Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोरोना संसर्गाशी लढताना अर्थचक्र सुरू राहील याची दक्षता घ्या- पालकमंत्री छगन भुजबळ

कोरोना संसर्गाशी लढताना अर्थचक्र सुरू राहील याची दक्षता घ्या- पालकमंत्री छगन भुजबळ

पालकमंत्र्यांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक

मालेगावमधील परिस्थितीवर जिल्हाधिकारी, नाशिक शहरावर महापालिका आयुक्त तर जिल्ह्यातील येवल्यासह ग्रामीण भागावर जिल्हा परिषद सीईओ यांनी लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश

नाशिक: कोरोना संसर्गाची लढाई ही दीर्घकाळ चालणारी लढाई आहे, यात शासन, प्रशासनासमोर दोन प्रकारची आव्हानं आहेत. पहिले संसर्ग नियंत्रणात आणणे त्यासाठीचे उपचार व दुसरे म्हणजे कोरोना असूनसुद्धा सर्व प्रकारचे व्यवहार सुरू ठेवून अर्थचक्र कसे सुरळीत चालू राहील, याची दक्षता घेण्यात यावी. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालेगावमधील परिस्थितीवर जिल्हाधिकारी, नाशिक शहरातील बाधित क्षेत्रावर महापालिका आयुक्त तर येवला तालुका व परिसरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष केंद्रित करुन समन्वयकाची भूमिका पार पाडावी, अशा सूचना आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक शहर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, आरोग्य उपसंचालक पट्टनशेट्टी, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे, आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले, सुरूवातीला आपल्या जिल्ह्यात एकही कोरोना संसर्गित नव्हता. आज तो सर्वदूर पसरला आहे. शहरी भागातील संसर्ग आज तालुकास्तरावर ग्रामीण भागातही जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत जिल्हास्तरीय यंत्रणा व तालुकास्तरीय सर्व परिस्थितीचे अवलोकन करून प्रभावी उपाययोजना व पूर्वतयारी केली पाहिजे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रलंबित स्वॅब नमुन्यांचे अहवाल तात्काळ लवकरात लवकर मागवून पॉझिटिव्ह येणाऱ्या रूग्णांवर तात्काळ इलाज कसे करता येतील यासाठीचे नियोजन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील प्रलंबित असलेले स्वॅब नमुन्यांचे अहवाल हे स्थानिक लॅब, आंध्र प्रदेशातील किट पुरवठादार, जे.जे. रूग्णालयात नव्याने कार्यान्वित होणाऱ्या लॅबच्या माध्यमातून तात्काळ कसे प्राप्त करून घेता येतील याचे नियोजन करावे. जेजेमध्ये नव्याने होणाऱ्या लॅबमध्ये दिवसाला ३०० नमुन्यांच्या तपासणीची क्षमता नाशिकसाठी राखीव ठेवण्यात आली आहे, त्यामुळे प्रलंबित अहवालांची संख्या दिवसेंदिवस कमी होईल अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

कोविड व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी आलेल्या रूग्णाचा स्वॅब घेतल्यानंतर त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात यावी असे आयुक्त मनपा नाशिक यांनी प्रस्तावित केले. इतर आजारांचे पेशंट हे कोरोना संशयीत नाहीत, ज्यांना घरीच विलगीकरण, अलगीकरण शक्य आहे त्यांचा व ज्यांना शक्य नाही त्यांचा सारासार विचार करून निर्णय घेण्यात यावा, शासनाच्या मार्गदर्शक सूचना गरज लक्षात घेवून अंमलात आणाव्यात अशीही चर्चा बैठकीत झाली.

मालेगावपाठोपाठ आता जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. मालेगावसह येवल्याची रूग्णसंख्या चिंतेचा विषय असून तेथे एका वरिष्ठ अधिकाऱ्याची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात यावी असे भुजबळ यांनी जिल्हाधिकारी यांना सूचित केले. संसर्ग ग्रामीण भागात जास्त पसरणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. दुकाने उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळांबाबत गर्दी टाळता येईल व नागरिकांचीही सोय होईल असा निर्णय पोलिस आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी घ्यावा असेही भुजबळ यांनी सूचित केले. सध्या जिल्ह्याच्या विविध भागातून स्थलांतरितांचे लोंढे जाताहेत कायद्याची अंमलबजावणी करीत असतानाच त्यांच्याशी मानवतेच्या भावनेतून प्रशासन व जनतेने व्यवहार करावेत, असे आवाहनही यावेळी मंत्री भुजबळ यांनी केले.

वरिष्ठ अधिकारी पाहतील मालेगाव, नाशिक शहर व ग्रामीण भागाचा समन्वय : राजाराम माने

यावेळी बोलताना विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी सांगितले की, कालच जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात मालेगावसाठी समन्वयाची जबाबदारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक शहरासाठी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे व नाशिक ग्रामीणची जबाबदारी ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी पूर्वीपासूनच दररोज या क्षेत्रातील कामकाजाकडे लक्ष ठेवून आहेत, तसेच प्रत्यक्ष त्या भागांत भेटी देऊन उपाययोजना करत आहेत.

या बैठकीत झालेल्या चर्चेत प्रामुख्याने विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलिस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आरोग्य उपसंचालक पट्टनशेट्टी, जिल्हा शल्यचिकत्सक सुरेश जगदाळे यांनी जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती व त्यावरील उपाययोजनांची माहिती सादर केली .

दृष्टिक्षेपात आढावा :

# कोरोना नियंत्रणात ठेवताना अर्थचक्र सुरू राहील याची खबरदारी घ्यावी.

# प्रलंबित स्वॅबच्या नमुन्यांचे अहवाल तात्काळ प्राप्त करावेत.

# मालेगाव पाठोपाठ येवल्यावर विशेष लक्ष केंद्रीत करून स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमावा.

# दुकानांच्या वेळा बाबत गर्दी व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने फेरविचार करावा.

# कायद्याची अंमलबजावणी करीत असतानाच स्थलांतरितांना मानवतेच्या भावनेतून मानवतेने

वागणूक द्यावी.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *