पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन व्यक्त केले सांत्वन; प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना शिक्षा देण्याची मागणी
ठाणे, दि. ०२: ठाण्यातील मानपाडा येथे शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. राजकीय मतभेद आणि संघर्ष असले, तरी त्यातून हिंसाचार घडून एखाद्याचा जीव जाणे योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. या प्रकरणातील खऱ्या दोषींना शिक्षा झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे मानपाडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्येच्या तपासात विविध बाबी समोर येत असून, पोलिसांकडून अनेकांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
पूर्णेकर कुटुंबीयांशी संवाद साधल्यानंतर गणेश नाईक यांनी या प्रकरणाचा सखोल तपास होण्याची गरज व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची दखल घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. तपासात जे खरे दोषी आढळतील, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल, असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला.
‘राजकीय संघर्ष जीवघेणा नसावा’
राजकारणात मतभेद आणि संघर्ष असू शकतात; मात्र त्याचे रूपांतर हिंसाचारात होऊ नये, असे नाईक यांनी म्हटले. कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केल्याने त्यांचे दुःख कमी होणार नाही, याची जाणीव असल्याचेही त्यांनी सांगितले. या हत्येमागे कोणी सूत्रधार असल्यास त्यांचाही शोध घेऊन त्यांना कायद्याच्या चौकटीत आणले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
प्रदीप पूर्णेकर कोणत्या राजकीय पक्षात होते, यापेक्षा त्यांची सामाजिक कार्यकर्ता म्हणून असलेली ओळख महत्त्वाची असल्याचे नाईक यांनी नमूद केले. शिवसेनेत असतानापासून पूर्णेकर यांच्याशी आपले संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले. पूर्वी आपला मतदारसंघ असलेल्या परिसरातील या घटनेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास करावा
या हत्येच्या घटनेत वेगवेगळ्या शक्यता तपासण्याची गरज असल्याचे सांगत नाईक यांनी पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रकरणातील सर्व संबंधित बाबींची चौकशी करून सत्य समोर आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी तपास सुरू असताना आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात कोणाची भूमिका काय होती, याचा तपासातून उलगडा होणे महत्त्वाचे ठरणार आहे. दोषींवर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त करत नाईक यांनी पूर्णेकर कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

