बनावट जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी कला संचालनालयाच्या आदेशाने चौकशी समिती गठीत; राजकीय दबावाला बळी न पडण्याचे समितीसमोर आव्हान
पुणे, दि. २८: पूजा खेडकर प्रकरणामुळे जागं झालेल्या प्रशासनाने बोगस जात प्रमाणपत्रांबाबतच्या प्रकरणांत कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पुणे येथील प्रतिष्ठित अशा भारतीय कला प्रसारिणी सभेच्या अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल भिमराव कोळी उर्फ राहुल भिमराव बळवंत यांनी नोकरीवर रुजू होताना बोगस जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याचा गंभीर आरोप याच महाविद्यालयाचे अधिव्याख्याता राजेंद्र ढवळे व सामाजिक कार्यकर्त्या मनीषा धारणे यांनी जुलै २०२२ साली केले होते. या संबंधी राजेंद्र ढवळे व मनीषा धारणे यांनी राज्याचे कला संचालनालय आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता. अखेर तब्बल दोन वर्षानंतर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. राजेंद्र ढवळे यांनी उपलब्ध केलेल्या माहितीनुसार दि. ०९/०९/२०२४ रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार राज्याच्या कला संचालनालयाने राहुल भिमराव कोळी उर्फ राहुल भिमराव बळवंत यांच्याशी संबंधित बनावट जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचे आदेश निर्गमित केले.
नेमकं प्रकरण काय?
अभिनव कला महाविद्यालायचे प्राचार्य राहुल भिमराव बळवंत/कोळी यांची १० ऑक्टोबर २००६ रोजी अनुसूचित जमाती प्रवर्ग (महादेव कोळी) अंतर्गत अभिनव कला महाविद्यालयाच्या सहाय्यक अध्यापक पदि नियुक्ती करण्यात आली होती. या पदासाठी जुलै २००६ साली निवड झाल्यानंतर, राज्याच्या कलासंचालनालयाद्वारे निर्गमित आदेशाप्रमाणे त्यांनी सहा महिन्यांच्या आत आपले जात वैधता प्रमाणपत्र जर सादर केले तरच त्यांना नियुक्ती पत्र मिळणार होते. अन्यथा त्यांची नियुक्ती नियमाप्रमाणे रद्दबातल ठरणार होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या नियुक्तीपूर्वी एक बनावट जात वैधता प्रमाणपत्र क्र. २८७७० (Dated – २९/०९/२००६) अभिनव महाविद्यालयास जमा केल्याचा गंभीर आरोप अधिव्याख्याता राजेंद्र ढवळे यांनी २०२२ साली केला होता. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या महितीनुसार कॉलेजच्या रेकॉर्ड मध्ये राहुल कोळी(बळवंत) यांची दोन जात वैधता प्रमाणपत्र होती. त्यात हे एक जूनं बनावट प्रमाणपत्र जे एका दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे नोंद असल्याची माहिती आरटीआय अंतर्गत मिळाली. याचसोबत तपासणी दिनांक २/५/२००९ रोजीचे जात वैधता प्रमाणपत्र (क्र. ०८१९५३) असे दुसरे नवे प्रमाणपत्र रेकॉर्ड ला होते. अभिनव कला महाविद्यालयाच्या प्रशासनाने अधिव्याख्यात्यांची माहिती देताना काही कागदपत्रांवर जाहीररीत्या राहुल बळवंत/कोळी(Rahul Balwant Koli) यांनी सादर केलेल्या २/५/२००९ सालच्या प्रमाणपत्राचा उल्लेख केलेला आढळतो. इथेच खरी गोम आहे. जर त्यांची नियुक्ती २००६ साली झाली होती, तर २००९ सालचे प्रमाणपत्र मागाहून अभिनवच्या प्रशासनाने प्राचार्य राहुल कोळी/बळवंत यांच्याकडून कोणत्या आधारावर जमा करून घेतले? बनावट प्रमाणपत्र तत्कालीन कला संचालक प्रा. न. बा. पासलकर यांच्या कार्यकाळात जमा करण्यात आले होते असे ढवळे यांचे म्हणणे आहे. यामुळे नियमाप्रमाणे राहुल कोळी/बळवंत यांनी नियुक्तीपूर्वी जात वैधता प्रमाणपत्र राज्याच्या कला संचालनालयाकडे जमा केले नसेल तर त्यांची सहाय्यक अधिव्याख्यातापदी केलेली तत्कालीन नियुक्तीच अवैध ठरते. जर कॉलेज प्रशासन मानतं की हे (बनावट) प्रमाणपत्र कोळी(बळवंत) यांनी १०/१०/२००६ ला सहाय्यक अधिव्याख्याता पदि नियुक्ती होण्यापूर्वी दिलं होतं तर मग हे प्रमाणपत्र खरे आहे की खोटे याची खातरजमा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद/संभाजीनगर मार्फत का करण्यात आली नाही असा सवालही राजेंद्र ढवळे व मनीषा धारणे यांनी केला आहे. या संबंधी जेव्हा माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज केला गेला तेव्हा, कला संचालनालयातर्फे २००६ साली तत्कालीन कला संचालक प्रा. न. बा. पासलकर यांनी अभिनव महाविद्यालय व राहुल कोळी/बळवंत यांना पाठवलेली पत्र आणि राहुल कोळी यांनी २००६ साली नियुक्तीपूर्वी सादर केलेली जात वैधता प्रमाणपत्राची बनावट प्रत धारणे यांना उत्तरादाखल देण्यात आली नव्हती. त्यामुळे हे महत्वाचे दस्तऐवज कला संचालनालयातील कोणा अधिकाऱ्याने गायब तर केले नाहीत ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.
कला संचालनालयाने प्रकरणाचे गांभीर्य ओळखत उशिरा का असेना उचलेल्या या महत्वपूर्ण पावलामुळे अधिव्याख्याता राजेंद्र ढवळे यांनी समाधान व्यक्त केले आहे. या प्रकरणात भारतीय कला प्रसारिणी सभेचे सचिव पुष्कराज पाठक हे राहुल भिमराव कोळी उर्फ राहुल भिमराव बळवंत यास सुरुवातीपासून पाठीशी घातल असल्याचा आरोप राजेंद्र ढवळे यांनी केला आहे. आपल्या इशाऱ्याप्रमाणे राहुल कोळी/बळवंत कोणतेही काम करत असल्यामुळे त्याच्यावर पाठक यांनी अद्याप कारवाई केलेली नाही. पुष्कराज पाठक व संस्थेशी संबंधित इतर सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या विरोधात फसवणुकीप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६८, ४७१ व ३४ अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद यापूर्वी झालेली आहे. एक गुन्हेगार दुसऱ्या गुन्हेगाराला पाठीशी घालतोय असं म्हणायला वाव आहे असा टोला राजेंद्र ढवळे यांनी लगावला आहे.
ज्यावेळी या प्रकरणात तक्रार करण्यात आली त्यावेळी कला संचालनालयातर्फे निरीक्षक पदी असलेल्या संदीप डोंगरे यांची चौकशीकामी नियुक्ती करण्यात आली होती. परंतू, त्यांच्याकडून झालेल्या विलंबामुळे अखेर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे दाद मागण्यात आली. या सबंध प्रकरणात कारवाईसाठी संदीप डोंगरे यांच्या कडून एवढा विलंब का लावला गेला हे अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवाय आताही जी चौकशी समिती नेमली गेली आहे तिच्यावर राजकीय दबाव टाकला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. चौकशी समितीमधील सदस्यांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत.