Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“काळ” या भयपटातून मराठी चित्रपट सृष्टीत दमदार पदार्पण करणाऱ्या नाशिककर अभिनेता ‘संकेत विश्वासराव’चा प्रेरणादायी प्रवास वाचा

“काळ” या भयपटातून मराठी चित्रपट सृष्टीत दमदार पदार्पण करणाऱ्या नाशिककर अभिनेता ‘संकेत विश्वासराव’चा प्रेरणादायी प्रवास वाचा

नाटक, मालिका ते चित्रपट. नाशिकचा संकेत विश्वासराव झळकणार “काळ” या सिनेमात. किंवा “काळ” मधे झळकणाऱ्या संकेतच्या अभिनयाचा नाशिक ते मुंबई व्हाया पुणे प्रवास.

येत्या ३१ जानेवारीला “काळ” हा भयपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डी. संदीप ह्यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलंय. ह्या सिनेमाचा हटके जॉनर, त्याची भक्कम तांत्रिक बाजू, आणि लक्षवेधी म्हणजे हा रशियामधे रशियन भाषेत अनुवादित होऊन प्रदर्शित होणारा असा पहीला मराठी सिनेमा आहे हे सगळं तुम्ही आत्तापर्यंत अनेक वर्तमानपत्र, फेसबुक पेजेस वर वाचलंच असेल. हा सिनेमा बनवण्यासाठी डी. संदीप ह्यांनी घेतलेली मेहनतही तुम्ही वाचली असेल किंवा त्यांच्या मुलाखतींमधून ऐकलं असेल आणि नसेल एकलं अजून तर ऐका असा सल्ला मी ह्या क्षेत्रात स्वतःला दिग्दर्शक सिध्द करू पाहणाऱ्या तरुणांना देईन.
तर इथे माझा विषय ह्या सिनेमात महत्वाची भूमिका करणारा अभिनेता संकेत विश्वासराव आणि त्याच्या “काळ” चित्रपटा पर्यंतच्या प्रवासाबद्दल आहे. आता तुम्ही म्हणाल की का बुवा त्याच्याबद्दल लिहावं वाटलं? तर उत्तर साधं आहे की एखादा उमदा कलाकार आपल्यासमोर घडत असतांना त्यानं यश मिळवलं असतांना हा प्रवास सोपा नव्हता (तरी संकेत नं तो सोपा वाटावा इतक्या सहजतेने करायला सुरुवात केली आहे) हे सांगणं मला महत्वाचं वाटतं. ही अशीच कहाणी सिनेमातल्या सर्व कलाकारांची आहे. इथे मी संकेत विषयी लिहीतोय कारण त्याचा प्रवास मी जवळून पाहीलाय.

संकेत नाशिकला माझ्याच कॉलेजला, म्हणजे के.टी.एच. एम. कॉलेजच्या, ज्युनियर कॉलेजला होता. कला विभागातल्या एका रुम मधे आम्ही तेव्हा कॉलेजतर्फे सकाळ करंडकसाठी होणाऱ्या एकांकिकेसाठी ऑडीशन घेऊन कॉलेजमधील कलाकार शोधत होतो. त्यात संकेत आला होता. खरंतर फक्त मला अभिनयात रस आहे एवढं सांगायला आला होता. मी त्याला काय येतं ते करून दाखव म्हणालो तेव्हा त्याने चेहराच दिसणार नाही असा कुठलातरी एक ॲक्ट करून दाखवला आणि तो मला अगदी फ्लॅट वाटलेला. पण त्याच्यात अभिनय शिकण्याची जिद्द होती. त्या एकांकिकेचं पुढे काय झालं हे काही सांगाण्यात काही अर्थ नाही पण नंतर दुसऱ्या एका एकांकिकेसाठी संकेत माझ्या सतत संपर्कात होता आणि त्यातच त्याची प्रामाणिक इच्छा दिसून आली. नंतर त्याने वेगवेगळ्या गृप कडून नाशकात होणाऱ्या एकांकिका स्पर्धांसाठी भाग घेतले. त्यातून अभिनय शिकत गेला. नंतर त्याला पुण्यातल्या ललित कला अकादमी बद्दल माहीती मिळाली आणि त्याने थेट पुणे गाठलं. अभिनयाचं रितसर प्रशिक्षण घेतलं. नाशिकहून ललितला गेलेला संकेत आणि तिन वर्षांनंतर तिकडून पासआउट होऊन आलेला संकेत ह्यांच्यात व्यक्तीमत्वा पासून तर अभिनयापर्यंत जमिन अस्मानाचा फरक होता. संकेत संवेदनशील तर होताच पण त्याला आता प्रशिक्षित कलेची जोड मिळाली होती आणि त्यानंतर लगेच त्याने मुंबई गाठली. हा प्रवास लिहायला फार सोपा वाटतो… पण आयुष्याच्या २१ व्या वर्षात मध्यमवर्गातील मुलानं आपल्याला आवडते त्या गोष्टींसाठी असे एक एक निर्णय घेत जाणं आणि ते अंमलात आणण हे अवघड असतं.
मग मालिकेसाठी लिखाणात असिस्टंट पासून ते मालिकांमधे छोटे मोठे रोल करत त्याने मुंबईत आपलं “स्ट्रगल” जे म्हणतात ते सुरू केलं. ललितचा असल्याने अभिनयाचा सराव सतत रहावा आणि प्रत्यक्ष कलेशी जोडलेलं असावं म्हणून त्याने आणि त्याच्या ललितमधल्या मित्रांनी “मिरासदारी” नावाचा, द. मा. मिरासदारांच्या कथांचे एकपात्री नाट्यसादरीकरणाचा एक कल्पक प्रयोग सुरु केला. अजूनही त्याचे प्रयोग ते करतात. जो अगदी सोसायटी कंपाउंड, लग्न मंडप, कट्टा ते नाट्यगृह असा कुठेही सादर करता येण्यासारखा प्रयोग आहे. “बाळुमामा” “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” आणि आता “अग्निहोत्र २” या मालिकांमधुन त्याने महत्त्वाच्या भूमिका केलेल्या आहेत.

“काळ” हा सिनेमा त्याच्या वाटेला येणं हा निव्वळ योगायोग नाही. एका प्रयोगशील आणि व्यावहारीक दिग्दर्शकाने आपल्या ह्या सिनेमासाठी तितकीच प्रयोगशील अभिनेत्यांची आणि तंत्रज्ञांची टिम निवडली आहे. त्यात संकेत असणं हा योगायोग नक्कीच नाहीये. तसं तुम्हाला वाटत असेल तर तो योगायोग समजावा. कारण संकेत ने रितसर ऑडीशन देउन ही भूमिका मिळवली आहे. त्याचा अभिनय काय आहे आणि ” काळ” साठी तो दिग्दर्शकाला योग्य का वाटला हे तुम्हाला चित्रपट पाहील्यावर कळेलच. पण मित्र म्हणून एकतर त्याला मुख्य भुमिकेतला चित्रपट मिळाल्यामुळे मी खुष होतोच आणि त्यात दुधात साखर म्हणजे हा सिनेमा हटके आहे आणि त्या त्याच्या हटके जॉनरमुळे तो रशियात प्रदर्शित होणारा पाहीला मराठी सिनेमा आहे.
ह्या लेखन प्रपंचाचा आणखी एक उद्देश म्हणजे ह्या क्षेत्रात गांभीर्याने येऊ पाहणाऱ्या मुलांसाठी, संकेत, जो अजूनही धडपड करत ह्या क्षेत्रात काम करतोय ह्याचं एक उदाहरण देता यावं.. कारण जर डॉक्टर, इंजिनयर व्हायचं असेल तर तुम्ही शिक्षण घेता. मग अनुभव घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करता. पण अभिनयात त्या प्रशिक्षणाची गरज नाही असं बऱ्याच जणांना वाटतं. संकेत आणि त्याच्या सारख्या मुलांनी अभिनय हे क्षेत्र गांभीर्याने घेऊन नाटक करत आणि मग ललित मधून त्याचं शिक्षण घेत आपली कला रितसर शिकली. ह्या गोष्टींचा विचार इथे करीयर करतांना नक्की करावा. बाकी यश हे तुमच्या मेहनती पलीकडे नसतं हे “काळ” ३१ जानेवारीला पाहील्यावर कळेलच.

– प्रभात गांगुर्डे

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *