संस्थानच्या विविध विकासकामांचा घेतला आढावा
पुणे, दि. २६ : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज श्रीक्षेत्र आळंदी येथे भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेत राज्यातील जनतेच्या सुख, समृद्धी आणि सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. दर्शनानंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत सविस्तर बैठक घेऊन श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासाशी संबंधित विविध प्रस्ताव, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, पायाभूत विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला.
बैठकीदरम्यान संस्थानच्या विश्वस्तांनी श्रीक्षेत्र आळंदी येथे वाढत्या भाविकांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, मंदिर परिसर विकास तसेच संस्थानसमोरील विविध प्रलंबित विषयांबाबत सविस्तर निवेदन उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केले. या सर्व मागण्यांवर शासन स्तरावर सकारात्मक विचार करून संबंधित विभागांशी समन्वय साधत योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की, श्रीक्षेत्र आळंदी हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून वर्षभर लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. भाविकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विकासाशी संबंधित विविध प्रस्तावांवर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.
बैठकीत विशेषतः श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर दर्शन बारीचा गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला विषयही चर्चेला आला. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित विभागांमार्फत आवश्यक प्रक्रिया गतीने पूर्ण केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
श्रीक्षेत्र आळंदी हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख आध्यात्मिक केंद्र असून आषाढी आणि कार्तिकी वारीसह विविध धार्मिक सोहळ्यांमध्ये लाखो वारकरी येथे दाखल होतात. त्यामुळे मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, निवास, दर्शन व्यवस्था आणि भाविकांसाठी आवश्यक सेवांचा सातत्याने विस्तार करण्यावर शासनाचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे, तसेच आजी-माजी पदाधिकारी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर लोंढे, पुरुषोत्तम पाटील, ॲड. रोहिणी पवार, वारकरी संप्रदायातील मान्यवर आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन स्तरावर सकारात्मक भूमिका घेण्यात येत असून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रस्तावांवर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे बैठकीत पुन्हा अधोरेखित करण्यात आले.

