Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

मुंबईच्या राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेतर्फे ‘क्राफ्ट बाजार’ प्रदर्शनाचे आयोजन

भारताच्या मूळ हातमाग आणि हस्तकौशल्याच्या वस्तूंचा प्रदर्शनात समावेश

मुंबई, दि. ११: भारतातील पारंपरिक आणि मूळ हातमागाची वस्त्रे आणि हस्तकौशल्याच्या उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था, मुंबईने ‘क्राफ्ट बाजार’ हे हातमाग आणि हस्तकौशल्याच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवले आहे. भारताच्या समृद्ध पारंपरिक हातमागकला आणि हस्तकौशल्याच्या वस्तूंचा उत्सव साजरा करणाऱ्या ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘नव्यासा’ या ब्रॅंडच्या उपाध्यक्ष (विपणन) आणि व्यावसायिक विभाग ब्रॅंड च्या प्रमुख प्रियांका प्रियदर्शिनी यांच्या हस्ते झाले. क्राफ्ट संकुल उपक्रम अभियानाअंतर्गत, ह्या संस्थेने देशातील कलाकार आणि विणकरांसाठी, एक विपणन मंच तयार केला आहे. या क्राफ्ट बाजारमध्ये, एनआयएफटी ने भारताच्या विविध भागातील कलाकार आणि विणकरांना या प्रदर्शनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.

क्राफ्ट बाजारमध्ये भारतातील विविध भागातून कारागीर/विणकर सहभागी झाले आहेत, यात, कर्नाटकातील बिद्री हस्तकला, बिहारमधील लोकर (मेंढीचे लोकर) हस्तकला, महाराष्ट्रातील कोल्हापुरी चप्पल आणि चामड्याची उत्पादने, लातूर, महाराष्ट्रातील बंजारा हस्तकला, चंदेरी विणकाम, मध्य प्रदेशातील गोंड आदिवासी चित्रकला, दिल्लीतील हस्तकरघा-शिबोरी, कच्छचे कारागीर, गुजरातमधील भुजोडी हातमाग, महाराष्ट्रातील सोलापूरच्या भिंतीवरील कलाकृती, औरंगाबादमधील पैठणी विणकाम, औरंगाबाद हिमरू शिल्प, महाराष्ट्रातील चित्रकथी चित्रकला, गुजरातमधील ऍप्लिक, महाराष्ट्रातील टेराकोटा, भुज, गुजरातमधील भुजोडी हस्तकला, महाराष्ट्रातील हुपरी इथले चांदीचे दागिने, आंध्र प्रदेशातील चामड्याची कठपुतळी हस्तकला, उत्तर प्रदेशमधील आग्रा इथल्या काचेच्या वस्तू आणि काश्मीरमधील विशेष सोझनी म्हणजेच पशमीना शाली, या प्रदर्शनात बघायला मिळतील.

प्रदर्शनाचे उद्घाटन करताना, प्रियांका प्रियदर्शिनी यांनी कारागिरांना त्यांच्या उत्पादनांची योग्य किंमत निश्चित करणे तसेच बाजारातील मागणीनुसार त्यांच्या उत्पादनांची श्रेणी ठरवणे, यासाठी प्रोत्साहित केले. तसेच, एनआयएफटीच्या विद्यार्थ्यांनी कारागिरांना योग्य ती मदत आणि पाठबळ देण्याचे आवाहन केले. यात डिझाइन इनपुट, ब्रँडविषयक धोरण, उत्पादनाची किंमत आणि घाऊक आणि किरकोळ विक्रीमध्ये त्यांच्या उत्पादनाचे विपणन करण्यासाठी त्यांचे मौल्यवान मार्गदर्शन देखील केले. त्याशिवाय, कारागिरांना सोशल मीडियाचा वापर करून त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी आणि त्यांना सरकारी अनुदान आणि लाभांची माहिती देण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.

एनआयएफटी चे संचालक, प्रा. (डॉ.) पवन गोद्यावाला म्हणाले की, एनआयएफटी संस्था  आपल्या विद्यार्थ्यांना भारतातील हस्तकला आणि हातमाग वारसा यांच्याशी एक सहज संवाद निर्माण करण्यावर भर देते. आमची संस्था देशातील पारंपरिक मूल्ये आणि समकालीन विचार प्रक्रिया यांच्यात अभिनव समतोल निर्माण करत, नाविन्य आणि सर्जनशीलतेवर जोर देते, असेही ते म्हणाले. एनआयएफटीच्या या ‘क्राफ्ट क्लस्टर’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि पारंपारिक हातमाग आणि हस्तकला क्लस्टर्सची ओळख करून दिली आहे, त्यामुळे तळागाळातील पारंपरिक मूल्ये, सर्जनशील नवकल्पना आणि प्रयोगांची संधी उपलब्ध झाली आहे, असेही ते म्हणाले.

या क्राफ्ट बाजारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ‘यंग चेंज एजंट’ म्हणजेच, ‘बदलाचे युवा वाहक’ बनण्याचा प्रयत्न केला आहे, हातमाग आणि हस्तकला क्षेत्रातील कौशल्यांचा वापर करून आधुनिक उत्पादने विकसित केली आहेत. अशा प्रकारच्या प्रदर्शनामुळे आणि परस्परसंवादामुळे डिझाईन क्षेत्रातील युवा व्यावसायिकांना ग्रामीण भागाशी जोडता आले आणि भारतीय संस्कृती आणि पारंपरिक सौंदर्यशास्त्राविषयीची त्यांची समज अधिकच परिपक्व झाली आहे, असेही ते पुढे म्हणाले.

आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या प्रशासकीय अखत्यारीतील राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च संस्था,ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया (TRIFED), म्हणजेच ‘भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास संघटना’ देखील या प्रदर्शनात सहभागी झाली आहे. धातूच्या वस्तू, आदिवासी कापड, मातीची भांडी, आदिवासी चित्रे आणि मातीची भांडी यासारख्या आदिवासी उत्पादनांच्या विकासाचे मार्केटिंग करून देशातील आदिवासी लोकांच्या सामाजिक-आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करणे या संघटनेचा मुख्य उद्देश आहे.

सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC), देखील प्रदर्शनता सहभागी झाली असून, त्याद्वारे खादी आणि ग्रामोद्योग आणि हस्तकला उत्पादनांच्या विक्री आणि विपणनाला प्रोत्साहन दिले जात आहे.

एनआयएफटी चे विद्यार्थी देखील प्रदर्शनात सहभागी झाले असून ‘एनआयएफटी के पिटारेसे’ या शीर्षकाअंतर्गत त्यांनी बनवलेल्या उत्पादनांचे स्टॉल लावले आहेत. यात क्रोशयाचे कपडे, विणकाम केलेले मॅक्रेम, हस्तनिर्मित दागिने, क्रोशे टॉप्स इत्यादींनी बनवलेल्या हस्तकला उत्पादनांचा समावेश आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेत हस्तकला आणि हातमाग क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. ग्रामीण आणि निम-शहरी भागात मोठ्या प्रमाणात कारागीरांना रोजगार देते आणि आपला सांस्कृतिक वारसा जतन करून देशासाठी भरीव परकीय चलन निर्माण करते. कलाप्रेमींनी प्रदर्शनाला भेट देऊन देशातील पारंपारिक हातमाग आणि हस्तकला यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन, एनआयएफटी ने केले आहे. हे प्रदर्शन उद्यापर्यंत जुहू येथील किशनचंद वालेचा हॉलमध्ये सुरू आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *