
अभिनव कला महाविद्यालयाचे सहा. अधिव्याख्याता राजेंद्र ढवळे यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा
या बाबतचे सविस्तर वृत्त असे कि, राजेंद्र ढवळे हे गेली २६-२७ वर्षे पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात रेखा व रंगकला विभागात कार्यरत आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती होत नसल्यामुळे त्यांनी आधी मागासवर्गीय कक्ष(पुणे), सामान्य प्रशासन विभाग(मंत्रालय), राष्ट्रीय अनुसूचित आयोग(नवी दिल्ली) व कला संचालनालय(महाराष्ट्र राज्य) इत्यादी ठिकाणी दाद मागितली होती. संबंधित विभागांनी दिलेल्या आदेशांचे पालन संबंधित संस्था व प्राचार्य यांच्यामार्फत केले जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर ढवळे यांनी पीठासीन अधिकारी, शाळा न्यायाधिकरण पुणे यांच्याकडे २०१६ साली अपील दाखल केले. यावेळी त्यांनी डिसेंबर २००५ सालापासून विलास मच्छिन्द्र चोरमाले यांना दिलेली पदोन्नती हि शासन निर्णयाच्या विरुद्ध असून त्यांच्यापेक्षा सेवा ज्येष्ठ असल्यामुळे आपल्याला अधिव्याख्याता या पदावर पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी आपल्या अपिलात केली होती. या अपिलावर दि. १९ एप्रिल २०१८ रोजी मा. पिठासीन अधिकारी, शाळा न्यायाधिकरण(पुणे) यांनी राजेंद्र ढवळे यांच्या बाजूने निकाल देत याबाबत योग्य ती कार्यवाही संस्था स्तरावर करण्याचे आदेश पारित केले. परंतू, अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य व भारतीय कला प्रसारिणी सभा यांनी सदर आदेशाप्रमाणे अंमलबजावणी न केल्यामुळे अखेर ढवळे यांनी २०१८ साली मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायमूर्ती संदीप व्ही. मारणे यांच्यासमोर दि. १० ऑक्टोबर २०२३ रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली व दहा दिवसांनी म्हणजेच दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी न्यायालयाने निकाल जाहीर केला. यावेळी शाळा न्यायाधिकरणाने दिलेला निकाल मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आला.