Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वाचा सीएसएमटी दुर्घटनेवर शिवसेनेचे विवेचन

वाचा सीएसएमटी दुर्घटनेवर शिवसेनेचे विवेचन

गुरुवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ असलेला हिमालय पुलाचा भाग कोसळून सहा जणांचा जीव गेला. या दुर्घटनेत ३१ जण गंभीर जखमीही झाले. या दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच दुदैवी घटनेबद्दल शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून हळहळ व्यक्त केली आहे.

“दीड वर्षांपूर्वी एल्फिन्स्टन पूल दुर्घटना घडली. त्यात 23 जणांचा बळी गेला. गेल्या वर्षी अंधेरी येथे सकाळच्या वेळी पादचारी पूल रेल्वे मार्गावर कोसळला. आता सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील ‘हिमालय’ पादचारी पूल कोसळून सहा जणांचा जीव गेला. या प्रत्येक दुर्घटनेनंतर मुंबईतील पादचारी पुलांची सुस्थिती आणि सुरक्षितता या विषयीचे प्रश्न उपस्थित झाले. त्यानुसार ऑडिट आणि दुरुस्तीचे सरकारी आदेशही निघाले. तरीही शुक्रवारची पूल दुर्घटना घडलीच. निदान आता तरी या कामांत विविध प्रशासन यंत्रणांचे ‘पायात पाय’ येऊ नयेत आणि मुंबईतील पादचारी पूल हे ‘मृत्यूचे पूल’ राहू नयेत. तरच मुंबईकरांच्या मागे लागलेले पूल दुर्घटनांचे शुक्लकाष्ठ थांबू शकेल.

मुंबई महानगरी ही अनेकांसाठी मायानगरी आहे, स्वप्ननगरी आहे. लाखो चाकरमान्यांसाठी जिवाची मुंबई आहे. मात्र हीच मुंबई अलीकडील काही वर्षांत ‘मृत्यूची मुंबई’ ठरत आहे. कोणी लोकलमधील रेटारेटीचा बळी ठरतो तर कोणी रस्त्यावरील बेशिस्त वाहतुकीचा. नैसर्गिक आपत्ती, अपघात, घातपात, दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजले आहेत. त्यात सध्या आग आणि पूल दुर्घटना या नव्या जीवघेण्या संकटांची टांगती तलवार मुंबईकरांच्या डोक्यावर आली आहे. ती कधी कोसळेल आणि किती जीव घेईल याचा नेम राहिलेला नाही. गुरुवारी अशाच एका पूल दुर्घटनेत सहाजणांचा जीव गेला. इतर 34 जण इस्पितळांमध्ये जीवन-मृत्यूचा संघर्ष करीत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक कोसळला आणि सामान्य मुंबईकरांच्या क्षणभंगुर आयुष्याचा पुरावा मागे ठेवून गेला. मुंबईचा अनियंत्रित विस्तार, प्रचंड लोकसंख्येचा येथील नागरी आणि इतर सुविधांवर पडणारा ताण, त्यामुळे बिघडलेले शहर नियोजन अशा अनेक कारणांमुळेच मुंबईची अवस्था सध्या बिकट झाली आहे. पुन्हा या नागरी सेवासुविधा, इतर व्यवस्था, त्यांची दुरुस्ती-देखभाल आणि जबाबदारी हेदेखील एक त्रांगडेच झाले आहे. मुंबई महापालिका, राज्य सरकार, म्हाडा, एमएमआरडीए, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे, नॅशनल हायवे ऍथॉरिटी वगैरे अनेक प्रशासन यंत्रणांची कामे एकाच वेळी या महानगरीत सुरू असतात. मात्र ‘अनेक पायांची शर्यत’ झाल्याने ती रखडतात. त्यातून मग एखादी दुर्घटना घडते आणि जबाबदारी आणि दोषारोपांचे बोट एकमेकांकडे दाखवले जाते. त्याचाही परिणाम कामांच्या वेगवान पूर्ततेवर आणि गुणवत्तेवर होतोच. आताही सीएसएमटीजवळील दुर्घटनाग्रस्त पादचारी पुलाचे मायबाप कोण, रेल्वे की मुंबई महापालिका, त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते की नव्हते, झाले असेल तर त्यानुसार दुरुस्ती झाली होती का, झाली नसेल तर का नाही आणि झाली असेल तर पुलावरील काँक्रीटचा भाग कोसळला कसा, पालिकेने दुरुस्तीसाठी मागितलेली एनओसी रेल्वेने दिली होती की नव्हती, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याआधीच्या पूल दुर्घटनांच्या वेळीही हेच प्रश्न विचारले गेले. त्यावर चर्चेच्या फेऱया झडल्या. जुन्या पुलांचे आणि पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार काम सुरूही झाले. तरीही शुक्रवारी पूल दुर्घटना झालीच. आता या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल, दोषींविरोधात कठोर कारवाई होईल, मृतांच्या वारसांना आणि जखमींना सरकारतर्फे अर्थसहाय्य दिले जाईल. सध्या निवडणुकीचा मोसम असल्याने विरोधी पक्ष या दुर्घटनेचेही राजकारण करताना दिसतील, पण गेलेल्या जिवांचे काय? त्यांच्या उद्ध्वस्त कुटुंबांचे काय? दुर्घटनाग्रस्त पादचारी पुलाचे ‘मायबाप’ कोणीही असो, अशा दुर्घटनांत मरण पावणारी किंवा जखमी होणारी सर्व आपलीच माणसे आहेत. या दुर्घटनेचे आणि त्यातील जीवितहानीचे दुःख आम्हालाही आहेच.

मुंबईत एकूण 314 पूल आहेत. त्यापैकी 40 नवीन आणि 274 पूल अत्यंत जुने आहेत. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील 125 पादचारी पुलांपैकी 18 पुलांनी कालमर्यादाही ओलांडली आहे. या सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यानुसार दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. तथापि सीएसएमटीजवळील पूल दुर्घटनेमुळे आता या ऑडिटवरही प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. कदाचित म्हणूनच त्यांचे पुन्हा ‘रि-ऑडिट’ करण्याचे आदेश देण्याची वेळ सरकारवर आली. हे का झाले याचा विचार सर्वच यंत्रणांनी करायला हवा. दीड वर्षांपूर्वी एल्फिन्स्टन पूल दुर्घटना घडली. त्यात 23 जणांचा बळी गेला. गेल्या वर्षी अंधेरी येथे सकाळच्या वेळी पादचारी पूल रेल्वे मार्गावर कोसळला. आता सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील ‘हिमालय’ पादचारी पूल कोसळून सहा जणांचा जीव गेला. या प्रत्येक दुर्घटनेनंतर मुंबईतील पादचारी पुलांची सुस्थिती आणि सुरक्षितता या विषयीचे प्रश्न उपस्थित झाले. त्यानुसार ऑडिट आणि दुरुस्तीचे सरकारी आदेशही निघाले. तरीही गुरुवारची पूल दुर्घटना घडलीच. निदान आता तरी या कामांत विविध प्रशासन यंत्रणांचे ‘पायात पाय’ येऊ नयेत आणि मुंबईतील पादचारी पूल हे ‘मृत्यूचे पूल’ राहू नयेत. तरच मुंबईकरांच्या मागे लागलेले पूल दुर्घटनांचे शुक्लकाष्ठ थांबू शकेल.”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *