Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नम्रता पाटील आणि कॅपिटल क्लब ची टोळी; आणखी एक घोटाळेबाजाचा झाला पर्दाफाश

नम्रता पाटील आणि कॅपिटल क्लब ची टोळी; आणखी एक घोटाळेबाजाचा झाला पर्दाफाश

नवी मुंबई: गेल्या तीस वर्षांत महाराष्ट्राने चिटफंड, दाम दुप्पट योजना सारख्या अनेक फसव्या कंपन्या पाहिल्या. ज्यात संचायनी, कल्पवृक्ष, शेरेगर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. या योजनांमध्ये थोड्याशा लालसेपोटी आपली रक्ताचे पाणी करून कमावलेली हक्काची कमाई गुंतवून लोकांनी मातीमोल करून टाकली. यात भरीव परताव्याचे आमिष दाखवून भोळ्या-भाबड्या लोकांकडून ठेवी गोळा केल्या जातात. सुरुवातीला परतावा नियमित दिला जातो, लोकांचा विश्वास संपादित केला जातो आणि एकदा का लोकांची गर्दी झाली आणि मोठी रक्कम जमा झाली की थेट या घोटाळ्याचे मास्टरमाईंड त्यांचे दुकान बंद करून देशाबाहेर पोबारा करतात अथवा दुसऱ्या शहरांमध्ये खोटं नाव धारण करून वास्तव्याला जातात. या सर्व बाजारात मरतो तो सामान्य गुंतवणूकदार ज्यात मुख्यत्वे सामान्य नोकरदार, विधवा स्त्रिया, स्वेच्छा निवृत्तीधारक आणि ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होतो.

अशाच एका टोळीचा पर्दाफाश नवी मुंबई पोलिसांनी केला. ज्यात पाच आरोपींना पकडण्यात आले. त्यांची नावे अनुक्रमे गणेश शिंदे, अभिजीत जाधव, समाधान चिंचोले, संजय गवारे आणि बबन सद्दार आहेत. रवींद्र चौधरी हा आरोपी अद्याप फरार आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या देखरेखीखाली आणि गुन्ह अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या पुढाकाराने ही कारवाई करण्यात आली. या वेळी पोलिसांना आढळले कि त्यांनी ४००० लोकांना जवळपास १४ कोटी रुपयांचा चुना लावला. या सर्व आरोपींवर कलम ३४, कलम ४०९, ४२० आणि ६६ड अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी खोटे ग्राहक बनून माहिती मिळवली तेव्हा कळले की ही गणेश शिंदे आणि रवींद्र चौधरी हे या कंपनीचे प्रमुख आहेत. पण पोलिसांनी धाड मारण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी टीम महाराष्ट्र वार्ता ने याठिकाणी स्टिंग ऑपरेशन केले तेव्हा आम्हाला कंपनीची सर्वेसर्वा नम्रता पाटील नामक स्त्री असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच शिंदे हापण प्रमुख संचालकांपैकी एक असल्याचे कळले. पण मग पोलिसांना नम्रता पाटील बद्दल काही माहिती मिळाली की नाही हा प्रश्न अनुत्तरित राहतो. याबाबत पोलीस सखोल चौकशी करून माहिती मिळवतीलच.

