Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

५४व्या इफ्फी महोत्सवात होणार सर्वोत्तम वेब सिरीज पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा

इफ्फी कडून ऑनलाईन आशय निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सना निमंत्रणः पहिल्या सर्वोत्तम वेब सिरीज(ओटीटी) पुरस्कारासाठी इफ्फीने मागवल्या प्रवेशिका

गोव्यामध्ये २०-२८ नोव्हेंबर २०२३ दरम्यान आयोजित होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये यंदा पहिल्यांदाच सर्वोत्तम वेब सिरीज पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी आता प्रवेशिका पाठवण्याची प्रक्रिया खुली करण्यात आली आहे.

पुरस्काराचे उद्दिष्ट

ओटीटीवरील समृद्ध आशय आणि त्याच्या निर्मात्यांच्या कामाची दखल घेणे, प्रोत्साहन देणे आणि त्यांचा सन्मान करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे. डिजिटल मंचांसाठी तयार केलेल्या आणि दाखवल्या जाणाऱ्या वेब सिरीजना प्रोत्साहन देऊन आणि त्यांचा गौरव करून भारतीय ओटीटी उद्योगात विकास आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच प्रादेशिक भाषांमध्ये निर्मिती झालेल्या आशयासह वेब आशय उद्योगातील प्रादेशिक विविधता आणि सृजनशीलता यांना प्रोत्साहन देऊन भारतीय भाषांमधील ओटीटी आशयाला प्रोत्साहन देण्याचाही या पुरस्काराचा उद्देश आहे. भारतातील ओटीटी अवकाशात उपलब्ध झालेल्या संधींमुळे आपली क्षमता सिद्ध करणाऱ्या असाधारण प्रतिभांचा शोध घेण्याचे आणि त्यांना सन्मानित करण्याचे काम हा पुरस्कार करेल. भारताच्या वाढत्या सृजनशील अर्थव्यवस्थेला अनुसरून, आशय निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सना भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव(इफ्फी)च्या माध्यमातून आपल्या कामाचे प्रदर्शन करण्याची, ज्ञानाच्या देवाणघेवाणीची आणि आंतरराष्ट्रीय संबंध वृद्धिंगत करण्याची संधी देऊन, भारताच्या ओटीटी क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी निर्माण करणे आणि त्यांना प्रोत्साहन लाभ देणे हा देखील या पुरस्काराचा उद्देश आहे. ५४व्या इफ्फी महोत्सवात पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा होईल.

उगवत्या आणि आकांक्षी नव भारताची कहाणी सांगा- माहिती आणि प्रसारणमंत्री

माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी १८ जुलै २०२३ रोजी या पुरस्काराची घोषणा केली होती. भारतामध्ये असामान्य प्रतिभा ओसंडून वाहत आहे, असे नमूद करत ठाकूर यांनी आशय निर्मात्यांना प्रोत्साहित केले, “ अब्जावधी स्वप्ने आणि अब्जावधी अकथित गाथांसह जगाचे नेतृत्व करायला निघालेल्या उदय होत असलेल्या आणि आकांक्षी नव भारताची कहाणी सांगा!” यावर्षी 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुरुवात होत असलेला हा पुरस्कार दर वर्षी देण्यात येईल, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.

सर्वोत्तम वेब सिरीज(ओटीटी) पुरस्कार सुरू करण्याच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या उद्देशाविषयी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “ गेल्या काही वर्षात भारतीय मनोरंजन क्षेत्राने अभूतपूर्व बदल पाहिले आहेत. यासंदर्भात फिक्की-ईएनवायचा अलीकडील अहवाल विचारात घेण्यासारखा आहे ज्यामध्ये असे दिसते की २०२२ मध्ये भारतात ३००० तासांच्या नव्या आणि अस्सल ओटीटी आशयाची निर्मितीच झालेली नाही तर गेल्या काही वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकसंख्या देखील १३.५ कोटींवरून १८ कोटींपर्यंत पोहोचली आहे तर चित्रपटगृहात जाणाऱ्यांची संख्या १२.२ कोटी म्हणजे ओटीटीवरील वापरापेक्षा ६ कोटीने कमी आहे. त्यामुळेच भारतीय ओटीटी उद्योगाच्या विकासाला प्रोत्साहन देण्याची आणि वाढ करण्याची तसेच भारतातील अतिशय समृद्ध गुणवत्तेचा सन्मान करण्याची गरज विचारात घेण्यात आली.”

