शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी यासाठी अचूक पंचनाम्यांवर भर
छत्रपती संभाजीनगर : पावसाअभावी सोयाबीनचे पीक पूर्णपणे करपल्याचे चित्र शेकटा मंडळातील गाढे जळगाव येथे पाहायला मिळाले. या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी पंचनामे अचूकपणे करण्याचे निर्देश शासनाने दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
शुक्रवारी (२ ऑक्टोबर) बावनकुळे यांनी शेकटा मंडळातील गाढे जळगाव येथे भेट देऊन शेतातील पिकांची स्थिती जाणून घेतली. गावातील गट क्रमांक ३७६ मधील उस्मान खान पठाण यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची त्यांनी पाहणी केली. पाण्याअभावी संपूर्ण पीक करपल्याने शेताचे मोठे नुकसान झाल्याचे यावेळी दिसून आले.
या पाहणीदरम्यान आमदार अनुराधा चव्हाण, आमदार नारायण कुचे, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकटेश राठोड, तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम शासनाने तातडीने सुरू केले आहे. महसूल विभागासह संबंधित यंत्रणा सध्या या कामात गुंतली असून, नुकसान नोंदविताना कोणतीही त्रुटी राहू नये, यावर भर दिला जात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
पंचनाम्यांच्या आधारे शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नुकसानग्रस्तांना मदतीची रक्कम शक्य तितक्या लवकर मिळावी, यासाठीही कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांशी बोलताना स्पष्ट केले.
दुष्काळी परिस्थितीत पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष शेतातील नुकसानीची नोंद आणि पंचनाम्यांची अचूकता महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे शासनाकडून सुरू असलेल्या पंचनाम्यांच्या प्रक्रियेकडे बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

