कचरावेचक महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व ‘नमस्ते’ योजनेची सुरुवात
मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र लोकभवनच्या पुढाकाराने आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियानाला आज महत्त्वपूर्ण सुरुवात झाली. या अभियानांतर्गत चेंबूर येथील फाईन आर्ट सोसायटी परिसरात कचरावेचक महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. याच कार्यक्रमात कचरावेचक महिलांच्या आरोग्य संरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि सक्षमीकरणाच्या उद्देशाने ‘नमस्ते’ योजनेचाही शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते तसेच अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत कचरावेचक महिलांना आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड आणि सुरक्षित कामकाजासाठी आवश्यक वैयक्तिक संरक्षक साहित्य (पीपीई किट) वितरित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे कचरावेचक महिलांना आरोग्य सेवा अधिक सुलभ व्हावी, तसेच त्यांचे व्यावसायिक आरोग्य सुरक्षित राहावे, हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
‘टीबी मुक्त मुंबई’ अभियानाचा मुख्य भर क्षयरोगाचे लवकर निदान, नियमित तपासणी, उपचारांपर्यंत सहज पोहोच आणि जनजागृती यावर आहे. विशेषतः कचरावेचक महिला आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना आरोग्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. आरोग्य तपासणीसह आवश्यक वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन आणि विविध शासकीय आरोग्य योजनांची माहितीही लाभार्थ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमात कचरावेचक महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या सुशीला साबळे, नगरसेविका व प्रभाग समितीच्या अध्यक्षा आशा मराठे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती म्हापसेकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. किरण दिघावकर तसेच देवनार परिसरातील मोठ्या संख्येने कचरावेचक महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाद्वारे कचरावेचक महिलांना नियमित आरोग्य तपासणी, वैद्यकीय सुविधा, आरोग्य विमा संरक्षण आणि सुरक्षित कार्यपद्धती यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. यासोबतच शासनाच्या विविध आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
राज्यात क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टाला गती देण्यासाठी अशा उपक्रमांची व्याप्ती वाढविणे, जोखीम असलेल्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे, यासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांना पुढेही प्राधान्य दिले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

