Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘अंकुर’ : अक्षदा ताईंच्या मायाळू कुशीत वाढणारं

अंकुर : अक्षदा ताईंच्या मायाळू कुशीत वाढणारं

बघता – बघता २०१८ कधी संपलं ते कळलंच नाही. नवीन वर्षाचं स्वागत प्रत्येक जण काही तरी नवीन करून करत असतो. त्याचप्रमाणे आमच्या सोसायटीतील कार्यशिल मित्र मंडळाने सुध्दा काही तरी नवीन करायचं ठरवलं. सर्वजण आप-आपल्या पध्दतीने आपल्या कल्पना मांडत होते. त्यातुनच एक कल्पनापुढे आली ती म्हणजे “अंकुर”…. सर्वानी एक मताने अंकुरला मान्यता दिली. ६ जानेवारी म्हणजे रविवार चा दिवस सर्वांच्या सहमतीने ठरला. अगदी लहान चिमुरड्यां पासुन ते साठी ओलांडलेल्या वृध्दांपर्यत सर्वजण ६ जानेवारीची आतुरतेने वाट बघत होते. आम्हा सर्वांसाठी रविवार चा दिवस खुप खास ठरणार होता, आणि त्याच अपेक्षेने सर्वजण आप आपल्या पध्दतीने तयारी करत होते. कामाची यादी तयार झाली सर्वांनी आपली कामे वाटून घेतली. आम्हा तरुण मुलांपेक्षा आमची चिमुरडी मुलं मोठ्या जिद्दीने आम्हाला मदत करत होती. अंकुर म्हणजे काय? हे त्यांना माहिती ही नव्हतं आणि ते समजण्याएवढे ते वयाने तेवढे मोठे ही नाहीत तरीसुध्दा आपल्याला रविवारी कुठे तरी बाहेर फिरायला जायचं आहे ह्या एकाच उद्देशाने ती सर्व चिमुरडी काम करत होती. सोसायटीतील प्रत्येक व्यक्ती आपल्या पध्दतीने अंकुर साठी गहु, तांदुळ, शालेय वस्तू, खेळणी, रोजच्या वापरातील वस्तू अशा प्रकारे काही ना काही तरी देत होते. रविवारचा दिवस उगवला, सर्वजण बरोबर सकाळी ५ च्या ठोक्याला सोसायटीच्या आवारात जमले आणि तयारी सुरु झाली अंकुरच्या जेवणासाठी… अंकुरसाठी मस्त नॉन-व्हेज बिर्याणी तयार होत होती. आमच्या कार्यशिल मित्र मंडळाच्या तरुण मुलांच्या हातचं जेवण म्हणजे हॉटेलच्या जेवणाला ही मागे टाकेल असं… सकाळी ठिक ११ वाजता सर्वजण अंकुरच्या दिशेने जाण्यास रवाना झाले. अंकुरचा रस्ता जवळ येताच सर्वांच्या बाईकचा स्पीड हळूहळू कमी झाला होता. आंनद आणि भितीचं एकत्रीकरण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतं. कित्येक दिवसापासुन ज्या अंकुरची वाट सर्वजण बघत होते आज त्याच अंकुरच्या गेटजवळ आम्ही उभे होतो. गेटवर पोहचताच खोलीतील सर्व लहान मुले एकामागे एक बाहेर येऊ लागली. आम्ही सर्व एकमेकांसाठी अनोळखी होतो, तरी सुध्दा त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आमच्यासाठी फार अनमोल होतं. त्या गोंडस निरागस मुलांकडे बघुन आमच्यातील कित्येक व्यक्तींचे डोळे पाणावले. ज्या वयात आपल्या आई – वडीलांच्या मायेत लहानपण मस्त आरामत मजेत घालवायचं त्याच वयात नशिबाने त्यांची सर्व सुख त्यांच्यापासुन हिरावुन घेतली, आणि अनाथ म्हणून जगण्याच्या उंबरठयावर सोडून दिलं. ह्याच अनाथपणाच्या उंबरठयावर त्या गोंडस मुलांना मायेचा ओलावा दिला तो अक्षदा भोसलेंनी. अक्षदा भोसले यांनी २८ डिसेंबर २०१६ रोजी टिटवाळा येथे अंकुर बालविकास केंद्राची स्थापना केली. अंकुरची उभारणी करताना त्यांना अनेक अडचणी आल्या, पण या अडचणींवर मात करत त्यांनी खंबीरपणे अंकुरची निर्मिती केली. आज त्यांना त्यांच्या या कार्यात पवन किरंगे व अतीश जाधव मदत करत आहेत. दोन-तीन मुलांवर सुरू केलेल्या अंकुरमध्ये आज जवळपास तीस ते चाळीस मुलं आहेत. अक्षदा ताईंनी ह्या लहान गोंडस मुलांवर इतके छान संस्कार व सवयी त्यांच्या अंगी रूजू केल्या आहेत की दोन मिनीटे आम्हालाही नवलच वाटलं. आम्ही त्यांच्या जेवणाच्या वेळेत पोहचलो होतो. ताईंनी सर्व मुलांना जेवणाची सुचना दिली. अगदी सैन्यातील जवानाच्या शिस्तीप्रमाणे ती मुल एकामागे एक उभी राहुन जेवणासाठी आपले हात स्वच्छ करुन चटईवर शांतपणे मांडी घालून बसली. आम्ही मुलांना जेवण वाढण्यासाठी सुरुवात केली. आमच्या हालचालीकडे ते शांतपणे बघत होते. त्यांच्यात आपआपसात काहीतरी कुजबुज चालू होती, ते आम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. जेवण वाढून झाल्यावर सर्व मुलांनी हात जोडून प्रार्थना म्हंटली. संस्काराच्या बाबतीत ही मुले इतर मुलांपेक्षा सर्वात पुढे होती.

