Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून भारतातील चिनी शेल कंपन्यांवर केली कारवाई

SFIO ने मुख्य सूत्रधाराला केली अटक

केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (उद्योग व्यवहार मंत्रालय) ८ सप्टेंबर २०२२ रोजी एकाच वेळी केलेल्या शोध आणि जप्तीच्या कारवाईनंतर, SFIO अर्थात गंभीर फसवणूक तपास कार्यालयाने काल डॉर्टसे नामक व्यक्तीला अटक केली आहे. हरियाणात गुरुग्राम इथल्या जिलियन हाँगकाँग लिमिटेड या कंपनीच्या  संपूर्ण मालकीची उपकंपनी, जिलियन कन्सल्टंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, बंगळुरू येथील फिनिन्टी प्रायव्हेट लिमिटेड आणि हैदराबाद मधील पूर्वीची सूचीबद्ध कंपनी ह्युसीस कन्सल्टींग लिमिटेड, या कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकून ही शोध मोहीम राबवण्यात आली.

डॉर्टसे हा जिलियन इंडिया लि.च्या कार्यकारी मंडळावर आहे आणि भारतात मोठ्या संख्येने चीनशी संबंधित असलेल्या शेल कंपन्या (बनावट कंपन्या) स्थापन करुन, त्यांच्या कार्यकारी मंडळावर, डमी(बनावट) संचालक नेमण्याच्या संपूर्ण जाळ्याचे प्रमुख सूत्रधार म्हणून त्याचे नाव स्पष्टपणे समोर आले आहे. आर.ओ.सी. अर्थात  कंपन्यांच्या रजिस्ट्रार (निबंधक) म्हणजेच नोंदणी अधिकाऱ्याकडे केलेल्या नोंदीनुसार, अटक करण्यात आलेला डॉर्टसेने, स्वतःला हिमाचल प्रदेशातील मंडी येथील रहिवासी असल्याचे दाखवले होते.

अनेक शेल कंपन्यांमध्ये डमी म्हणून काम करण्यासाठी जिलियन इंडिया लिमिटेडकडून डमी संचालकांना पैसे दिले जात असल्याचेही, आर.ओ.सी, दिल्ली अर्थात दिल्ली येथील कंपनी निबंधकांनी केलेल्या तपासातून मिळालेले पुरावे आणि त्याचवेळी राबवलेल्या शोध मोहिमेतून स्पष्टपणे समोर आले आहे. कंपनीचे सील्स आणि डमी संचालकांच्या डिजिटल स्वाक्षरीने भरलेली खोकी, घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहेत. भारतीय कर्मचारी, चिनी इन्स्टंट मेसेजिंग अॅपद्वारे या चिनी शेल कंपन्यांच्या संपर्कात होते. Husys Ltd. देखील Jilian India Ltd. च्या वतीने काम करत असल्याचे आढळून आले. Husys Ltd चा Jilian Hong Kong Ltd. सोबत करार असल्याचेही प्राथमिक तपासात उघड झाले आहे. देशाच्या आर्थिक सुरक्षिततेला बाधा पोहोचवू शकणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या आर्थिक गुन्ह्यांमध्ये या चिनी शेल कंपन्यांचा सहभाग असण्याची शक्यता सुद्धा आतापर्यंतच्या तपासातून निर्माण झाली आहे.

कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने, त्यांच्याच अखत्यारीत काम करणाऱ्या SFIO कडे, जिलियन कन्सल्टंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर ३२ कंपन्यांच्या चौकशीचे काम,  ९ सप्टेंबर २०२२ रोजी सोपवले होते. डॉर्टसे आणि एक चिनी नागरिक हे जिलियन कन्सल्टंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे दोन संचालक आहेत. तपासातून मिळालेल्या माहितीनुसार,  डॉर्टसे दिल्ली एनसीआरमधून (दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) बिहार राज्यातील एका दुर्गम ठिकाणी पळून गेला होता आणि रस्ते मार्गाने भारतातूनही पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. SFIO ने तात्काळ एक विशेष पथक तयार करुन या दुर्गम ठिकाणी नियुक्त केले. १० सप्टेंबर २०२२ च्या संध्याकाळी, SFIO ने डॉर्टसे याला अटक केली आणि नंतर न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून त्याच्या ट्रान्झिट रिमांडचे (आरोपीच्या स्थलांतरासाठीची कोठडी) आदेश मिळवले होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *