“भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची स्त्री शिक्षणाची परंपरा एसएनडीटीने समृद्ध केली” – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
पुणे, दि. ५ : भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी उभारलेल्या स्त्री शिक्षणाच्या महान परंपरेला पुढे नेत एसएनडीटी महिला विद्यापीठाने शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात देशासाठी आदर्श कार्य उभे केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे विद्यापीठ बहुविषयक शिक्षण, संशोधन, उद्योजकता आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे वाटचाल करत असून देशातील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळविण्याची क्षमता त्यामध्ये असल्याचा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केला.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १११ व्या स्थापना दिनानिमित्त कर्वे रस्ता येथे आयोजित विशेष कार्यक्रमात भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याच कार्यक्रमात ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’ चे उद्घाटनही करण्यात आले. या वेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, राज्यसभा सदस्य डॉ. मेधा कुलकर्णी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव, कुलसचिव प्रा. डॉ. विलास नांदवडेकर, व्यवस्थापन परिषद व शैक्षणिक परिषदेचे सदस्य, प्राध्यापक, माजी विद्यार्थीनी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, “भारतरत्न महर्षी कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य हे सामाजिक परिवर्तनाचे नव्हे तर राष्ट्रनिर्मितीचे कार्य होते. स्त्री शिक्षणाद्वारे महिलांचे सक्षमीकरण हा विकसित भारताचा पाया आहे. विद्यापीठांनी केवळ अध्यापन केंद्र न राहता संशोधन, नवोपक्रम, समस्या निराकरण आणि राष्ट्रनिर्मितीची केंद्रे बनले पाहिजेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, हवामान बदल, आरोग्य, कृषी आणि सामाजिक उद्योजकता यांसारख्या क्षेत्रांत विद्यार्थिनींनी संशोधन व नवोपक्रमावर भर द्यावा.”
राज्यपालांनी पुढे सांगितले की, ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’ हे संशोधनाचे उद्योगांमध्ये, कल्पनांचे उपयुक्त उपायांमध्ये आणि तरुणांच्या संकल्पनांचे स्टार्टअपमध्ये रूपांतर घडवून आणणारे प्रभावी व्यासपीठ आहे. विकसित भारत २०४७ चे ध्येय गाठण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील विकास अत्यावश्यक असून, उच्च शिक्षण संस्थांनी नवोपक्रम आणि उद्योग यांच्यात मजबूत दुवा निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची भक्कम पायाभरणी केली. त्या विचारांचे संस्थात्मक रूप म्हणजे एसएनडीटी महिला विद्यापीठ होय. आज महिलांनी विज्ञान, संशोधन, संरक्षण, प्रशासन, उद्योग, विमान वाहतूक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यामागे शतकापूर्वी पेरलेल्या स्त्री शिक्षणाच्या बीजांचे मोठे योगदान आहे. विकसित भारताच्या निर्मितीत महिलांचे नेतृत्व निर्णायक ठरणार असून या प्रवासात एसएनडीटी महिला विद्यापीठाची भूमिका महत्त्वपूर्ण राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यसभा सदस्य डॉ. मेधा कुलकर्णी यांनी महर्षी कर्वे यांनी स्वतःच्या आचरणातून समाजसुधारणेचा आदर्श घालून दिल्याचे सांगत विद्यापीठाने महिला शिक्षण, नवोपक्रम आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून निर्माण केलेली समृद्ध परंपरा गौरवास्पद असल्याचे नमूद केले. कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने राबविलेल्या विविध शैक्षणिक आणि संशोधनात्मक उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
प्रास्ताविकात कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव यांनी महर्षी कर्वे यांचा पुतळा हा त्यांच्या विचारांचा आणि स्त्री सक्षमीकरणाच्या चिरंतन मूल्यांचा प्रेरणास्त्रोत असल्याचे सांगितले. ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’ मुळे उद्योग, शासन, स्टार्टअप, संशोधक आणि विद्यार्थिनी यांना एकत्र आणणारी सक्षम नवोपक्रम परिसंस्था निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार उपक्रमांचा सविस्तर आढावाही उपस्थितांसमोर मांडला.
कार्यक्रमात विद्यापीठातील विविध ज्ञानशाखांमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थिनी, प्राध्यापक तसेच प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्थापना दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनीत विद्यार्थिनींनी विकसित केलेले विविध संशोधन प्रकल्प, तंत्रज्ञानाधारित उत्पादने आणि नवोपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमानंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी विद्यार्थिनींच्या संशोधनाधारित प्रकल्पांची आणि प्रदर्शनीची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थिनींची कल्पकता, संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमशीलतेचे त्यांनी विशेष कौतुक केले. महिला शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योजकतेची जोड देत विकसित भारताच्या निर्मितीत एसएनडीटी महिला विद्यापीठ अधिक प्रभावी भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
