Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बंडखोर ब्लॉग: “असा समाज डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यास लायक आहे का?”

“असा समाज डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यास लायक आहे का?” – आंध्रप्रदेशातील डॉ. राव अटक प्रकरणी निषेध व्यक्त करणारी डॉ. प्रकाश कोयाडे यांची पोस्ट वाचा

कोरोनाचं युद्ध भारतात सुरू होताना आंध्रप्रदेशातील डॉ. सुधाकर राव या भुलतज्ञाने तेथील प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणला होता. पीपीई किट्स व मास्क बाबत त्यांनी आरोग्य केंद्रातील तात्कालिक सत्य परिस्थिती मांडत मोठी खळबळ उडवून दिली होती. ज्याचं बक्षिस म्हणून त्यांना अपमानित करत कामावरून काढून टाकण्यात आलं. पुण्यातील डॉक्टर प्रकाश कोयाडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीत या संपूर्ण घटनेचा उहापोह करत ज्या समाजात हे घडतेय त्यावरही काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

वाचा डॉ. प्रकाश कोयाडे यांची संपूर्ण पोस्ट

एका डॉक्टरचे हात मागे बांधण्यात आले, त्यांना ओढत ओढत रस्त्यावर आणले गेले, मारहाण झाली. हे करणारे पोलिस होते..प्रशासन होते!
डॉ. सुधाकर राव… हे नाव कालपर्यंत माहीत असण्याचं काही कारण नव्हतं. ‘जगात प्रथमच घडतंय’ अशा बातम्या देण्यात व्यस्त असणाऱ्या मीडियाला अजूनही हे नाव घ्यायला वेळ नाही. एक डॉक्टर म्हणून माझी जबाबदारी आहे की, मी किमान निषेधतरी नोंदवावा… मला माहितीये की यापलीकडे आजघडीला काही करूही शकत नाही.
आंध्रप्रदेशातील नरसीपटनम येथील एक शासकीय वैद्यकीय अधिकारी… डॉ. सुधाकर राव (भुलतज्ञ). कदाचित दीड महिन्यापूर्वी कुठेतरी हे नाव आपल्या कानावर पडलेही होते पण या कोरोनाच्या लाटेत तेंव्हाच नकळत विसरूनही गेले होते. मार्चमध्ये जेव्हा आपला देश कोरोनामय होण्यास सुरुवात झाली होती तेव्हा आंध्रप्रदेशातील या डॉक्टरने तिथल्या सरकारविरोधात आवाज उठवला होता. त्याचं कारण होतं मास्क आणि PPE Kit! कोरोनाविरूद्धच्या लढाईत ढाल म्हणून आवश्यक असणारे N-95 मास्क आणि PPE Kit मिळत नाही म्हणून या डॉक्टरांनी तिथल्या शासन आणि प्रशासनाला प्रश्न विचारले होते. त्यांना एक मास्क पंधरा दिवस वापरण्याची सक्ती केली होती. शासन जागे व्हावे म्हणून त्यांनी अशा आशयाचा एक विडीओ सोशल मीडियात टाकला होता. त्याना जे अत्यावश्यक आहे ते मिळवून देणे तर दूरच पण आंध्रप्रदेशातील आरोग्य विभागाने डॉक्टर सुधाकर यांना सस्पेंड केले, समाजात चुकीची माहिती पसरविली म्हणून गुन्हा नोंदवून नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

ही गोष्ट एवढ्यापुरतीच थांबली नाही. आपल्या विधानावरून ते मागे हटत नव्हते म्हणून त्यांना पोलिस स्टेशनमध्ये टाकण्यात आले…पण ते एवढे सरळ नव्हते. डॉ. सुधाकर यांचे हात मागे बांधून ओढत अॉटोपर्यंत नेले. रस्त्यावर त्यांना पोलिसांकडून काठीने मारहाण करण्यात आली. सर्वात वाईट म्हणजे त्यांच्यावर मनोरूग्ण आणि ‘Alchoholic’ असा ठपका ठेवून त्यांना मनोरूग्णालयात दाखल करण्यात आले.

वातावरण तापलेले दिसताच, ज्या कोन्स्टेबलनी हे कृत्य केले त्या दोघांना सस्पेंन्ड करून प्रशासनाने आपले अंग यातून काढून घेतले.
शासनाच्या चूका, गलथान कारभार लोकांच्या नजरेत

आणून दिल्याबद्दल ही वागणूक मिळत असेल तर उद्या कोणी जीव गेला तरी तोंडातून शब्द बाहेर काढण्याची हिंमत करणार नाही. एखाद्या रस्त्यावरील गुंडालासुद्धा गर्दीतून नेतेवेळी ‘इज्जतीत’ नेले जाते इथे तर तो तुमचा ‘कोरोना वॉरियर’ आहे. उघड्या अंगाने ओढत नेऊन त्यांना मनोरूग्ण सिद्ध करणे हाच शासनाचा अट्टहास होता. जरी ते नशेत होते किंवा मनोरूग्ण होते तरी एका सरकारी डॉक्टरला पोलिसांना अशाप्रकारे मारण्याचा अधिकार राहत नाही.

शासनाची अशाप्रकारची वागणूक योग्य आहे का?
जर असेल तर असा समाज डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यास लायक आहे का?
स्वत:चा जीव धोक्यात घालून अशा समाजाला उपचारच न देणं ठीक नाही का?

डॉ. सुधाकर यांच्यासोबत जे झाले ते अत्यंत वाईट झाले पण सर्वात वाईट म्हणजे हे समोर रस्त्यावर सर्व घडत असताना शेकडो लोक पाहत होते. हे तेच लोक होते ज्यांनी काही दिवसांपूर्वी डॉक्टरांसाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या होत्या…

निषेध त्या प्रत्येकाचा!!!

डॉ. प्रकाश कोयाडे (पुणे)

(साभार डॉ. प्रकाश कोयाडे यांच्या फेसबुक वॉल वरून)

 

(सदर लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं असून ‘महाराष्ट्र वार्ता’ हे फक्त माध्यम आहे)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *