“महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही” – काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला
मुंबई, दि. १९: महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार आहेत, येत्या दोन दिवसांत जागावाटपाची चर्चा पूर्ण होईल. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हाच आपला चेहरा आहे, एकजुटीने भाजपाशी लढू आणि सरकार स्थापन करू असं काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितलं. ते आज मुंबईच्या दौऱ्यावर होते. चेन्निथला यांनी मुंबईत आगमन झाल्यावर सर्वात आधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नसीम खान, आमदार भाई जगताप उपस्थित होते. ठाकरे यांच्या भेटीनंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.
यानंतर मुंबईत टिळक भवन येथे काँग्रेसची बैठक आज झाली. यात प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासह विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतले काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील उपस्थित होते.
