मिफ्फ-२०२६ निमित्त मराठी लघुपट व माहितीपटांचा विशेष महोत्सव; चित्रनगरीकडून १९ कलाकृतींचे प्रदर्शन
मुंबई, दि. १६ : मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ-२०२६) च्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने मराठी लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नवोदित तसेच प्रस्थापित दिग्दर्शकांच्या कलाकृतींना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात एकूण १९ निवडक लघुपट आणि माहितीपटांचे प्रदर्शन होणार आहे.
या विशेष महोत्सवाचे उद्घाटन १६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात होणार आहे. महोत्सव १६ जून ते २० जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला असून, दररोज सायंकाळी ६.३० वाजता चित्रपटांचे प्रदर्शन होईल. मात्र १९ जून रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मराठी चित्रपट क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण लघुपट आणि माहितीपटांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच नवोदित चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘मायबाचे आशीर्वाद’, ‘मेतकूट’ आणि ‘नेहमीच’ हे लघुपट तसेच ‘फड’ हा माहितीपट प्रदर्शित केला जाणार आहे. १७ जून रोजी ‘वेणी’, ‘जास्वंद’, ‘पॅम्पलेट’ आणि ‘अर्जुन’ हे लघुपट, तर ‘महाल्ले’ हा माहितीपट दाखविण्यात येईल.
१८ जून रोजी ‘ब्रह्मकमळ’, ‘गढूळ’, ‘डीयर २०२’ आणि ‘१७ वे वर्ष’ हे लघुपट तसेच ‘फड’ या माहितीपटाचे प्रदर्शन होणार आहे. १९ जून रोजी ‘पाणखोल’, ‘अर्जुन’, ‘डोंगर पाणी’ आणि ‘दारवठा’ हे लघुपट प्रेक्षकांच्या भेटीस येतील. महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे २० जून रोजी ‘वाघ’, ‘सापशिडी’, ‘मुक्ता’ आणि ‘दारवठा’ या लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
या चित्रपटांमधून ग्रामीण जीवनशैली, सामाजिक वास्तव, मानवी नातेसंबंध, सांस्कृतिक परंपरा, बदलती जीवनमूल्ये आणि समकालीन सामाजिक प्रश्नांचे विविध पैलू प्रभावीपणे मांडले जाणार आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटप्रेमींसाठी हा महोत्सव एक वेगळी आणि समृद्ध सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा विशेष उपक्रम मराठी लघुपट आणि माहितीपट निर्मितीला चालना देणारा ठरणार असून, नव्या पिढीतील दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांना आपल्या कलाकृती व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची संधी उपलब्ध करून देणार आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकार, विद्यार्थी, चित्रपट अभ्यासक आणि सर्वसामान्य प्रेक्षकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

