नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई, दि. ४ : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, मुंबई महानगर प्रदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात ४ ते ६ जुलै या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून, सखल भाग, घाटमार्ग आणि नदी-नाल्यांच्या परिसरात विशेष सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याच कालावधीत सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सततच्या पावसामुळे काही भागांत पाणी साचणे, स्थानिक वाहतुकीत अडथळे निर्माण होणे, झाडे कोसळणे, दरडी घसरणे तसेच काही ठिकाणी किरकोळ संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि विशेषतः घाटरस्त्यांवर वाहन चालविताना अत्यंत दक्षता घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाची तीव्रता वाढल्यास स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक वस्तूंची पूर्वतयारी ठेवावी, नदी, ओढे आणि पूरप्रवण भागांपासून सुरक्षित अंतर राखावे तसेच वीज पडण्याच्या शक्यतेमुळे उघड्या जागी थांबणे टाळावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक तेव्हाच समुद्रात जावे, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तातडीने स्थानिक प्रशासन किंवा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक
- बृहन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन: १९१६
- पालघर जिल्हा हेल्पलाईन: ०२५२५-२९७४७४ / ८२३७९७८८७३
- ठाणे महानगरपालिका हेल्पलाईन: ०२२-२५३६४७७९ / ०२२-२५३०१७४० / ९३७२३३८८२७
- ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष: १८००-२२२-१०८ / ८६५७८८७१०१
- पनवेल महानगरपालिका हेल्पलाईन: ०२२-२७४५८०४० / ०२२-२७४५८०४१ / ०२२-२७४५८०४२
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत हवामान अंदाज आणि प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसाच्या संभाव्य परिस्थितीचा विचार करून प्रत्येकाने स्वतःची आणि कुटुंबीयांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने जपावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

