डीआरआयकडून वन्यजीव तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश; विविध कारवाईत संरक्षित वन्यप्राण्यांची सुटका, आरोपी वनविभागाच्या ताब्यात
नागपूर, दि. २७ : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटअंतर्गत कार्यरत नागपूर प्रादेशिक युनिटने वन्यजीवांच्या बेकायदेशीर तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका संघटित तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दि. २४ आणि २५ जून २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत सर्वोच्च संरक्षण प्राप्त असलेल्या अनेक वन्यजीवांची सुटका करण्यात आली असून संबंधित व्यक्तीला पुढील कारवाईसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रॅकेट मलबार जायंट स्क्विरल, इंडियन स्टार कासव, रानकोंबडा आणि स्मॉल इंडियन सिव्हेट या संरक्षित वन्यजीवांच्या बेकायदेशीर व्यापारात सहभागी असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली.
कारवाईदरम्यान श्रीकाकुलम शहरात संशयित व्यक्तीला अडवून त्याच्याकडून पिंजऱ्यात बंदिस्त अवस्थेत ठेवण्यात आलेल्या चार मलबार जायंट स्क्विरल, एक इंडियन स्टार कासव आणि चौदा रानकोंबडे यांची सुटका करण्यात आली. या कारवाईनंतर मिळालेल्या माहितीनुसार डीआरआयचे पथक श्रीकाकुलमपासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावरील रायकुरडी गावातील दुर्गम भागात पोहोचले.
या परिसरात वीजपुरवठा नसणे, मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसणे आणि अत्यंत खडतर भौगोलिक परिस्थिती अशी अनेक आव्हाने असतानाही अधिकाऱ्यांनी रात्रभर शोधमोहीम सुरू ठेवली. या कारवाईत तेथून स्मॉल इंडियन सिव्हेटच्या दोन पिल्लांची सुरक्षित सुटका करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, मलबार जायंट स्क्विरल, स्मॉल इंडियन सिव्हेट आणि इंडियन स्टार कासव या प्रजातींचा समावेश वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील अनुसूची-१ मध्ये करण्यात आला आहे. या कायद्यानुसार या प्राण्यांची शिकार करणे, बाळगणे, वाहतूक करणे अथवा व्यापार करणे हा गंभीर गुन्हा असून त्यांना देशातील सर्वोच्च कायदेशीर संरक्षण प्रदान करण्यात आले आहे.

सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या व्यक्तीसह सुटका करण्यात आलेल्या सर्व वन्यजीवांना पुढील आवश्यक कारवाईसाठी श्रीकाकुलम वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. वनविभागाकडून या प्राण्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या वन्यजीवांची तस्करी प्रामुख्याने बेकायदेशीर पाळीव प्राणी व्यापार आणि दुर्मिळ प्रजातींचा संग्रह करण्याच्या उद्देशाने केली जाते. अशा अवैध व्यापारामुळे जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होतो तसेच नैसर्गिक अधिवासातील संरक्षित प्रजातींच्या अस्तित्वावर गंभीर परिणाम होतो.
डीआरआयने यापूर्वीही विविध राज्यांमध्ये वन्यजीव तस्करीविरोधात सातत्याने कारवाया केल्या असून राज्य वनविभाग आणि इतर अंमलबजावणी यंत्रणांच्या समन्वयातून अशा बेकायदेशीर जाळ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
वन्यजीव संरक्षण ही केवळ शासकीय यंत्रणांची जबाबदारी नसून नागरिकांचाही त्यात महत्त्वाचा सहभाग असल्याचे अधोरेखित करत डीआरआयने नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यजीवांची बेकायदेशीर तस्करी, विक्री अथवा संशयास्पद हालचालींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तात्काळ संबंधित कायदा अंमलबजावणी यंत्रणांना कळवावी. भारतातील वन्यजीव संपत्तीचे संरक्षण आणि वन्यजीवांवरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डीआरआयने स्पष्ट केले आहे.