आम्ही सर्वजण हळूहळू त्यांच्यात गुंतत जात होतो. त्यांना काय हवं काय नको याबाबत मनापासुन विचारपुस करत होतो. तेवढयात हळूच एक आवाज आला. ओ दादा… मला एक चिकनचा तुकडा मिळेल का??? आमच्यातील एकजण त्याला चिकन वाढणार तेवढयात त्याच्या बाजूला बसलेला एक लहान मुलगा त्याला समजावत बोलला दादा असा हट्ट नाही करायचा सर्वाना पुरल पाहिजेत ना जेवण… जमतेम पाच – सहा वर्षाचा असेल. पण त्याचा तो समजुतदारपणा आम्हाला ही लाजवेल असा होता. एवढ्या लहान वयात एवढा समजुतदारपणा कुठून आला असेल हा आमच्या समोरचा आता पर्यंतचा सर्वात मोठा प्रश्न होता. परिस्थिती माणसाला अनेक गोष्टी शिकवते त्याच परिस्थितीतुन माणुस मोठा होत असतो हे आजपर्यत ऐकलं होतं आज अनुभवायला सुध्दा मिळाल. सर्वांच जेवण झाल्यावर आम्ही व आमची लहान मुले त्या मुलांसोबत मनसोक्त खेळायला लागलो. पकडापकडी, कब्बडी, झुकझुक गाडी ह्या खेळात आम्ही सर्व कधी मग्न होत गेलो ते आम्हाला कळालच नाही. त्यानंतर मुलांनी मस्त मज्जा करत डान्स केला. मुलींनी एक सोबत एक सुरात गायलेल गाणं म्हणजे जणु एखादया टिव्ही वरील गाजलेल्या गायकाचा आवाज… अगदी सुरेख आवाज होता त्या मुलींचा. कौतुकाची बाब म्हणजे त्यांचा ताल…सूर… अगदी सोबत, कोणी मागे नाही तर कोणी पुढे नाही. अंकुर मधील एक मुख्य वैशिष्टय म्हणजे आस्था… अंकुर मधील सर्वात लहान सदस्य म्हणजे आस्था, ही फक्त चार महिन्याची मुलगी. तिचं हास्य पाहताच सर्व दु:खं विसरायला झालं. अक्षदा ताई व त्यांचे सर्व सहकारी या सर्व मुलांचे संगोपन अगदी आपल्या स्वतःच्या मुलांप्रमाने करतात.

मुलांमध्ये रमताना दिवस कधी संपत आला ते कळलंच नाही. परत घरी जाताना सर्वांचे पाय जड झाले होते. त्या चिमुकल्यांना सुध्दा कळाल होतं आता ह्यांचा परतीचा प्रवास सुरु होईल. हळूहळू त्यांच्या चेहर्यावरील हास्य सुध्दा एखादया फुलाप्रमाणे कोमेजु लागलं होत. अंकुरमध्ये गेल्यावर एक गोष्ट नक्की कळाली. एखादया व्यक्तीला मदत ही फक्त आर्थिक किंवा वस्तु ऐवढीच मर्यादित न राहता त्या मदतीतला भावनिकतेचा दर्जा ही तितकाच उत्तुंग असायला हवा आणि तो आपण देऊ शकतो. अंकुरमध्ये असलेल्या या मुलांसाठी आपलं प्रेम, सहवास ही सुध्दा खुप मोठी गोष्ट आहे. ती सर्व मुले अनाथ जरी असली तरी मनाने ती आपल्यापेक्षा अधिक श्रीमंत आहेत. त्यांच्यातील समजुतदारपणा खरंच खुप वाखणण्याजोगा आहे. अंकुरमधली मोठी मुलं त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलांची अगदी आईच्या मायेप्रमाणे काळजी घेतात. त्या सर्वांमध्ये असलेला जिव्हाळा, आपुलकी ही आजच्या माणसांमध्ये अजिबात राहिली नाही. एवढं असुन सुध्दा मनामध्ये एक ना अनेक प्रश्नांची घालमेल सुरूच आहे. आईच प्रेम आणि वडीलांची सावली ह्या मुलांना कधी मिळू शकेल का? प्रत्येक सणांना, आंनदाच्या दिवशी आपलं असं कुणीच मायेचं नसल्याचं दुःख त्यांना आयुष्यभर सलत राहील ना? आई- वडीलांच्या प्रेमाशिवाय जीवन जगताना मनावर उमटलेले घाव आयुष्यभर त्यांना बोचत राहतील ना?

“सांग मला रे सांग मला, आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला?”

नियतीने लादलेल्या या अनाथ मुलांना कधी कळेल का ‘गदिमां’ च्या या कवितेचा अर्थ???

  • सोनाली केदू भवर

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *