साकीनाका दुर्घटनेने पालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह
मुंबई, दि. २ : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर साकीनाका परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने शहरातील सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. साकीनाका येथील खैरानी रोडवर उघड्या ठेवलेल्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाला. सुमारे तीन तास चाललेल्या बचावकार्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही चित्रफीतही समोर आली असून, त्यामध्ये संबंधित मॅनहोलचे झाकण उघडे असल्याचे आणि त्याजवळ दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे दिसून येते. त्याचवेळी अस्लम शेख चालत येताना थेट उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याचे चित्रफितीत दिसते. व्यक्ती मॅनहोलमध्ये पडताच तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात येते आणि तो तत्काळ मॅनहोलमध्ये डोकावून पाहताना दिसतो.
खैरानी रोडवर दुरुस्तीचे काम सुरू असताना घडली दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात मॅनहोलच्या देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यासाठी मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. त्याचदरम्यान मोबाईलवर बोलत असलेले अस्लम शेख यांचा तोल जाऊन ते अंदाजे वीस ते पंचवीस फूट खोल मॅनहोलमध्ये पडले. ही घटना लक्षात येताच तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने महानगरपालिका, अग्निशमन दल आणि बचाव पथकाला माहिती दिली. त्यानंतर तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली.
सुमारे तीन तासांच्या बचावकार्यानंतर बाहेर काढले
बचाव पथकाने मॅनहोलच्या प्रवाहाचा मागोवा घेत शोधमोहीम राबवली. अखेर अस्लम शेख यांना पुढील मॅनहोलमधून बाहेर काढण्यात यश आले. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक माहितीनुसार, व्यक्ती मॅनहोलमध्ये पडल्यानंतर पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे ते पुढील मॅनहोलपर्यंत वाहून गेले होते. त्यामुळे शोधमोहीम अधिक गुंतागुंतीची ठरली.
बॅरिकेड नसल्याचा आरोप; निष्काळजीपणावर प्रश्न
घटनास्थळी दुरुस्तीचे काम सुरू असताना मॅनहोलभोवती पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती, असा आरोप स्थानिक नागरिक आणि मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. उघड्या मॅनहोलजवळ बॅरिकेड, इशारा फलक किंवा सुरक्षिततेची इतर साधने नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे उघडा मॅनहोल नागरिकांच्या नजरेस न पडल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मृताच्या भावाचा गंभीर आरोप
घटनेनंतर मृताचे भाऊ यांनी संताप व्यक्त करत सांगितले की, “पाऊस वाढल्यामुळे माझा भाऊ घरी परतत होता. त्या ठिकाणी काही काम सुरू होते; पण नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. बॅरिकेड नव्हते, कोणतीही सूचना नव्हती. उघड्यावर काम सुरू होते आणि त्यातच माझा भाऊ मॅनहोलमध्ये पडला.”
घटनास्थळी अधिकारी आणि बचाव यंत्रणा दाखल
दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, महानगरपालिकेचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, संबंधित कामातील सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे मुंबईतील विविध भागांमध्ये पाणी साचणे, उघडे मॅनहोल आणि रस्ते दुरुस्तीची कामे यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

