अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
नवी मुंबई, दि. २१ : नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती २०२५–२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध पदांच्या भरती परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच दि. २१ आणि २२ जुलै २०२६ रोजी पार पडणार असल्याचे नवी मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांनुसारच परीक्षा प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
महापालिकेच्या सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत गट-अमधील १५, गट-बमधील ३ आणि गट-कमधील २ अशा एकूण २० संवर्गांतील १३२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदांसाठी राज्यभरातून एकूण १९ हजार २२० अर्ज प्राप्त झाले असून, पात्र उमेदवारांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
ही परीक्षा टीसीएस आयओएन या नामांकित संस्थेमार्फत सहा जिल्ह्यांतील तेरा परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांपासून मुक्त राहावी यासाठी महापालिकेने व्यापक नियोजन केले आहे.
भरती प्रक्रिया सुरळीत आणि काटेकोरपणे पार पाडण्यासाठी सहा जिल्ह्यांमध्ये आठ समन्वय अधिकारी आणि तेरा निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संबंधित परीक्षा केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याशिवाय, परीक्षेदरम्यान इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या सुरक्षा विभागाच्या मान्यतेने सर्व परीक्षा कक्षांमध्ये मोबाईल जॅमर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित संपर्क किंवा तांत्रिक गैरवापर होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नवीन सेवाभरती नियमावली मंजूर होईपर्यंत सुरू असलेली नियमित भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयामुळे परीक्षेची तयारी केलेल्या उमेदवारांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासन स्तरावरून सर्वसाधारण सभेचा निर्णय निलंबित करण्यात आला आहे.
त्यामुळे नियोजित भरती परीक्षा पूर्वनियोजित तारखांना आणि ठरलेल्या वेळेनुसारच पार पडणार असून, सर्व संबंधित उमेदवारांनी त्याची नोंद घ्यावी, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले की, महापालिकेची संपूर्ण भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष आणि काटेकोर पद्धतीने राबविण्यात येत आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवा, अपप्रचार किंवा अनधिकृत माहितीकडे दुर्लक्ष करून केवळ महानगरपालिकेच्या अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवावा.
भरती प्रक्रियेविषयीची अद्ययावत माहिती, परीक्षा संदर्भातील सूचना आणि आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत सामाजिक माध्यमांवरील पानांवर नियमितपणे माहिती तपासावी, असेही आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, भरती प्रक्रियेची विश्वासार्हता, पारदर्शकता आणि गुणवत्ता कायम राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय, तांत्रिक आणि सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या असून, उमेदवारांनी आत्मविश्वासाने आणि नियोजित वेळेनुसार परीक्षेला उपस्थित राहावे.
