देशभरातील ४८ शिक्षकांची निवड; ५ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, दि. २२ : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगळ्या पद्धतीने काम करणाऱ्या देशभरातील ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील बीड, नाशिक, लातूर आणि सातारा जिल्ह्यांतील प्रत्येकी एका शिक्षकाचा या राष्ट्रीय सन्मानात समावेश आहे. शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून हा पुरस्कार दिला जातो. अध्यापनातील नावीन्य, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, शाळेच्या गुणवत्तेत केलेली भर आणि सामाजिक बांधिलकी अशा विविध निकषांचा विचार करून यंदाच्या मानकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील चार शिक्षक राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी
डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे – बीड
केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयात कार्यरत असलेल्या डॉ. कविता गिट्टे यांनी दिव्यांग विद्यार्थी, ऊसतोड कामगारांची मुले तसेच इतर वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केले आहे. अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना विद्यार्थ्यांची शाळा सोडण्याची प्रवृत्ती कमी करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.
कुंदा जयवंत बच्छाव – नाशिक
नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक १८च्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्यासाठी कुंदा बच्छाव यांनी विविध उपक्रम राबविले. ‘मिशन मोबाईल-फ्री’अंतर्गत ‘ज्ञानभिंती’ आणि ‘आनंदवली शिक्षण कट्टा’ यांसारखे उपक्रम राबविण्याबरोबरच अमेरिकेतील शाळांशी ‘ई-ट्विनिंग’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणला. त्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या विविध अनुभवांशी जोडण्याची संधी मिळाली.
वैभव वसंतराव कुलकर्णी – लातूर
पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे कार्यरत असलेल्या वैभव कुलकर्णी यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, विज्ञान-तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शालेय तसेच राष्ट्रीय पातळीवरील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
शिवप्रसाद अरविंद टिंगरे – सातारा
सैनिक स्कूल, सातारा येथील शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वक्षमता आणि देशसेवेची भावना विकसित करण्यासाठी विशेष योगदान दिले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी लष्करी क्षेत्रात करिअर करण्याची आकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांना दिशा दिली.
तीन स्तरांवरून झाली निवड
यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन स्तरांवर पार पडली. पात्र शिक्षकांकडून १५ जून ते २० जुलै २०२६ या कालावधीत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय संकेतस्थळावर स्व-नामांकन मागविण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेले प्रयत्न, अध्यापनातील नावीन्य, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी राबविलेले उपक्रम, शाळेच्या गुणवत्तावाढीतील योगदान आणि वंचित घटकांसाठी केलेले कार्य या बाबींच्या आधारे उमेदवारांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यानंतर अंतिम ४८ शिक्षकांची निवड करण्यात आली.
विज्ञान भवनात होणार पुरस्कार सोहळा
५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीतील विज्ञान भवनात विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते निवड झालेल्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला जाईल.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याची ओळख करून देणारे लघुपटही सोहळ्यात दाखविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन, शिक्षण मंत्रालयाची ‘स्वयं प्रभा’ वाहिनी तसेच अधिकृत वेबप्रसारण आणि सामाजिक माध्यमांवर केले जाणार आहे.
राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या या ४८ शिक्षकांच्या कार्यातून अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सामाजिक, बौद्धिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाला दिलेले महत्त्व अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा यामध्ये झालेला समावेश राज्याच्या शिक्षण क्षेत्रासाठीही विशेष उल्लेखनीय ठरला आहे.

