Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या संत गाडगेबाबांनी केलेल्या महान कार्याविषयी त्यांच्या स्मृतिदिनी

आपल्या कृतीतून स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त टीम महाराष्ट्र वार्ता तर्फे विनम्र अभिवादन. जाणून घ्या संत गाडगेबाबा यांच्या जीवनाविषयी.

संत गाडगेबाबा
गाडगे महाराज
(२३ फेब्रुवारी १८७६ – २० डिंसेंबर १९५६). एक थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक. त्यांचा जन्म शेणगाव (जि. अमरावती) येथे परीट जातीत झाला. वडिलांचे नाव झिंगराजी व आईचे सखूबाई. आडनाव जाणोरकार. त्यांचे मूळ नाव डेबूजी असे होते. तथापि त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना ‘गोधडे महाराज’ किंवा ‘गाडगे महाराज’ म्हणूनच ओळखत. १९१२ मध्ये त्यांचा कुंताबाईशी विवाह झाला; परंतु संसारात त्यांचे मन रमले नाही. पुढे काही वर्षांनी घर सोडून तीर्थयात्रा करीत ते फिरू लागले. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले.

लहानपणापासूनच त्यांना भजन-कीर्तनांची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. समाजसुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर असले, तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या एकदम हृदयाला जाऊन भिडणारी होती. महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत त्यांनी गावोगाव कीर्तने करून लोकजागृती केली. त्यांचा नैतिक उपदेश साधा व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरावा असाच होता.

‘चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये’, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत. पारंपरिक, पारमार्थिक विषयांसोबतच व्यावहारीक व नैतिक विषयांचाही त्यांनी आपल्या कीर्तनांतून लोकजागृतीसाठी चांगला उपयोग करून घेतला.

स्वच्छता, प्रमाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात; परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करीत व तेथील परिसर स्वतःच्या हातांनी स्वच्छ करी. खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचा कमालीचा साधेपणा होता. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते भिकाऱ्यांना वाटून टाकीत आणि स्वतः गरिबाच्या घरची चटणी- भाकरी मागून आणून खात.

लहानपणापासूनच ते जातिपंथभेदातीत होते. जातिभेद नष्ट करून एकजिनसी समाज निर्माण व्हावा, असे त्यांना मनापासून वाटे व त्या दृष्टीने यांचे आचरण आणि प्रयत्‍नही असत. पंढरपूर, नासिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी इ. ठिकाणी यात्रेकरूंचे अत्यंत हाल होत, म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीसाठी प्रशस्त धर्मशाळा बांधल्या. विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले व नदीवर घाटही बांधला. अनेक ठिकाणी त्यांनी गोरक्षण संस्थाही उभारल्या; तसेच अनाथांसाठी व अपंगांसाठी अनेक प्रकारे कार्य केले. समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांनाही त्यांनी उदारहस्ते देणग्या दिल्या.

अनेक ठिकाणी देवाधर्माच्या नावावर चालणारी पशुहत्या त्यांनी बंद केली. अध्यात्माच्या जंजाळात न शिरताही, संसारातच राहून ईश्वरभक्ती करता येते, अशी साधी व सरळ शिकवण त्यांनी समाजास दिली.

‘संत तुकाराम महाराज आमचे गुरू आहेत व माझा कोणीही शिष्य नाही ’, असे ते म्हणत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची गादी अथवा मठ कोठेही निर्माण झाला नाही.

समाजात शिक्षणप्रसार करून अनेक शिक्षणसंस्थांना त्यांनी मदत केली. लोकांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती; त्यामुळे लोकांनी त्यांना विपुल पैसा दिला. तो सर्व त्यांनी लोकोपयोगी कार्यात वेचला. त्यांनी उभारलेल्या सर्वच संस्थांचा कारभार विश्वस्त मंडळेच पाहतात.

गाडगे महाराजांविषयी बहुजनसमाजात कमालीचा आदरभाव आहे. त्यांनी महाराष्ट्रात केलेले लोकजागृतीचे व लोकसेवेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. प्रवास करीत असता अमरावतीजवळ त्यांचे अचानक निधन झाले. त्यांची समाधी अमरावती येथे आहे.

संदर्भ : कवडे, पां. बा. श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र, पंढरपूर, १९३९.

फरांडे, वि. दा.

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *