आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर थेट नागरिकांशी साधणार संवाद; ५ डिसेंबरपर्यंत आरोग्य संस्थांची पाहणी, १२५ नव्या संस्थांचे लोकार्पण
मुंबई, दि. ३१ : सरकारी रुग्णालयांमधील उपचारांचा दर्जा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणींची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी राज्यभर ‘आरोग्य संवाद यात्रा’ काढण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली १ नोव्हेंबरपासून नांदेड येथे या उपक्रमाला सुरुवात होईल. ५ डिसेंबर २०२६ पर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यात आरोग्यमंत्री नागरिक, रुग्ण, आरोग्य कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींशी थेट चर्चा करणार असून, आरोग्य यंत्रणेतील त्रुटी शोधून त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील उपकेंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंतच्या आरोग्य सुविधांची स्थिती तपासली जाणार आहे. त्याचबरोबर १२५ नव्या आरोग्य संस्थांचे लोकार्पणही करण्यात येणार आहे. त्यामुळे ही यात्रा केवळ योजनांचा आढावा घेण्यापुरती मर्यादित न राहता आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष अनुभव आणि नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यावर केंद्रित असेल.
गावपातळीवरील आरोग्य आणि स्वच्छतेवर भर
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाशी या यात्रेचा समन्वय साधण्यात येणार आहे. सार्वजनिक स्वच्छता, सुरक्षित आणि शुद्ध पाणीपुरवठा, पोषण, सांडपाण्याचे व्यवस्थापन, संसर्गजन्य आजारांचे नियंत्रण तसेच आरोग्यदायी जीवनशैली याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाणार आहे.
आजारांवर उपचार करण्याबरोबरच ते उद्भवू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपायांची माहिती गावागावांत पोहोचविणे, तसेच स्थानिक पातळीवर नागरिकांचा सहभाग वाढविणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग असेल.
रुग्णालयांतील सुविधांची प्रत्यक्ष तपासणी
यात्रेदरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दोन ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाची पाहणी केली जाणार आहे. याशिवाय आरोग्य उपकेंद्रे, जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये, स्त्री रुग्णालये, मनोरुग्णालये आणि विशेष रुग्णालयांमधील सेवांचाही आढावा घेतला जाईल.
रुग्णांना आवश्यक उपचार वेळेवर मिळतात का, औषधे आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का, तसेच आरोग्य संस्थांमध्ये कोणत्या अडचणी आहेत, याची माहिती प्रत्यक्ष भेटीतून घेतली जाणार आहे.
शाळा, अंगणवाड्या आणि उपचार घेतलेल्या रुग्णांशी संवाद
राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत तपासणी झालेल्या शाळा आणि अंगणवाड्यांना भेटी देऊन या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती घेतली जाईल. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयांचीही पाहणी होणार आहे. या वेळी खासगी डॉक्टर आणि रुग्णांशी चर्चा करून योजनांचा प्रत्यक्ष लाभ कितपत मिळतो, हे जाणून घेतले जाणार आहे.
यात्रेत गृहभेटींचाही समावेश आहे. पॅलिएटिव्ह केअर घेणारे रुग्ण, सिकलसेलचे रुग्ण, संस्थात्मक प्रसूती झालेल्या माता, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया झालेली बालके, क्षयरोग व कुष्ठरोगाचे रुग्ण यांच्याशी संवाद साधला जाणार आहे.
तसेच जननी सुरक्षा योजनेचे लाभार्थी, कर्करोग तपासणीदरम्यान आढळलेले रुग्ण आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतलेल्या रुग्णांच्या अनुभवांची माहितीही घेतली जाईल.
आरोग्य समित्यांशी चर्चा; नागरिकांच्या सूचनांना प्राधान्य
प्रत्येक ठिकाणी जिल्हा एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती, विधानसभा मतदारसंघ समिती, रुग्ण कल्याण समिती, जन आरोग्य समिती किंवा ग्राम आरोग्य, पोषण व स्वच्छता समिती यांपैकी एका समितीच्या सदस्यांशी बैठक घेण्याचे नियोजन आहे.
आरोग्य सेवांबाबत स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणी, नागरिकांच्या तक्रारी आणि सुधारणा सुचविणाऱ्या बाबी समजून घेण्यासाठी या चर्चा महत्त्वाच्या ठरणार आहेत. आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय व्यावसायिक, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील समन्वय वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे.
या दौऱ्यात सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त, संचालक, सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि विविध आरोग्य योजनांचे प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांचे नियोजन अधिक परिणामकारक करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी आणि नागरिकांचा अभिप्राय महत्त्वाचा ठरणार आहे. आरोग्य संवाद यात्रेतून समोर येणाऱ्या समस्या आणि सूचनांवर प्रशासन कोणत्या सुधारणा करते, याकडे आता नागरिकांचे लक्ष असेल.