गेल्या काही वर्षात चिटफंड ची जागा मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपन्यांनी घेतली. ज्यात अमुक रकमेची वस्तू विका तमुक एवढे सदस्य आणा आणि दर आठवडा, महिन्याला नफा कमवा अशा प्रकारे या योजनांची रचना असते. पण, अखेरीस काही काळाने अशा योजना चालवणारे चालबाज हजारो गुंतवणूकदारांना चुना लावून अचानक एका रात्रीत पोबारा करतात. अशाच प्रकारची फसवणूक करणारी एक कंपनी नवी मुंबईतील, वाशी येथील रियल टेक पार्क या मोठ्या कॉर्पोरेट इमारतीत चौदाव्या माळ्यावर गाळा क्रमांक १४०५ मध्ये थाटण्यात आली होती. या कंपनीचं नाव “कॅपिटल क्लब ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड” होतं. नम्रता पाटील नावाच्या एक महिला त्याच्या व्यवस्थापकीय संचालक असल्याचे आम्हाला स्टिंग ऑपरेशन दरम्यान आढळले. आता या महिलेने धारण केलेले हे नाव खरं की खोटं हे पोलिस चौकशीत उघड होईलच. आमच्या गुप्त वार्तांकन करणाऱ्या प्रतिनिधीने डमी ग्राहक बनून तिथल्या सदस्यांकडून (गुरव, सदाफुले, केतन राऊत) यांच्याकडून त्यांच्या योजनेबद्दल वेळोवेळी चौकशी केली, तेव्हा एका बहुराष्ट्रीय कंपनीला लाजवेल अशा आलिशान कार्यालयात बसून त्यांना सांगण्यात आले की सदर कंपनी सोने-चांदी व फोरेक्स (परकीय चलनाच्या) व्यापारात आहे. सोन्यात गुंतवणूक करण्याबाबत एक स्कीम त्यांना सांगण्यात आली या योजनेनुसार १८ कॅरेटचे सोने ग्राहकाला दोन ग्रॅमपासून ते ४० ग्रॅम या पॅकेजमध्ये देण्यात येते. (शिवाय ही स्कीम वेळोवेळी अचानक बदललेलीही आमच्या नजरेत आली.) त्यानंतर सुरू होते चैन सिस्टीम ज्याला मल्टिलेव्हल मार्केटिंग असंही संबोधलं जातं. त्यानुसार तुम्ही क्लायंट आणायचे. तुमच्या गुंतवणूकीवर तुम्हाला दर दिवशी एक टक्के प्रमाणे २०० दिवसांसाठी उत्पन्न मिळतं. म्हणजे गुंतवणुकीवर थोडाथोडका नव्हे तर चक्क २०० टक्के परतावा. त्याचे पैसेही शेवटी नव्हे तर आठवडया आठवड्याला मिळतात म्हणे. यानंतर तुम्ही जी माणसं जोडाल त्यांच्या गुंतवणुकीवरही तुम्हाला उत्पन्न मिळायला सुरुवात होते. आता यांच्या सोन्याचा दर पाहुयात दोन ग्रॅम सोन्याची किंमत आहे तब्बल १०,५००/- त्याचे सद्यपरिस्थितीत बाजार मूल्य आहे ६,००० रुपये म्हणजे ४,५०० रुपयांनी हे सोने महाग पडते. आता मुद्दा दुसरा गुंतवणुकीवर २०० टक्के परतावा आणि तोही २०० दिवसात देणे कसे काय शक्य आहे. कारण सोन्या-चांदीची एमसीएक्स(MCX) मार्केट अथवा जागतिक बाजारात (डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये) जरी ट्रेडिंग केली तरी एवढ्या कमी दिवसात असा परतावा देणे अशक्य आहे. शिवाय या योजना हि मंडळी वेळोवेळी बदलत असल्याचे आम्हाला शेवटच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये जाणवले.

या कंपनीची नोंदही आम्हाला रजिस्ट्रार कडे सापडली नाही. किंबहुना जेव्हा आमच्या टीमने या कंपनीच्या वेबसाईटला भेट दिली तेव्हा त्यात ऑफिसचा असा कोणताच पत्ता सापडला नाही. (वेबसाईटचे नाव : https://www.capitalclub.in). आता एवढे सगळे लूप-होल्स असूनही गुंतवणूकदार या अशा घोटाळेबाजांच्या जाळ्यात अडकतात कसे हाच मोठा प्रश्न. गेल्या काही वर्षात अशा अनेक स्कीम आणि चिटफंड घेऊन आलेल्या कंपन्यांचे घोटाळे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने व ई.डी.ने (अंमलबजावणी संचालनालय) उघड केले. पण, तरीही काहीजण आपली ओळख बदलून एका रात्रीत गायब झालेले आहेत.

 

तरी महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला आम्ही आवाहन करतो की थोड्याशा लालसेपायी आपली मेहनत करून, दिवस-रात्र घाम गाळून मिळवलेली कमाई नम्रता पाटील व कॅपिटल क्लब सारख्या घोटाळेबाजांकडे गुंतवून आपली व आपल्या परिवाराची राख करू नका. सरकारी रोखे, बँक ठेवी, स्थावर मालमत्ता यात सुरक्षित गुंतवणूक करा. आणि अगदीच शेअर बाजारात गुंतवणूक करायची झाली तर योग्य ज्ञान घेऊन स्वतःच्या ट्रेडिंग खात्या मार्फतच सुरक्षित रित्या गुंतवणूक करा. शेवटी अशी जोखीम घेणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाच ठरावा.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *