आयुक्त मंगेश चितळे पालिकेच्या लाडक्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार का ?
सूचना – काल्पनिक कथा / स्थळ नरकलोक
एकदा पुणे, नाशिक व पनवेल महानरकपालिकेचे आयुक्त पनवेल परिसरात एका वाहनातून एकत्र प्रवास करत असतात. प्रथम पुणे महानरकपालिकेचे आयुक्त बोलायला सुरुवात करतात. “तो संतोष पंडित काही दिवसांपूर्वीच जेल मधून सुटलाय. आता पुन्हा खड्ड्यांचे व्हिडीओ बनवून आम्हाला बेजार करायला सुरुवात केलीय त्याने. आयुक्तालयातून निघताना मनात सारखी भीती असते की, गॅंग मास्टर गोगो सारखा अचानक गाडीसमोर येईल आणि माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती करत व्हिडिओ बनवेल. असं वाटतं की एकदाची इथून बदलीच घ्यावी.” हे सारं ऐकताना नाशिक महानरकपालिकेच्या आयुक्तांच्या कपाळावर आठ्या पडलेल्या असतात. न राहवून मध्येच ते बोलायला सुरुवात करतात. अहो साहेब, तुमच्याकडे फक्त तो पंडित आहे. इथे नाशिकला या, मग कळेल. अहो विरोधीपक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनं करून बेजार केलंय मला. कधी रस्त्यावर खड्ड्या-खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण चालू आहे तर कधी खड्ड्यांना हार घातले जातात. अहो काहींनी तर रस्त्यांची श्राद्धही घातली. मी हि विचार करतोय मंत्रालयात पुन्हा बदली करून घ्यावी. हि रोजची कटकट तरी थांबेल.
एकीकडे पुणे-नाशिक महानरकपालिकेचे आयुक्त आपल्या व्यथा मांडत असताना पनवेल महानरकपालिकेच्या आयुक्तांच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकत असतं. दोघे त्यांच्याकडे आश्चर्यचकित नजरेने पाहतात. पनपा आयुक्त म्हणतात, “माझं बरं चालू आहे. आमच्या इथे ना दरवर्षी नवीन रस्ते बनवून त्याच त्याच ठिकाणी खड्डे पडतात. पण एका शब्दाने कोणी काही बोलत नाही. कोणताही विरोधीपक्ष कोणतं आंदोलन करत नाही कि कसले मोर्चे काढत. एखाद दुसरा झुरळ स्पायडरमॅनचे कपडे घालून थट्टा करतो. तेवढं चालायचंच, लोकशाही आहे.. आमच्या महानरकपालिकेतील नागरिक नरकात अगदी आनंदाने राहतात. कोणी काहीच तक्रार करत नाही.” त्यांचं वाक्य संपतं न संपतं तोच गाडी बाहेरून एक आवाज येतो. डाव्या बाजूने एक दुचाकीस्वार खडी टाकून नुकत्याच बुजवलेल्या खड्ड्यामुळे घसरत थेट आयुक्तांच्या गाडीवर आदळतो. गाडी जागच्या जागी थांबते. तिघे आयुक्त गाडीतून खाली उतरतात. आधी सरकारी मालमत्तेचं किती नुकसान झालंय ते पाहतात आणि मग आपला मोर्चा दुचाकीस्वाराकडे वळवतात. कोणी काही बोलण्याआधीच घाबरलेला आणि मजबूत खरचटलेला दुचाकीस्वार पनवेल महानरकपालिकेच्या आयुक्तांची हात जोडून माफी मागतो. “साहेब मला माफ करा. रस्त्यावरच्या या खडी टाकून बुजवलेल्या निष्पाप खड्ड्याकडे माझं लक्षंच गेलं नाही. मी तुमची, कंत्राटदाराची व या खड्ड्याची लेखी माफी मागायला तयार आहे. हवं तर मी या वर्षीपासून दुप्पट प्रॉपर्टी टॅक्स सुद्धा भरायला तयार आहे. पण, माझ्यावर कारवाई करू नका. घरी बायका, पोरं वाट पाहतायंत.” संतापलेले प.न.पा. आयुक्त त्या मनुष्यावर एक कटाक्ष टाकतात आणि तात्काळ नजरेसमोरून दूर होण्याचा इशारा करतात. आपली दुचाकी खेटरासारखी ओढत मनुष्य निघून जातो. हा सारा प्रकार पाहून अचंबित झालेल्या पुणे-नाशिक महानरकपालिका आयुक्तांच्या नजरा पनवेलच्या आयुक्तांकडे वळतात. त्यांच्या चेहऱ्यावर तेच मघाचं मंद स्मित तरळलेलं असतं.
वरील दोन परिच्छेदांतील कथा काल्पनिक असली तरी त्यातील निकृष्ट रस्ते व त्यावरचे उत्तम खड्डे हे खरेच आहेत. पावसाळा संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप पनवेल महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेल, कामोठे, खारघर, कळंबोली, खांदा कॉलनी विभागातील रस्त्यांची साडेसाती सुटलेली नाही. अनेक ठिकाणचे खड्डे बुजवलेले नाहीत तर ज्या ठिकाणी ते बुजवले गेले आहेत त्या ठिकाणच्या कामाचा दर्जा पाहता ‘खड्डे चालतील पण काम आवर’ असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. प्रातिनिधिक स्वरूपात नवीन पनवेल परिसरातील रस्त्यांचा(खड्ड्यांचा) इतिवृत्तांत या ठिकाणी मांडत आहोत.
धुळीच्या सम्राज्यामुळे पनवेलकर श्वसनाच्या विकारांनी त्रस्त
नवीन पनवेल परिसरात महानगर गॅस लिमिटेडची पाईपलाईन टाकण्यासाठी पावसाळ्यापूर्वी खड्डे खणले गेले होते. पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण होता-होता पावसाळा तोंडावर आला. त्यामुळे खड्डे फक्त खडी टाकून बुजवले गेले पण त्यावर डांबरीकरण करणे राहून गेले. बांठीया शाळेसमोरील सबंध रस्ता, सेक्टर – १९ पोस्ट ऑफिस ते श्रीयश रुग्णालयापर्यंतचा रस्ता, त्याच मार्गावरील सर्व गल्ल्यांमधले रस्ते इत्यादी ठिकाणी डांबरीकरण अद्याप बाकी आहे. या साऱ्याचा त्रास या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना भोगावा लागतोय. येथे मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य असून नागरिक त्यामुळे उद्भवणाऱ्या श्वसनाच्या विकारांमुळे त्रस्त आहेत. ही कथा झाली अर्धवट राहिलेल्या कामांची. पण ऐन दिवाळीच्या तोंडावर कंत्राटदाराने जी खड्डे बुजविण्याची कामे सुरू केली त्यांचा दर्जा हा आता चर्चेचा विषय आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाने या रस्त्यांचा दर्जा एकदा प्रामाणिकपणे तपासून पाहावा.

त्याच जागा, तेच खड्डे !
गतवर्षीच्या पावसाळ्यापूर्वी पीडीआयपीएल या कंत्राटदाराने नवीन पनवेल विभागात जी रस्त्याची कामे केली होती त्यांचं पितळ त्याच पावसाळ्यात उघडं पडलं. याबाबत महाराष्ट्र वार्ताने सविस्तर वृत्त प्रसारित केलं होतं. यानंतर रस्त्यांची डागडुजी झाली खरी पण, या पावसाळ्यातही बऱ्याच ठिकाणचे रस्ते खराब झाले. यात पोस्ट ऑफिस पासून स्वस्तिक हॉटेल पर्यंतचा रस्ता, पनवेल रेल्वे स्थानक ते विचुंबे पर्यंतचा रस्ता याशिवाय, एमटीएनएल कार्यालयासमोरील रस्ता, शिवा कॉम्प्लेक्स पोलीस चौकी ते खांदा कॉलनी उड्डाणपूल, आदई तलाव ते आदई सर्कल ते आयटीएम इन्स्टिटयूट पर्यंतचा रस्ता, शिवा कॉम्प्लेक्स ते पोस्ट ऑफिस समोरील रस्त्यांचा समावेश होतो. या मार्गांवर अनेक जागा अशा आहेत जेथे वर्षानुवर्ष विशिष्ट ठिकाणीच खड्डे पडतात. पनवेल मनपाकडून या ठिकाणांचं मुळात ऑडिट होणं गरजेचं आहे. नवीन पनवेल व जुन्या पनवेल ला जोडणारा जो पूल आहे त्यावरही दर वर्षी पॅच लावण्याची प्रक्रिया करावीच लागते. विशेष म्हणजे दरवर्षी या पुलावरील आतल्या लोखंडी शिगा ठळकपणे दिसतात. जी कथा नवीन पनवेलची तीच कळंबोली, कामोठे, खारघर चीही आहे. मुळात पनवेल मनपा हद्दीतील रस्ते, पूल बनवतानाच उत्तम दर्जाचे बनवले गेले असते तर, आज नागरिकांना मनस्तापाचा सामना करावा नसता.
सत्ताधारी किंवा सत्ताधाऱ्यांचे कुटुंबीय जेव्हा कंत्राटदार असतात तेव्हा…
सत्ताधारी किंवा सत्ताधाऱ्यांचे कुटुंबीय जेव्हा कंत्राटदार असतात तेव्हा त्या शहरातील नागरिकांना चांगले रस्ते मिळणं दुरापास्तच. पनवेल महानगरपलिका हद्दीत प्रामुख्याने ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि., पीडीआयपीएल, व्हीडीआयपीएल या कंत्राटदार कंपन्यांना रस्त्याची कंत्राटे महापालिकेकडून मिळतात. त्यांच्या कामाचा दर्जा कसा आहे हे एकदा आयुक्तांनी स्वतः आयआयटी मुंबईच्या टीम सोबत रस्त्यावर उतरून तपासून घ्यावा. पनवेल महानगरपालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे आणि योगायोग म्हणजे सर्वात जास्त खराब रस्तेही भाजपप्रणीत नगरसेवकांच्या प्रभागात आहेत. बरं आपल्या प्रभागतील रस्ते खराब आहेत, खड्डेयुक्त आहेत याची लाज वाटायला हवी तर ते ही दिसत नाही. कारण याच खराब रस्त्यांसामोर या नगरसेवकांचे फुटकळ शुभेच्छा देणारे बॅनर लागलेले आसतात. उघड्या डोळ्यांनी ते आपल्या प्रभागाची दुरावस्था व आपलं कर्तुत्व अभिमानाने पाहत असतात.
आयुक्त मंगेश चितळे कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार का ?
आज मितीला पनवेल महानगरपालिका हद्दीतील सिमेंट कॉंक्रीट चे काही रस्ते सोडले तर असा एक रस्ता दाखवावा जो समतल आहे, गुळगुळीत आहे, ज्यावरून गाड्या आचके न देता मार्गक्रमण करतात. मनपाकडे वर्षाला करोडो रुपयांचा कर भरणाऱ्या करणाऱ्या पनवेलकरांना चांगले रस्ते मिळू नयेत या सारखी मोठी शोकांतिका कोणती नसावी. निकृष्ट दर्जाच्या या रस्त्यांवरून गाड्या चालवताना गाडीचे तर नुकसान होतेच पण चालक व प्रवासी दोघांच्या कंबरेचे नट-बोल्ट खिळखिळे होतात. मनपा आयुक्त मंगेश चितळे यांनी पालिकेच्या लाडक्या कंत्राटदारांवर वेळीच कारवाई केली असती, त्यांना काळ्या यादीत टाकले असते तर हे दिवस पनवेलकरांना पहावे लागले नसते.

