बारावीच्या पुरवणी परीक्षांसाठी आवेदन प्रक्रिया सुरू; १५ मेपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल २ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. निकालानंतर आता जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षांसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कासह १५ मे २०२६ पर्यंत तर विलंब शुल्कासह २० मे २०२६ पर्यंत अर्ज भरावेत, असे आवाहन मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेस अनुपस्थित राहिलेले विद्यार्थी, जून-जुलै २०२६ परीक्षेसाठी नावनोंदणी केलेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देणारे विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत.
याशिवाय तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट अंतर्गत आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे देखील ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी आपली आवेदनपत्रे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर भरावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मंडळाच्या सूचनेनुसार, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी अर्ज शुल्काची रक्कम आरटीजीएस अथवा एनईएफटी प्रणालीद्वारे २१ मे २०२६ पर्यंत जमा करणे आवश्यक राहणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रिलिस्ट संबंधित विभागीय मंडळांकडे २५ मे २०२६ पर्यंत सादर कराव्या लागणार आहेत.
यंदाच्या बारावी परीक्षेचा राज्याचा एकूण निकाल ९१.८७ टक्के लागला असून काही विद्यार्थ्यांना अपयशाचा सामना करावा लागला आहे. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे जून-जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात येते. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीत आवेदन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.
विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरताना विषय, आसन क्रमांक, नाव आणि इतर माहिती काळजीपूर्वक तपासूनच अर्ज सादर करावा. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आणि शुल्क भरल्याची पावती सुरक्षित ठेवण्याच्याही सूचना मंडळाने दिल्या आहेत.
