संसद मोर्चाप्रसंगी दिल्ली पोलिसांकडून झालेल्या हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा तातडीच्या सुनावणीस नकार
नवी दिल्ली, दि. २२ : दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर होत असल्याचा आरोप असलेल्या पोलिसी कारवाईविरोधात दाखल करण्यात आलेल्या तातडीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने त्वरित सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. आंदोलकांवर दिल्ली पोलिसांकडून होत असलेल्या कथित मारहाणीचे व्हिडीओ सर्वोच्च न्यायालयाने स्वतः पाहावेत आणि या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी, अशी मागणी एका वकिलाने न्यायालयात केली होती. मात्र, या मागणीवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट भूमिका मांडत न्यायालयाकडे अशा प्रकारचे व्हिडीओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचे सांगितले.
दिल्लीत नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असून, आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून २० जुलै रोजी आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांकडून लाठीमार झाल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यात अनेक आंदोलक जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात तातडीची याचिका दाखल केली. या याचिकेत आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कथित मारहाणीचा उल्लेख करण्यात आला असून, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईचे अनेक व्हिडीओ उपलब्ध असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने हे व्हिडीओ स्वतः पाहावेत आणि या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी युक्तिवाद सुरू असताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी वकिलांना मध्येच थांबवत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. “व्हिडीओ पाहायला न्यायालयाला रस नाही. कारण आमच्याकडे तितका वेळच नाही,” असे त्यांनी सांगितले. तसेच “न्यायालयाचा आणि स्वतःचा वेळ वाया घालवू नका,” असा सल्लाही त्यांनी याचिकाकर्त्या वकिलाला दिला.
दरम्यान, या प्रकरणाच्या संदर्भात कॉकरोच जनता पार्टीच्या स्थापनेचीही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. १५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयातील एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्या वक्तव्याचा व्यापक विरोध झाल्यानंतर १६ मे रोजी सरन्यायाधीशांनी स्पष्टीकरण देत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे म्हटले होते.
मात्र, त्याच दिवशी राजकीय रणनीतीकार अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टी स्थापन करण्याची घोषणा केली. त्यानंतर या संघटनेला अल्पावधीत मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला. सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण आणि विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याचे सांगितले जात असून, नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.
दरम्यान, आंदोलकांकडून पोलिसांच्या कारवाईवर सातत्याने आक्षेप घेतला जात असताना, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यामुळे या आंदोलनाच्या पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
