अवैध मद्यसाठ्यासह १ कोटी ९० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
मुंबई, दि. १८ : परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने भिवंडी परिसरात मोठी कारवाई करत सुमारे १ कोटी ९० लाख ३५ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्यसाठा, मालवाहू कंटेनर आणि अन्य साहित्य हस्तगत करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी विभागाच्या पथकाने मुंबई–नाशिक महामार्गावरील वडपे गाव परिसरात विशेष पाळत ठेवली. संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर एका कंटेनर वाहनाला अडवून तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान अशोक लेलँड कंपनीच्या सहा चाकी कंटेनर वाहनात मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्याचा साठा आढळून आला. वाहनातून विविध नामांकित ब्रँडच्या ७७ हजार ७६० सीलबंद मद्याच्या बाटल्या, म्हणजेच १ हजार ६२० बॉक्स, जप्त करण्यात आले. या प्रकरणी वाहन चालक हनुमान मोबता राम (वय २८ वर्षे, राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या विदेशी मद्याची किंमत १ कोटी ६३ लाख २९ हजार ६०० रुपये इतकी आहे. याशिवाय कारवाईत वापरण्यात आलेला कंटेनर वाहन, मोबाईल फोन आणि अन्य साहित्य मिळून एकूण १ कोटी ९० लाख ३५ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम सुरू केली असून विविध जिल्ह्यांमध्ये तपासणी आणि अंमलबजावणीची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. महसुली नुकसान टाळणे, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे आणि अवैध मद्यव्यवसायावर आळा घालणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. भिवंडी विभागातील निरीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि जवानांच्या विशेष पथकाने ही मोहीम यशस्वीरीत्या राबविली.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात अवैध मद्यनिर्मिती, साठवणूक किंवा वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यास ती तात्काळ विभागाला कळवावी. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अवैध मद्य पुरवठा साखळीतील इतर संबंधित व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