पुरस्कारासाठीची पात्रता

या पुरस्कारासाठी पात्र ठरण्याकरिता, वेब सिरीज कोणत्याही मूळ भारतीय भाषेत निर्मित/चित्रित झालेली असायला हवी. ही सिरीज म्हणजे फक्त आणि फक्त ओटीटी मंचावर प्रदर्शित करण्याच्या हेतूने कार्यान्वित,निर्मित,सह-निर्मित,परवानाकृत किंवा अधिग्रहित मूळ कलाकृती असली पाहिजे. प्रवेशिकेत नमूद केलेले सर्व भाग (वेब सिरीज/सिझनचे) १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत ओटीटी मंचावर प्रसारित झालेले असायला हवेत. तसेच, सदर वेब सिरीज/सिझनचा एकूण प्रदर्शन कालावधी किमान 180 मिनिटे असायला हवा, त्यात किमान तीन भाग असायला हवे, प्रत्येक भाग २५ मिनिटे किंवा त्याहून अधिक कालावधीचा असावा आणि हे सर्व भाग एकाच शीर्षकाखाली किंवा व्यावसायिक नावाखाली एकत्रित केलेले असावेत.

पुरस्कारासाठी अर्ज कसा करावा

 https://bestwebseriesaward.com/. या पुरस्कारसंबंधी संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या विहित ऑनलाईन प्रवेश अर्जाच्या माध्यमातून अर्जदारांनी त्यांच्या प्रवेशिका सादर कराव्यात. या प्रवेशिका २५ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सादर करता येतील. ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या प्रवेशिकेसह,त्या प्रवेशिकेची सही-शिक्क्यानिशी स्थळ-प्रत तसेच इतर संबंधित कागदपत्रे ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत कार्यालयाकडे पोहोचली पाहिजेत. जर ३१ ऑगस्ट २०२३ या दिवशी कार्यालयीन सुट्टी जाहीर झाली तर त्याच्या नंतरचा कामकाजाचा दिवस अर्जांच्या सादरीकरणाचा अखेरचा दिवस समजला जाईल.

पुरस्कारांचे घटक

स्पर्धेत असलेल्या वेब सिरीजची कलात्मक गुणवत्ता, कथाकथन, तांत्रिक उत्कृष्टता आणि एकंदर प्रभावाचा विचार करून सर्वोत्तम वेब सिरीजचा पुरस्कार देण्यात येईल. हा पुरस्कार रोख १० लाख रुपयांचा असून ही रक्कम सदर वेब सिरीजचे दिग्दर्शक, निर्माते/निर्मिती संस्था/ओटीटी मंच (मूळ निर्मिती किंवा सहनिर्मिती) यांच्यात समान भागांमध्ये विभागून दिली जाईल. प्रमाणपत्रे देखील दिग्दर्शक/सर्जक किंवा दोन्ही, आणि निर्माते/ निर्मिती संस्था/ओटीटी मंच (मूळ निर्मिती किंवा सहनिर्मिती) यांना तसेच ती वेब सिरीज प्रदर्शित करणाऱ्या ओटीटी मंचाला देण्यात येतील.

पुरस्कारप्राप्त कलाकृतीच्या निवडीसाठी दोन स्तरीय व्यवस्था असेल, पूर्वावलोकन समिती आणि परीक्षक मंडळ. परीक्षक मंडळामध्ये प्रख्यात चित्रपट/वेब सिरीज व्यावसायिक तसेच भारतातील वेब सिरीज, चित्रपट आणि संबंधित कला क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असेल. पूर्वावलोकन समिती आणि परीक्षक मंडळ या दोन्हीची स्थापना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे करण्यात येईल.

पुरस्कारासाठीची पात्रता तसेच इतर तपशीलवार माहिती  https://bestwebseriesaward.com/. या पुरस्कारसंबंधी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पुरस्कारासाठीचे नियम व अटी देखील येथे दिले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *