Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 9372236332

राज्यातील नोंदणीकृत ऑटोरिक्षा परवानाधारक, ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना  

राज्यातील नोंदणीकृत ऑटोरिक्षा परवानाधारक, ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना

मुंबई, दि. २७: राज्यातील परिवहन विभागातंर्गत ऑटोरिक्षा आणि मिटरटॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून यासाठी महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्वायत्त व स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी शासनाकडून एकवेळचे अनुदान ५० कोटी रुपयास मान्यता देण्यात आली आहे. या कल्याणकारी मंडळांतर्गत जीवनविमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असतांना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य योजना इत्यादी योजना राबविण्यात येणार आहे. हे मंडळ महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ या नावाने सोसायटी नोंदणी कायदा 1890 अन्वये नोंदणीकृत करण्यात येणार असून हे मंडळ परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत कार्यरत राहील.

असे आहे महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटरटॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ

या महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडून केंद्र शासनामार्फत व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑटो रिक्षा आणि मिटर टॅक्सी चालकांना देण्यात येईल. यात जीवनविमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना (रु.50 हजारांपर्यत) पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य वृद्धी योजना, ६५ वर्षांवरील ऑटोरिक्षा, मिटर टॅक्सी परवानाधारक यांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान, नविन ऑटोरिक्षा, मिटरटॅक्सी खरेदी, गृह खरेदीसाठी घेण्यात येणारे कर्ज, राज्यस्तरीय मंडळाने वेळोवेळी मान्यता दिलेल्या इतर कल्याणकारी योजना तसेच शासनाने निर्देशित केलेल्या इतर कल्याणकारी योजनांचा समावेश राहील.

मंडळाचे कार्य

महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे मुख्य कार्यालय, मुंबई येथे राहील.  या राज्यस्तरीय मंडळाचे मंत्री (परिवहन) अध्यक्ष, राज्यमंत्री (परिवहन), सचिव, प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव (परिवहन) हे सदस्य तर परिवहन आयुक्त सदस्य सचिव, लेखाधिकारी, परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई सदस्य तर नोंदणीकृत ऑटो रिक्षा आणि मिटर टॅक्सी चालक संघटनेचे २ अशासकीय सदस्य, हे राज्यस्तरीय कल्याणकारी मंडळ असतील. मंडळाची कामे  पुढील प्रमाणे राहील.

राज्यातील ऑटो रिक्षा आणि मिटर टॅक्सी चालकांसाठी सामाजिक सुरक्षेच्या योजना तयार करणे व  राबविणे, राज्यातील ऑटो रिक्षा आणि मिटर टॅक्सी चालकांसाठी सामजिक सुरक्षेच्या योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रण ठेवणे. राज्य शासन व जिल्हास्तरीय समिती यांच्यामध्ये समन्वय करणे, मंडळाच्या लाभार्थ्यांना पात्रतेबाबतचे निकष निश्चित करणे. राज्य शासनाने सोपविलेली इतर कार्य पार पाडणे, निधी संकलन व त्यावरील नियंत्रण करणे, मंडळाचे कामकाज पार पाडण्यासाठी अधिकारी, कर्मचारी नेमणूक करणे तसेच राज्यस्तरीय मंडळ व जिल्हास्तरीय समिती यांचे दैनंदिन कामकाज पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती, कार्यालयीन कामकाज इत्यादी असेल.

तर जिल्हास्तरीय कल्याणकारी समितीत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रानुसार व आवश्यकेनुसार एक किंवा एकापेक्षा जास्त जिल्हास्तरीय कल्याणकारी समिती स्थापन करण्यात येतील त्या संबंधित जिल्हाधिकारी हे अध्यक्ष, पोलीस उपायुक्त (वाहतुक)/अपर पोलीस अधीक्षक सदस्य, प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सदस्य, नोंदणीकृत ऑटो रिक्षा आणि मिटर टॅक्सी मालक यांच्या संघटनेचे प्रतिनिधी अशासकीय सदस्य तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य सचिव असतील. जिल्हास्तरीय समितीमार्फत ऑटो रिक्षा आणि मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी व सामाजिक सुरक्षेच्या योजना राबविणे, लाभार्थी म्हणून ऑटोरिक्षा, मिटर टॅक्सी चालकांची नोंदणी करणे, मंडळाच्या योजनेबाबत लाभ प्रदान करणे, लाभार्थी नोंदणी करणे तसेच जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव पात्र लाभधारकांच्या यादीस जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेवून लाभाचे वितरण करतील.

सभासद नोंदणी, सदस्यत्व रद्द करणे

ऑटोरिक्षा परवानाधारक, ऑटो रिक्षा, मिटर टॅक्सी चालकांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील परिवहन कार्यालयामार्फत याबाबतची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येईल. नोंदणीकृत चालकांना लाभ देण्यासाठी मंडळाच्या संबंधित जिल्ह्यातील कार्यालयाकडून ओळखपत्र जारी करतील. मंडळाचा सभासद होण्यासाठी अर्जदाराने महाराष्ट्र राज्यामध्ये नोंदणी असलेल्या ऑटो रिक्षा, मिटरटॅक्सी अनुज्ञप्ती व बॅच धारण केला असणे बंधनकारक राहील. पात्र अर्जदाराच्या कुटूंबातील व्यक्ती मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील. तथापि, कुटूंबातील सदस्य संख्या ही तो, ती, जोडीदार व मुले मिळून ४ पर्यंत मर्यादित राहील. जो सभासद सलग एक वर्षांपेक्षा जास्त काळ मंडळाची वर्गणी अथवा मंडळाने विहीत केलेली इतर रक्कम मंडळाकडे अदा करणार नाही. अशा सभासदाचे सभासदत्व सुनावणीची एक संधी देऊन रद्द करण्यात येईल. परवानाधारक जर अपंग झाला तर तो परवानाधारक देखील कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र राहील. परवानाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याची अनुज्ञप्ती त्याच्या कायदेशीर वारसास हस्तांतरित करण्यात येते. मयत परवानाधारकांचा कायदेशीर वारस त्यांच्याकडे अनुज्ञप्ती/बॅच नसेल तरी सदर कायदेशीर वारस कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यास पात्र राहील.

वार्षिक कल्याण मंडळासाठी प्रत्येक ऑटो रिक्षा परवानाधारक, ऑटो रिक्षा, मिटर टॅक्सी चालक, महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ वेळोवेळी वार्षिक रक्कम, वर्गणी संकलीत करेल. तसेच राज्यशासन अथवा केंद्रशासन यांच्याकडून प्राप्त होणारे अनुदान तसेच नोंदणी शुल्क व ओळखपत्र शुल्काची रक्कम ५०० राहील. सदर नोंदणी शुल्क अर्जासोबत जमा करण्यात येईल. तसेच नोंदणी शुल्क व ओळखपत्र शुल्काची रक्कम राज्यस्तरीय मंडळ यांनी वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील. वार्षिक सभासद शुल्क रक्कम रूपये ३०० राहील तसेच वार्षिक सभासद शुल्काची रक्कम राज्यस्तरीय मंडळ यांनी वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे असेल. तसेच मंडळास योग्य वाटेल अशा कायदेशिर मार्गाने निधी, देणगी स्वरुपात, कायदेशीर अनुज्ञेय स्त्रोतातून निर्माण करेल. या निधीचे संकलन मंडळाच्या कार्यालयात केवळ डिजीटल, ऑनलाईन पद्धतीने केले जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये रोखीने निधी संकलीत केला जाणार नाही.

लाभ मिळण्याची प्रक्रिया

महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या लाभासाठी चालकांनी जिल्हा कार्यालयामध्ये विहीत नमून्यात अर्ज करावा. प्रत्येक अर्ज जिल्हास्तरीय समितीकडून त्यांना दिलेल्या निकषानुसार पात्रतेसाठी तपासले जाईल. मंजूर लाभ राज्यस्तरीय मंडळाने व जिल्हास्तरीय समितीने वेळोवेळी विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार वितरीत केले जाईल.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *