Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वाचनीय : सुख म्हणजे नक्की काय असतं?

सुख म्हणजे नक्की काय असतं?

मी दादरहून कल्याणल्या यायला टिटवाळा लोकल पकडली. साधारण ३च्या सुमाराची वेळ होती. एरव्ही लोकल म्हटलं की गर्दी हे समीकरण आलंच! आणि त्यात दादर म्हटलं तर समजूनच जावं! आज रविवार असल्यामुळे थोडी शिथिलता होती. मला चढल्या-चढल्या बसायला मिळालं. कुर्ला-घाटकोपर दरम्यान मला अगदी विंडो सीट मिळाली. छान विंडोला टेकून डोळे मिटले. तेव्हढ्यात माझा डोळा लागला. कांजुरमार्ग स्टेशन आलं आणि माझे डोळे उघडले, ब-यापैकी लोकं या स्टेशनवर चढले. त्यापैकी माझ्या कंपार्टमेंटमध्ये चार पाच लोकं घुसले. त्यामध्ये एक छोटंस कुटुंब होतं. पत्नी, एक साधारणतः पाच सात वर्षांची हाताला प्लास्टर लावून हात गळ्यात घेवून असणारी मुलगी, नऊ वर्षांचा मुलगा आणि तो गृहस्थ. आल्या आल्या ती मुलगी माझ्या समोरच्या सीटवर ऍडजस्ट झाली. तिच्या बाजूला बसलेल्या माणसाने उठून तिच्या आईला बसायला दिले. मुलुंडला त्या सर्वांना बसायला मिळालं.
गाडी तिच्या वेगाने पुढे सरकत होती. माझ्या समोरच आता त्या कुटुंबातले तिघे होते. ती महिला इतकी काळीही नाही आणि इतकी गोरीही नाही अशा मधल्या रंगाची होती, त्यांच्याकडे पाहून स्पष्ट जाणवत होत की हे हातावर कमवून खाणारे लोक होते. तिच्या गळ्यात सौभाग्याच लेणं म्हणून गळ्यासरसे काळ्यामण्यांच पोत होतं. आजच्या भाषेत छोटं मणी मंगळसूत्र म्हणू, मणी तर त्यात नव्हतेच मुळी रंग उडालेलं चांदीच पेंडंट, ज्यातून त्या काळ्या रंगाचा धातू गरीबीचं दर्शन घडवत होता. ती विंडोजवळ बसली होती. बसल्या बसल्या आपल्या नव-याच्या खांद्यावर डोक ठेवूून संसाराची चिंता भविष्यावर टाकून एका मोठ्या विश्वासान ती झोपली होती. तो मध्ये, त्याच्या डाव्या हाताला त्याची पत्नी आणि उजव्या हाताला हात फ्रँक्चर झालेली मुलगी, समोरच म्हणजे माझ्या बाजूला बसलेला मुलगा. तो बिचारा माणूस मला साधा वाटत होता. काळा रंग, साध क्रिम रंगाच शर्ट, काळी पँट,आणि पायात झिनलेली चप्पल. तो सारखा सारखा आपल्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत होता. मी म्हटलं काय आजारी आहे का हा? त्याने मला सांगितलं हो ताप, जुलाब आणि उलट्या होत आहेत. मी दुसरा प्रश्न विचारणार इतक्यात त्यानेच उत्तर देवून टाकल की आत्ताच त्याला डॉक्टरकडून आणलय त्याच्या आवाजातल्या व्याकुळतेने मन अगदी कळवळून निघालं. मी त्या मुलाला माझी खिडकीजवळची जागा दिली आणि म्हटल की उलटी झाली तरी चालेल घाबरू नको लगेचच तो बिचारा म्हणाला तुमचे कपडे खराब होतील मी म्हटलं कपडे काय धूवून वापरताही येतील मी त्या मुलाकडे वळून म्हटले तू रिलँक्स रहा. तिकडे एक हात मुलीच्या खांद्यावर दुस-या खांद्यावर बायकोच डोकं आणि ती काळजीपूर्ण मुलावरची नजर!हा अख्खा क्षण मी डोळ्यात साठवून घेत होतो. थोडावेळ विचार करत होतो की एखाद्या अंबानीच्या, टाटाच्या किंवा बिर्लाच्या मुलांना तरी या गरीब बापाच श्रीमंत प्रेम कधी भेटलं असेल का? त्यांची मुल चिक्कार उड्या मारूनही त्यांच्या पप्प्या घेत असतील, लव यू डॅड म्हणत असतील पण बापाशी एक शब्द न बोलता फक्त डोळ्यातून प्रेम व्यक्त करणारी मध्यम वर्गातल्या मुलांसारखी आपल्या मात्या पित्यांवर प्रेम करत असतील का? माझ्या भावना हेलावून उठत होत्या ती निरागस मुलगी पाय पुढे मागे करत होती माझ्या पायाला चूकून तिचा पाय लागला त्याबरोबर त्या साध्या भोळ्या बापाने मला सॉरी म्हणत तिचा पाय मागे घेतला. आज तो माणूस मला त्याच्या विश्वातला राजा वाटत होता, सर्व जबाबदारी आपल्या शिरावर घेवून सीमेवर लढणारा सैनिक वाटत होता. कि तुम्ही झोपा मी आहे. आता काही हरकत नव्हती त्यांच्या आयुष्यात कितीही वादळं आली तरी ती झेलण्याची ताकत या कुटुंबात होती कारण त्यांच्या कुटुंबाचा भक्कम पायाच मुळी प्रेम आहे. प्रेमच अशक्यप्राय वाटणा-या गोष्टी सहज शक्य करतं. नको त्या वेळी या लोकलला सिग्नल लागतो आज थोडावेळ अजून लागला असता तर या रेल्वे वाल्यांच काय जात होत? मी मनातल्या मनात स्वतःशीच पुटपुटलो थोडी थांबली असती म्हणजे या कुटूंबाला अधिक न्याहळता आलं असतं. गाडी झर-झर झर-झर पुढे जात होती. आणि कानावर एकच आवाज आला ‘अगला स्टेशन कल्याण’ नाइलाजाने का होईना आता मला उतराव लागणार होतं.
मी मनातल्या मनात त्या कुटुंबाकडे पाहून कृतकृत्य होत प्लॅटफॉर्म उतरू लागलो.
कस असत ना नेहमी आपण राजकारण, समाज, जात, धर्म, परंपरा, संस्कृती, पक्ष, माझ यातच अडकून पडलेलो असतो. खरा आनंद, खरं समाधान ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच असते. एकमेकांची काळजी, एकमेकांवरचा विश्वास हेच जगण्याच एकमेव कारण असू शकतं ना! काय इतकीसी साधी गोष्ट आपण कुटुंबासाठी करू शकतो?

उत्तम कदम

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *