सोसायट्या आणि संस्थांमध्ये विशेष माहिती अभियान
नवी मुंबई, दि. १२ : केंद्र सरकारच्या नव्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची अंमलबजावणी देशभरात १ एप्रिल २०२६ पासून सुरू झाली असून, या नियमांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. स्वच्छतेच्या क्षेत्रात देशातील आघाडीच्या शहरांपैकी एक असलेल्या नवी मुंबईत या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध सोसायट्या, गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष जाऊन नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून ते ११ जून २०२६ या कालावधीत शहरातील विविध भागांमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांतर्गत नागरिकांना कचरा व्यवस्थापनातील नव्या तरतुदी, कचऱ्याचे स्त्रोतस्थानी वर्गीकरण आणि पर्यावरणपूरक सवयींचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणात आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील आठही विभाग कार्यालयांमधील स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि संबंधित यंत्रणा नागरिकांशी थेट संवाद साधून नियमांची माहिती देत आहेत.
या अभियानात ऐरोली, दिघा, सानपाडा, कोपरखैरणे, वाशी आणि सीबीडी बेलापूर परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये विशेष भेटी देण्यात आल्या. नागरिकांना घरातूनच कचऱ्याचे ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा आणि सॅनेटरी कचरा अशा चार स्वतंत्र प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, नव्या नियमांनुसार कचऱ्याचे वर्गीकरण केल्यानंतर तो कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्येही स्वतंत्रपणे देणे आवश्यक आहे. स्त्रोतस्थानी वर्गीकरण झालेला कचरा वेगवेगळ्या स्वरूपात संकलित करणे आणि त्याची स्वतंत्र वाहतूक करणे ही नव्या व्यवस्थेची महत्त्वाची अट आहे.
याशिवाय, दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले, हॉटेल्स, बाजारपेठा आणि मोठ्या आस्थापनांसाठी त्यांच्या परिसरातच ओल्या कचऱ्याची प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांबाबत सोसायटी पदाधिकारी, व्यवस्थापन समित्या आणि सदस्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
महापालिकेच्या वतीने एजी एन्व्हायरो आणि परिसर सखी या संस्थांच्या सहकार्याने शहरातील विविध भागांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत. सोसायट्यांबरोबरच शैक्षणिक संस्था, व्यावसायिक आस्थापना आणि सामाजिक संघटनांपर्यंतही या मोहिमेचा विस्तार करण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मते, शहरातील नागरिकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणीच योग्य वर्गीकरण केल्यास पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि सुरक्षित विल्हेवाट प्रक्रियेला गती मिळेल, तसेच शहर अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनण्यास मदत होईल.
महापालिका प्रशासनाने सर्व नागरिक, सोसायट्या, संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांना नव्या घनकचरा व्यवस्थापन नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, स्वच्छ आणि हरित नवी मुंबई घडविण्यासाठी सामूहिक सहभागाची गरज अधोरेखित केली आहे.
