Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कृषी पर्यटन : रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ

जाणून घ्या राज्याच्या पर्यटन विभागाचा अनोखा उपक्रम

सध्याच्या धावपळीच्या युगात विशेषतः शहरातील नागरिकांना विरंगुळा हवा असतो. परंतु हा वेळ केवळ रिकामा न घालवता त्याला निसर्गाच्या सानिध्यात राहता आले आणि त्यातही पारंपरिक आणि आधुनिक शेतीची माहिती घेता आली तर विरंगुळ्याबरोबरच माहितीपूर्ण पर्यटनाची सुवर्णसंधी साधता येईल. त्याचबरोबर शेतकरी आणि संबंधितांना रोजगारदेखील उपलब्ध होईल. रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ साधण्याचा हाच प्रयत्न पर्यटन विभागाने केला आहे.

राज्याच्या पर्यटन विभागाने नुकतेच आपले कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. या धोरणामुळे शहरी पर्यटकांना शेतीची प्रत्यक्ष भेटीतून माहिती, शेतकऱ्यांच्या जीवनाचे दर्शन, ग्रामीण संस्कृतीशी ओळख असा अनुभवांचा ठेवा मिळतोय. शेतीची कामे कशी चालतात त्याचा स्वतः अनुभव घेऊन निसर्गाशी मैत्री करण्याची संधी मिळतेय आणि निरामय आयुष्य जगण्याची प्रेरणा देखील मिळतेय.

आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विभाग व कृषी पर्यटन विकास कंपनी (एटीडीसी) संयुक्त विद्यमाने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १६ मे रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कृषी पर्यटन विकासाशी संबंधित कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात राज्यात नाविन्यपूर्ण पद्धती वापरून यशस्वीरित्या कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रयत्नांना व कल्पनांना पुरस्कृत केले जाणार आहे.

कृषी-पर्यटन ही एक उदयोन्मुख आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी संकल्पना आहे. कृषी पर्यटनामुळे नवीन अर्थाजनाच्या संधी निर्माण होत आहेत. याद्वारे गावांचा शाश्वत विकास होईल. २०२० मध्ये धोरणाची अंमलबजावणी झाल्यापासून, गेल्या दोन वर्षांत केवळ ऑनलाइन कृषी पर्यटन परिषद झाली होती, यंदा कोविडबाबतचे नियम शिथील झाल्याने आणि उद्योगधंद्यांना संजीवनी मिळाल्याने प्रत्यक्ष कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यामध्ये अनेक कृषी पर्यटन केंद्र संचालकांना कृषी पर्यटन विकासासाठीच्या उपाययोजनांविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल.

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे नेहमी सांगतात, आपल्या राज्यात बर्फ आणि वाळवंट सोडले तर पर्यटनाच्या सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. गड किल्ले, थंड हवेची ठिकाणे, समुद्र किनारे, डोंगर दऱ्यांनी संपन्न निसर्ग, ऐतिहासिक वास्तू आदींसह वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती ही देखील महाराष्ट्राची विशेष ओळख आहे. अजिंठा वेरूळ सारख्या लेण्या, बिबीका मकबरा, पाणचक्की, लोणार सरोवर, प्राचीन मंदिरे, अष्टविनायकाची ठिकाणे, देशातील ज्योतिर्लिंगांपैकी प्रमुख मंदिरे यांची जागतिक स्तरावर कीर्ती आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर रिसॉर्टच्या माध्यमातून राहण्याची उत्तम सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पर्यटनाच्या या पारंपरिक साधनांना राज्याच्या पर्यटन विभागाने नावीन्यपूर्ण कल्पनेची जोड देऊन साहसी पर्यटन, कॅराव्हॅन, बीच शॅक्स, कृषी पर्यटन आदींच्या माध्यमातून पर्यटन विकासाची धोरणे जाहीर केली आहेत. यातील कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांना व्यावसायिक लाभ तर होतोच शिवाय रोजगार निर्मितीबरोबरच पर्यटनाची आणखी एक संधी उपलब्ध होत आहे.

पर्यटन संचालनालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात सध्या ३५४ कृषी पर्यटन केंद्र कार्यरत आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांच्या रोजगारात सुमारे २५ % वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कृषी पर्यटन केंद्रांवर भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या काही लाखांमध्ये आहे. इतकेच नाही तर कृषी पर्यटनातून विशेषतः ग्रामीण भागातील सुमारे एक लाख महिला आणि तरूणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कृषी पर्यटन केंद्रांमुळे केवळ शेतकऱ्यांच्या जीवनाला नव्हे तर संपूर्ण गावाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला हातभार लागल्याचे पुणे, रायगड, सातारा अशा अनेक जिल्ह्यांमध्ये अनुभवायला आले आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.

कृषी पर्यटन विकास हे करिअरचे अनोखे क्षेत्र ठरू शकते. म्हणूनच या क्षेत्रातील विविध पैलूंची माहिती इच्छुकांपर्यंत पोहचवण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील मार्गदर्शक या कार्यक्रमात पर्यावरण पूरक उपक्रम आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये कृषी पर्यटनाची भूमिका अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या नव्याने आणि वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, ज्यांची माहिती करून घेण्यासाठी अधिकाधिक तरूणांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पर्यटन संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *