बाटल्या व वॉलपेपरच्या आडून प्रतिबंधित फटाक्यांची आयात; कारवाईत सिंडिकेटमधील प्रमुखाला अटक
नवी मुंबई, दि. २४ : आयात केलेल्या मालाची चुकीची माहिती देऊन मोठ्या प्रमाणावर फटाके भारतात आणण्याचा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयाने उधळून लावला आहे. नाव्हा शेवा बंदरात परदेशातून आलेल्या एका जहाजावरील कंटेनरची तपासणी केल्यानंतर सुमारे १० हजार किलो वजनाचे आणि अंदाजे ३ कोटी रुपये बाजारमूल्य असलेले फटाके जप्त करण्यात आले. या प्रकरणात अवैध आयातीचे नियोजन करणाऱ्या सिंडिकेटमधील प्रमुख सदस्याला अटक करण्यात आली आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. संबंधित जहाजातून बाटल्या आणि वॉलपेपरची वाहतूक होत असल्याचे कागदपत्रांमध्ये दर्शविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष तपासणीदरम्यान घोषित मालाच्या आड मोठ्या प्रमाणात फटाके लपवून आणल्याचे उघड झाले.
कंटेनरच्या पुढील भागात घोषित माल, उर्वरित भागात फटाके
सखोल तपासणी करताना अधिकाऱ्यांना १९,८०० फटाके आढळून आले. त्यांना २८८ गॅटलिंग असे संबोधले जाते. या फटाक्यांचे एकूण वजन सुमारे १०,००० किलो असून, त्यांची बाजारातील अंदाजे किंमत ३ कोटी रुपये आहे.
तपासात आणखी एक बाब समोर आली. कंटेनरच्या सुरुवातीच्या केवळ तीन रांगांमध्ये कागदपत्रांमध्ये नमूद केलेला माल ठेवण्यात आला होता. त्यानंतरचा जवळपास संपूर्ण भाग फटाक्यांनी भरलेला होता. अशा प्रकारे घोषित मालाच्या आड प्रतिबंधित वस्तू लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासातून स्पष्ट झाले. या प्रकरणातील माल सीमाशुल्क कायदा, १९६२ अंतर्गत जप्त करण्यात आला आहे.
फटाक्यांच्या आयातीसाठी कठोर नियम
विदेशी व्यापार धोरणानुसार फटाक्यांची आयात ही ‘प्रतिबंधित’ श्रेणीत येते. त्यामुळे अशा आयातीसाठी परदेशी व्यापार महासंचालकांकडून वैध परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय स्फोटक नियम, २००८ अंतर्गत पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना अर्थात पीईएसओकडून आवश्यक परवानगी व परवाने घेणेही बंधनकारक आहे. या प्रकरणातील आयातदाराने संबंधित नियमांचे पालन केले होते का, तसेच फटाके भारतात आणण्यामागे नेमकी कोणाची भूमिका होती, याचा तपास करण्यात येत आहे.
गैरप्रकाराच्या नियोजनातील प्रमुखाला अटक
तपासादरम्यान संबंधित माल गुप्तपणे सीमाशुल्क प्रक्रियेतून बाहेर काढण्याची तयारी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या संपूर्ण हालचालींचे नियोजन आणि व्यवस्था करणाऱ्या सिंडिकेटमधील प्रमुख सदस्याला सीमाशुल्क कायदा, १९६२ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
नाव्हा शेवा बंदरातून होणाऱ्या व्यावसायिक मालवाहतुकीचा गैरवापर करून प्रतिबंधित वस्तू लपवून आणण्याच्या पद्धतीवर या कारवाईमुळे प्रकाश पडला आहे. जप्त फटाके, त्यांची आयात व्यवस्था आणि या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींबाबतचा तपास पुढे सुरू आहे.

