Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“तुम्ही सर्वात गरीब राष्ट्राध्यक्ष आहात असं लोकांचं म्हणणं आहे…….” वाचा यावर उरग्वेचे माजी राष्ट्राध्यक्ष होसे मूहिकांनी काय उत्तर दिलं

“तुम्ही सर्वात गरीब राष्ट्राध्यक्ष आहात असं लोकांचं म्हणणं आहे…….” वाचा यावर उरग्वेचे माजी राष्ट्राध्यक्ष होसे मूहिकांनी काय उत्तर दिलं

“गरिबीची माझी व्याख्या वेगळी आहे. ज्या लोकांना सतत खूप काही हवं असतं ते गरीब असतात. कारण ज्यांना खूप काही हवं असतं ते कधीच समाधानी नसतात” –उरुग्वेचा राष्ट्राध्यक्ष असलेल्या होसे मुहिकानं “तुम्ही सर्वात गरीब राष्ट्राध्यक्ष आहात असं लोकांचं म्हणणं आहे.” या एका वार्ताहरानं विचारलेल्या प्रश्नावर दिलेलं हे उत्तर..!

आपल्या १२००० डॉलर्स या महिन्याच्या पगारातली ९० टक्के रक्कम सेवाभावी संस्थांना देणारा, निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन नाकारणारा आणि त्याबद्दल विचारणा केल्यावर “मला जसं जगायचं आहे ते मी राष्ट्राध्यक्ष झाल्यानं बदलत नाही. माझ्या गरजेपेक्षा मी जास्त मिळवतो. इतरांना त्यातला भाग देणं यात मी काही त्याग वगैरे करत नाही. ते माझं कर्तव्य आहे” असं म्हणणारा होसे मुहिका हा उरुग्वे या लॅटिन अमेरिकन देशाचा २०१० ते २०१५ या काळात राष्ट्राध्यक्ष होता. त्याआधी त्यानं १३ वर्षं तुरुंगात घालवली होती. त्यापैकी ७ वर्षं त्याला वाचन करायला बंदी होती. त्यावर “सात वर्षांनंतर मला भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांवरची पुस्तकं वाचायला परवानगी मिळाली, तोपर्यंत मला खरोखर वेड लागायची पाळी आली होती” असं होसे म्हणतो.

चंगळवादाबद्दल परखड मतं व्यक्त करताना “आपण जुने देव मानणं सोडलं. आता बाजारपेठ या देवाची आपण आराधना करतो. तोच देव आपली अर्थव्यवस्था, आपलं राजकारण, आपलं वागणं आणि आपलं आयुष्य नियंत्रित करतो. तो आपल्याला वस्तूंचे दर आणि क्रेडिट कार्डस देतो आणि फसवा आनंदही देतो” असं सांगताना “जर आपण निसर्गाला असेच ओरबाडत आणि त्याच्यावर आक्रमण करत राहिलो तर चंगळवाद हा मानवजातीच्या अस्तित्वाचा शेवटचा टप्पा ठरु शकेल” असं बजावायला होसे विसरत नाही.

गर्भपात, समलिंगी विवाह, मारिजुआनासारखे ड्रग्ज या सर्व गोष्टींना होसेनं उरुग्वेमध्ये कायदेशीर मान्यता दिली. मानवतावादी असणारा होसे समलिंगी विवाहाबद्दल “जगाच्या इतिहासात समलिंगी विवाह कायमच होते. ज्युलिअस सीझरपासून अनेकजणांचा दाखला देत ते न मानणं अमानुषपणा ठरेल असं मत होसेनं मांडलं आहे. तसंच व्यसनांबद्दल तो म्हणतो, “मारिजुआना काय, धूम्रपान काय किंवा दारु काय व्यसन वाईटच असतं. एकच चांगलं व्यसन आहे ते म्हणजे प्रेम..”

या सर्व गोष्टींचा परिणाम? आज सर्व लॅटिन अमेरिकन देशांमध्ये लोकशाही, शांतता, भ्रष्टाचाराचं सर्वात कमी प्रमाण असणं याबाबत उरुग्वे हा पहिल्या क्रमांकावर आहे. माध्यमस्वातंत्र्य आणि देशाची भरभराट याबाबत हा देश दक्षिण अमेरिकन देशांमध्ये पहिल्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे या देशात दहशतवाद नाही. युवाल नोहा हरारीनं जगातल्या २१ महत्वाच्या प्रश्नांमध्ये दहशतवाद हा एक भेडसावणारा प्रश्न मानला आहे हे लक्षात घ्यायला हवं.

उरुग्वे आज आर्थिक विषमतेच्या निकषावर दुसऱ्या क्रमाकांवरचा तर जीडीपीची वाढ, संशोधन याबाबतीत तिसर््या क्रमांकावरचा देश आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता याबाबतीतही आंतरराष्ट्रीय पातळीवर हा देश बर््यातच वरच्या स्थानावर आहे. व्यक्तिस्वातंत्र्याला परमोच्च महत्व देणार््याष होसेनं स्वातंत्र्याची केलेली व्याख्या आपण सर्वांनी आपल्या स्वत:च्या बाबतीत तपासून पहायला हवी. तो म्हणतो, “मी गरीब नाही.. काटकसरी आहे. जितकं अगदी गरजेचं असेल तेवढ्यावर मी जगतो. चंगळवादी वस्तूंना मी जखडलेला नाही. का? तर माझ्याकडे मोकळा वेळ उरावा. काय करण्यासाठी? मला हवं ते करण्यासाठी. हवं तसं आयुष्य जगण्यासाठी वेळ असणं हेच स्वातंत्र्य..!”

अल-जझीराच्या वार्ताहरानं होसेची घेतलेली मुलाखत युट्यूबवर उपलब्ध आहे. ती मुलाखत पहायला मला प्रवृत्त केल्याबद्दल Ashok Rajwade यांचे आभार..

आणि ही युट्यूब लिंक :

– नीलांबरी जोशी (कॉर्पोरेट कल्लोळ)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *