भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी दरम्यान झालेल्या सामंजस्य करार कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन
रत्नागिरी, दि. ५ : रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन, उद्योग, व्यापार आणि वाहतूक क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या रत्नागिरी विमानतळ प्रकल्पाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण प्रगती झाली असून भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यात आज सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे विमानतळ प्रकल्पाचे सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या तीन महिन्यांत रत्नागिरी विमानतळावरून विमानाचे पहिले टेकऑफ होईल, अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. तसेच, पर्यटन क्षेत्राला जागतिक दर्जाची चालना देण्यासाठी पुढील एक वर्षाच्या कालावधीत रत्नागिरीमध्ये पंचतारांकित हॉटेल उभारणीची प्रक्रिया सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी शहरातील हॉटेल सावंत पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, भारतीय तटरक्षक दलाचे कुणाल नाईक, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, माजी आमदार विनय नातू, उद्योजक, व्यापारी, पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी राज्य शासनाकडून १० ते १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. रत्नागिरी विमानतळ हा केवळ वाहतुकीचा प्रकल्प नसून संपूर्ण कोकणाच्या आर्थिक विकासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी रत्नागिरीमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येत असून ‘ताज’, ‘ओबेरॉय’ किंवा ‘हयात’ यांसारख्या नामांकित पंचतारांकित हॉटेल समूहांना येथे गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन दिले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय वन विभागाच्या जागेवर पर्यावरणपूरक ॲडव्हेंचर पार्क उभारण्यात येणार असून, त्यामध्ये झाडावरील रेस्टॉरंट हे प्रमुख आकर्षण असेल.
स्थानिक महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही या प्रकल्पातून प्राधान्य दिले जाणार आहे. विमानतळ परिसरात महिला बचत गटांनी तयार केलेल्या स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी स्वतंत्र दालने उपलब्ध करून दिली जाणार असल्याने स्थानिक हस्तकला, खाद्यपदार्थ आणि इतर उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे.
विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर रत्नागिरीचा जागतिक कीर्तीचा हापूस आंबा, काजू आणि इतर कृषी व प्रक्रिया उद्योगांतील उत्पादने देश-विदेशातील बाजारपेठांमध्ये जलद गतीने पोहोचू शकतील. त्यामुळे स्थानिक शेतकरी, उद्योजक आणि निर्यातदारांना मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या वेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, “मी रायगडचा पालकमंत्री असताना नवी मुंबई विमानतळ आणि सिंधुदुर्गचा पालकमंत्री असताना चिपी विमानतळ सुरू झाले. आता रत्नागिरीचा पालकमंत्री म्हणून येथील विमानतळ सुरू होत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. रत्नागिरीला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर म्हणाले, “विमानतळामुळे पर्यटनासोबतच स्थानिक उत्पादनांच्या निर्यातीला मोठी मदत होईल. जागतिक आकडेवारीनुसार, विमानतळ १० वर्षे यशस्वी चालल्यास त्या भागाच्या जीडीपीमध्ये थेट ८ टक्के वाढ होते. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणानुसार प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर आमचा भर आहे.”
भारतीय तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर कुणाल नाईक यांनी विमान सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील स्वच्छता आणि पर्यावरण व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले, “लष्करी आणि नागरी विमान वाहतुकीसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि अनुकूल वातावरण राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. परिसरात स्वच्छता राखून पक्षांमुळे होणारा विमानांचा धोका शून्यावर आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी यांनी केले, तर प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यापारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, पर्यटन व्यवसायिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नागिरी विमानतळ प्रकल्पाच्या प्रगतीमुळे कोकणातील पर्यटन, उद्योग, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि निर्यात क्षमतेला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, हा प्रकल्प जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
