मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले स्पष्टीकरण
मुंबई, दि. ४ : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे दोन महिने उलटले असतानाच पहिल्या जोरदार पावसानंतर काही ठिकाणी खड्डे दिसून आल्याने या प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक अभियांत्रिकी आणि जागतिक दर्जाच्या मानकांचा दावा करत १ मे रोजी हा प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र कनेक्टर परिसरात पडलेल्या खड्ड्यांचे छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, “मिसिंग लिंकवर खड्डे पडलेत, कनेक्टरजवळ दोन खड्डे पडलेत, बाकी कुठेही खड्डे नाहीत. मात्र काही लोकांना आनंद आहे की, कुठल्याही गोष्टीला खूप मोठं करायचं. कुठलंही काम झाल्यावर आणि पहिला पाऊस झाल्यावर दुसरी लेयर येते. त्या पावसामध्ये रस्त्याची टिकण्याची क्षमता टेस्ट करण्यात येत आणि काय अडचणी येतील, ते टेस्ट करत असतो. परिणामी, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ त्यामुळे हरकत नाही, एमएसआरडीसी योग्य काळजी घेईल.”
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, “नवीन उड्डाणपुल केल्यावर त्याठिकाणी मास्टिक एस्फाल्ट सुरुवातीला जमा होते. त्यानंतर योग्य पद्दतीने चालते. केलेलं काम सेटल करावे लागते, या इंजिनिअरिंगच्या गोष्टी आहेत. कुठे काही कमतरता असतील तर दूर करता येतील. पण देशातील सर्वात उंच पूल, देशातील सर्वात रुंद बोगदे, डॅमच्या खाली बोगदा हे पहिल्यांदा आपण करुन दाखवलंय. त्यामुळे निव्वळ टीका करणं योग्य नाही.”
या प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर तो मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि वाहतूककोंडीमुक्त करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आधुनिक बोगदे, उंच पूल आणि प्रगत अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारण्यात आलेल्या या मार्गामुळे प्रवासाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला होता.
दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कनेक्टर परिसरात काही ठिकाणी खड्डे दिसून आल्याने सामाजिक माध्यमांवर या प्रकल्पाबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षांनी कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. दुसरीकडे, शासन आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात येतील तसेच मार्गाच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक ती काळजी घेतली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
अभियांत्रिकी तज्ज्ञांच्या मते, नव्याने तयार करण्यात आलेल्या काही रस्ते व उड्डाणपूल प्रकल्पांमध्ये पहिल्या पावसाळ्यानंतर पृष्ठभागाची तपासणी करून आवश्यक सुधारणा करणे ही नियमित देखभाल प्रक्रियेचा भाग असू शकते. अशा वेळी आढळलेल्या त्रुटी त्वरित दुरुस्त करून रस्त्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता अधिक मजबूत केली जाते.
सध्या संबंधित विभागाकडून मार्गावरील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि देखभाल कार्य सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

