प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन आता जिल्हास्तरावर
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत घोषणा
मुंबई, दि. ९ : राज्यातील विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती योजना तसेच विविध उच्च शिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंदर्भातील अचूक, विश्वासार्ह आणि तांत्रिक माहिती त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटीसेल विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ही घोषणा केली.
या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर तसेच विविध जिल्ह्यांतील समन्वयक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी राज्यभर उभारण्यात येणाऱ्या विद्यार्थी सहाय्यता केंद्रांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी आणि पालकांना अनेकदा तांत्रिक अडचणी, माहितीचा अभाव किंवा चुकीच्या मार्गदर्शनाचा सामना करावा लागतो. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये जाऊन माहिती मिळवावी लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सहाय्यता केंद्र सुरू करण्यात येत असून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकूण चाळीस विद्यार्थी सहाय्यता केंद्रे उभारली जाणार आहेत. मुंबईमध्ये तीन, पुण्यात दोन आणि नागपुरात दोन केंद्रे कार्यरत राहतील. यापैकी सव्वीस केंद्रांचे काम पूर्ण झाले असून सहा केंद्रे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित आठ केंद्रेही लवकरच सुरू करण्यात येणार असून दि. १० जून २०२६ पासून या केंद्रांच्या सेवा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत.

या केंद्रांद्वारे विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षा, विविध अभ्यासक्रमांची पात्रता, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा पद्धती, वेळापत्रक, अर्ज प्रक्रिया, प्रवेश निश्चिती, दस्तऐवज पडताळणी आणि शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या शंका आणि तक्रारींचे निराकरण, प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा, तांत्रिक अडचणींचे समाधान तसेच करिअर मार्गदर्शन आणि अंदाजात्मक समुपदेशनाची सुविधा देखील उपलब्ध राहणार आहे.
केंद्रांमार्फत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, क्षमता आणि पात्रतेनुसार योग्य अभ्यासक्रम, पदवी आणि शैक्षणिक संस्थांची निवड करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच शैक्षणिक समुपदेशन, इंटर्नशिपच्या संधी, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आणि कौशल्यविकासाच्या पर्यायांविषयीही माहिती दिली जाईल.
प्रवेश प्रक्रियेशी संबंधित अर्ज भरणे, शुल्क भरणा, कागदपत्रे अपलोड करणे, प्रवेशपत्राशी संबंधित समस्या, छायाचित्र किंवा स्वाक्षरी अद्ययावत करणे, दस्तऐवजीकरणातील त्रुटी दुरुस्त करणे, देयक प्रणालीतील अडचणी दूर करणे यांसारख्या बाबींमध्येही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्था आणि परीक्षा केंद्रे यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्यासाठीही ही केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावतील. विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध झाल्यामुळे प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि विद्यार्थी-केंद्रित होण्यास मदत होणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून उच्च शिक्षणाच्या संधी अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक भविष्यासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय अधिक माहितीपूर्ण आणि आत्मविश्वासाने घेणे शक्य होणार आहे.

