी’ हेच उत्तर नेतोजींकडून महाराजांना अपेक्षित होतं आणि महाराज आता दुर चाललेल्या ह्या सच्चा मावळ्याला मिठी मारतात. दोघांचा ही उर भरुन येतो. आणि नेतोजी लागलीच मुजरा करत नव्या योजनेवर अम्मल करायला महाराजांना मुजरा घालत डोळ्यात पाणी साठवत निरोप घेतात.

जुनमधे स्टार प्रवाहच्या इतर मालिका पाहत असतांना आणि फेसबुक पेजवर हा प्रोमो मी पाहतो आणि उत्सुकता वाढते. ह्या मालिकेबद्द्ल आणि सोबतच नेतोजींच्या मनातली प्रत्येक भावना इतक्या समर्थपणे दाखवणाऱ्या ह्या अभिनेत्याबद्दल सुध्दा. चेहरा, आवाज सगळं नवं वाटतय. म्हणून मी मग गुगल काकांना जाउन विचारतो की “कोण करतय नेतोजी पालकरांची भूमिका जय भवानी जय शिवाजी ह्या स्टार प्रवाहच्या मालिकेत?” ( हे सगळं अर्थातच इंग्रजीत विचारतो, गुगल काकांनी मराठीची सोय केलेली असतांना) मग काका मला चार पाच फोटो दाखवतात आणि एक नाव सांगतात. ते म्हणजे ” कश्यप परुळेकर”. नाव ऐकून धक्का बसतो आणि फोटो पाहून तर आणखीनच. कारण हा चिकना हिरो आहे आणि नेतोजी तर उन्हा तान्हात पाऊस रानात स्वराज्यासाठी झटणारा मावळा. ह्याने नेतोजींची भूमिका केलीय? त्यात प्रोमोतच एवढा लक्षात राहण्यासारखा अभिनय? कोण आहे कोण हा? मग गुगल काकांना बोट लावत स्क्रोल केलं की ते अजून काही माहीती सांगतात. आणि ती पाहून सगळेच “सुखद” धक्के मिळतात.

मग ती माहीती घेतल्यावर कळतं की हा ” कश्यप परुळेकर” नावाचा पठ्ठ्या काही नवा किंवा आजकाल आलेला अभिनेता नाही. स्टार प्रवाह आणि तो हे दोघे मनोरंजन क्षेत्रासाठी नवे असतांना सोबतच पहील्यांदा लोकांसमोर आले ते “मन उधाण वाऱ्याचे” ही महेश कोठारेंची निर्मिती असलेली मालिका घेऊन. चॉकलेट बॉय ची चार्मिंग भूमिका होती ती, जो प्रेमाच्या त्रिकोणात फसतो. तेव्हाच तो घराघरात पोहोचला. मालिका मस्त चालली आणि कश्यप तरुणींचा आवडता टीव्ही वरचा चेहरा बनला. नंतर वेळेत फार न ताणता मालिका बंद झाली. नंतर तो टिव्ही च्या प्रेक्षकांना मधल्या काळात दिसला नाही. आणि लोकांचा एक नियम आहे. ” जो दिखता है, वो ही बिकता है” त्यामुळे मधल्या काळात टिव्ही वर अनेक हिरो आले आणि काही टिकले. कश्यप परुळेकर मात्र कळत नकळत मिडीया आणि सोशल मिडीया ह्या पासून दुर राहीला. ह्याचं कारण त्याचा स्वभाव मुळातच मितभाषी. पण कामं करण्यासाठीची त्याची धडपड चालूच होती. काही मराठी सिनेमांमधे कामं मिळाली. त्यातल्या काही कामांनी त्याला समाधान मिळालं आणि कौतूकही. त्यातला एक सिनेमा म्हणजे ” तप्तपदी”. सचिन नागरगोजेंच दिग्दर्शन असलेला हा सिनेमा रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर बेतलेला होता. ज्यात श्रृति मराठे आणि वीणा जामकर ह्या अभिनेत्रींसोबत कश्यप प्रमुख भुमिकेत होता. हा सिनेमा सगळ्याच अंगांनी उत्तम होता. ह्या सिनेमाची खरं तर म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही.

बाकी ही काही सिनेमे कश्यप ने केले पण त्यात काही चुकीच्या लोकांना निवडण्याची चुक माझ्याकडून झाली असं तो म्हणतो आणि त्यासाठी इतर कोणालाही दोष देणं तो टाळतो. पण ह्याचा परीणाम असा की वर्षभर काम करुनही ज्या गोष्टीसाठी एक अभिनेता उतावीळ असतो ती ओळख होत नव्हती कारण काम करुनही चित्रपट प्रदर्शित होत नव्हते. अशा काळाला इंडस्ट्रीच्या भाषेत “बॅड पॅच” असं म्हणतात पण कश्यपच्या भाषेत त्याला शिकण्याचा काळ म्हणतात. तो त्याला बॅड पॅच म्हणतच नाही. हा संयम त्याच्याकडे असण्याचं कारण त्याने ज्या दिवशी अभिनेता व्हायचं ठरवलं त्या दिवसापासून त्याच्या आई वडीलांनी त्याच्या ह्या स्वप्नावर दाखवलेला विश्वास आणि दिलेलं पाठबळ. नाही तर मुलगा पंचवीशी ओलांडायला लागला की मध्यमवर्गीय घरात त्याच्यावर बापाने वाहीलेलं संसाराचं ओझं थोपवण्याची आपल्याकडे प्रथा आहे.

परुळेकर कुटंबाने ती प्रथा न पाळता मुलावर कुठलाही ताण राहणार नाही ह्याची काळजी घेतली. मग पुन्हा ह्या दरम्यान अनेक दिग्दर्शक आणि निर्माते भेटले पण काही विशेष घडत नव्हतं. आणि मग स्टार प्रवाह ने पुन्हा एका मालिकेसाठी त्याला विचारणा केली. जुने संबध आणि भूमिकेचा वेगेळेपणा लक्षात घेऊन त्याने “छत्रीवालीतला” मुख्य व्हिलन साकारला… आणि ह्याच वेळी एक मोठी ऑफर त्याच्याकडे आली. रोहन मापुस्कर हे आशुतोष गोवारीकर ह्यांच्या ” पानिपत” साठी कास्टिंग करत होते. त्यातल्या रघूनाथरावांच्या भुमिकेसाठी कश्यपला बोलवण्यात आलं. ऑडीशन आणि लुक टेस्ट घेण्यात आली. रघुनाथरावांची भूमिका कश्यप करणार हे पक्क झालं. पण आजवर त्याने केलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी होती. ही ऐतिहासिक भूमिका होती आणि त्यात रघुनाथराव योद्धा होते. त्यामुळे तलवारबाजी, घोडेस्वारी सगळ्यांचच प्रशिक्षण घ्यावं लागलं. ही तर झाली भूमिकेच्या बाह्य अंगाची तयारी, भूमिकेच्या अंतरंगाची तयारी करण्यासाठी तो तिच्यात असणाऱ्या मानवी भावनांचा अभ्यास करतो.

“पानिपत” सिनेमा पाहीला तर त्याची मेहनत फळाला आलेली दिसते. सदाशिवरावांविषयी असलेला मत्सर, त्यांच्यावर केलेली कुरघोडी आणि वागण्या बोलण्यातला पेशवाई थाट आणि एक योध्याची नजर हे सगळं त्याने प्रचंड सहजतेने निभावलय. ते तितकं सहज नक्कीच नव्हतं. त्याला मिळालेल्या स्क्रिन टाईममधे तो त्याची छाप पाडण्यास यशस्वी होतो आणि त्याचा अभिनय पाहून खुश झालेले आशुतोष गोवारीकर जेव्हा त्याला म्हणतात की ” तू आधी का नाही भेटलास?” तेव्हा त्याला त्याचं फळ मिळालेलं असतं. आणि हेच “जय भवानी जय शिवाजी’ ह्या मालिकेच्या बाबतीतही खरं आहे. ही ही एतिहासिक भूमिका, ओळखीचं नाव. महाराजांचा जवळचा मावळा आणि महाराजांसारखाच जनतेचा जाणता सरदार. आजवर प्रदर्शित झालेल्या ह्या मालिकेच्या भागात नेतोजींच्या भुमिकेने प्रेक्षकांची मनं एवढी जिंकली की सहा वर्षांची मुलं नेतोजींच्या नकला करायला लागली. आणि मोठ्यांची मनं जिंकणं सोपं असतं. लहानग्यांवर नेतोजीं सारख्या भुमिकेची छाप पडणं म्हणजे ते त्या अभिनेत्याचं आणि ती कलाकृती निर्माण करण्याऱ्या प्रत्येकाचं यश आहे.

आणि हे सगळं सहज शक्य होत नाही. एकांकिका, नाटक करत, मेहनत करुनही अपयश वाट्याला आलं की त्याच्या पायऱ्या करत, फसवलं गेल्याच्या भावना मनात बाळगत, लॉकडाउन असतांना स्वतःच्या अभिनय क्षमता स्वतःच तपासत आणि मार्ग काढत हा प्रवास झालाय. त्यात सहकार्य करणारं कुटुंब, पत्नी माधवी आणि मुलगी इरा त्याच्या ह्या प्रवासात महत्वाच्या भूमिका निभावतात. पण संयम कदाचित त्याला त्याच्या वडीलांकडून मिळाला असावा. त्याचे वडील शिवाजी परुळेकर हे उत्तम चित्रकार आणि मूर्तिकार आहेत. एका मुर्तिवर आणि चित्रावर ते चोख दिसत नाही तोवर मेहनत घेणं हा त्यांचा स्वाभाव. तोच कश्यपकडे आहे. जी भूमिका करायचीय तीचे बारकावे सापडेपर्यंत मेहनत तो करत राहतो आणि जर तुम्ही कलाकार असाल तर तुम्ही कधीच ह्याबाबतीत समाधानी नसताच. कश्यपही नाहीये. त्याला आणखी वेगळ्या पध्दतीच्या भूमिका करायच्यात. फक्तं कुठल्या भूमिका करायच्या हे तो आता स्वतः ठरवत नाही. तो म्हणतो की मी माझं काम शंभर टक्के मेहनतीनं करतो. त्याचं काम पाहून त्याच्याकडे येणाऱ्या भूमिका तो त्यांचा वेगळेपणा पाहून निवडतो आणि म्हणूनच तो म्हणतो की मार्वल चा एखादा सुपरहिरो करण्याची माझी इच्छा आहे. कारण तो एक अतिशय वेगळा अनुभव असेल. जवळ जवळ सगळच आभासी असणारं आणि तरीही त्यावर विश्वास ठेवायला लावणारं अवकाश म्हणजे सुपरहीरोंचे सिनेमे. कश्यप म्हणतो तसं न ठरवता त्याच्या वाट्याला सुपरहिरोची भूमिका यावी ही एक प्रेक्षक म्हणून आपलीही इच्छा आहे.

मन उधाण वाऱ्याचे मधला निखिल, तप्तपदी मधे गर्व असलेला पण नंतर पत्नीच्या अंधळेपणाचा दोष स्वतःला देणारा डॉक्टर माधव, छत्रीवाली मधला व्हिलन आणि पानिपत मधला रघूनाथराव करत आता तो नेतोजी पालकर साकारतोय. ह्यात कुठे तो प्रेमाच्या त्रिकोणात अडकलाय, कुठे अगदी बोल्ड सिन दिलेत, तर कुठे अगदीच कपटी मित्र झालाय तर कुठे सत्तेसाठी आणि मानसन्मानासाठी कूरघोडी केल्यात तर कुठे एका शपथेसाठी आयुष्य वाहून घेतलं.

लहान असतांना त्याने “अप्पु राजा” हा सिनेमा थिएटरला पाहिला आणि कमल हसनच्या तिन वेगवेगळ्या भूमिका पाहून तो वेडाच झाला. एक माणूस तिन भूमिका त्याही इतक्या वेगळेपणाने कसं काय करु शकतो. आपण ही हे करायचं अस म्हणत त्यानं अभिनयासाठी वाहून घेण्याची शपथ घेतली आणि तो ती पाळतोय. हा नेतोजी आणि त्याच्यातला समान धागा. अशा अभिनेत्याला मनोरंजन क्षेत्राच्या भाषेत “लंबी रेस का घोडा म्हणतात” कश्यप ची घोडदौड अशीच यशा कडे चालत राहणार आणि मराठ्यांनी पानिपत जिंकलं नसलं तरी अटकेपार झेंडा नेला होता तसा कश्यपच्या यशाचा झेंडा अटकेपार हॉलिवूड पर्यंत जाणार यात काही शंका नाही.

– प्रभात गांगुर्डे

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *