Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत विद्यापीठांच्या तयारीचा राज्यपालांकडून आढावा

“नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा” – राज्यपाल रमेश बैस

अकोला, दि. ११: नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी थोडा कालावधी शिल्लक आहे. याबाबत आवश्यक तयारी व भरीव अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील विद्यापीठांनी देशापुढे उदाहरण उभे करावे, अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी काल येथे व्यक्त केली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत नऊ अकृषी व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झाली, त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री अब्दुल सत्तार, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, उच्च व तंत्र शिक्षण प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय धोरणाच्या तयारीचा आढावा व विद्यापीठाशी निगडित सामायिक विषयांवर यावेळी चर्चा झाली.

राज्यपाल बैस म्हणाले की, देशातील विद्यापीठांच्या रँकिंग यादीत महाराष्ट्रातील केवळ दोन विद्यापीठांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक  गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

राज्यपाल बैस म्हणाले की, विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल वेळेवर लागण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. विद्यार्थ्यांचे भवितव्य या निकालावर अवलंबून असते. ही जबाबदारी ओळखून वेळापत्रक गांभीर्यपूर्वक पाळावे. ई-समर्थ या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर व्हावा. उद्योगांची गरज ओळखून नव्या संशोधनाला चालना द्यावी. संशोधन व विकास कक्ष महाविद्यालय स्तरावर कार्यान्वित व्हावेत. कुशल मनुष्यबळनिर्मितीसाठी कौशल्य विकास व रोजगाराभिमुख शिक्षणावर भर द्यावा. डिजिटल इंडिया, स्टार्ट अप इंडियासारख्या उपक्रमांचा लाभ घ्यावा. गतिमान कार्यवाहीसाठी माहिती तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरावे, असे निर्देश त्यांनी दिले.

केंद्र शासनाच्या योजना, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राबविलेल्या योजना, संशोधन प्रकल्प आदी विविध बाबींचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू मधुसूदन पेन्ना, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एस. आर. गडाख, गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत सोकारे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उदय भोसले, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू विजय माहेश्वरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, जिल्हाधिकारी निमा अरोरा आदी उपस्थित होते.

कृषी प्रदर्शनाची पाहणी

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाला. विद्यापीठातील ज्वारी, तेलबिया, कडधान्य, कापूस, गहू आदी पिकांबाबतचे संशोधन, उद्यानविद्या, कृषी विद्या, मृद विज्ञान, काढणी पश्चात तंत्रज्ञान आदी स्टॉलची राज्यपालांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी तज्ज्ञांशी संवाद साधून कृषी संशोधनाबाबत माहिती घेतली. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी शरद जावळे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी आदी उपस्थित होते.

दरम्यान राज्यपाल रमेश बैस यांचे आज सकाळी साडेआठच्या सुमारास अकोला रेल्वे स्थानकात आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी पुप्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे कुलगुरु डॉ. शरद गडाखअमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयारपोलीस अधीक्षक संदिप घुगे, उपविभागीय अधिकारी शरद जावळेरामेश्वर पुरीमंडल रेल प्रबंधक धीरेंद्रसिंहतहसिलदार सुनिल पाटील आदी उपस्थित होते. राज्यपाल बैस यांच्या आगमनानंतर पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *