लवकरच शैक्षणिक उपक्रम सुरू होणार
मुंबई, दि. १० : सांगली जिल्ह्यातील पेठ येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालयाच्या उर्वरित कामांना गती देऊन महाविद्यालय लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. राज्यातील अन्नप्रक्रिया, अन्नतंत्रज्ञान आणि कृषीपूरक उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी हे महाविद्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत पेठ येथील शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालयाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, उपसचिव प्रतिभा पाटील, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे अधिकारी, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, अधिष्ठाते, कुलसचिव तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, महाविद्यालयाची मुख्य प्रशासकीय इमारत, विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहे तसेच ग्रंथालयाची इमारत यांची स्थापत्य व विद्युत कामे पूर्णत्वास आली आहेत. आता शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या उर्वरित सुविधांची पूर्तता प्राधान्याने करण्यात यावी. त्याचबरोबर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदभरती प्रक्रिया वेगाने राबवून मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अन्नप्रक्रिया उद्योगांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन महाविद्यालयात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रयोगशाळा उभारण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. अन्न रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, अन्न सुरक्षा, अन्न पॅकेजिंग, गुणवत्ता नियंत्रण आणि मूल्यवर्धित अन्नपदार्थ निर्मिती यांसारख्या विषयांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याची प्रक्रिया गतीमान करण्यात यावी. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतही संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या.
बैठकीदरम्यान आमदार सदाभाऊ खोत यांनीही महाविद्यालयाच्या उर्वरित कामांकडे लक्ष वेधत प्रकल्प तातडीने पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली. सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अन्नतंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांवर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी हे महाविद्यालय लवकर सुरू होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यात कृषी आणि अन्नप्रक्रिया क्षेत्राला चालना देण्यासाठी विशेष शैक्षणिक पायाभूत सुविधा उभारण्यावर शासनाचा भर असून, पेठ येथील शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालय हा त्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन, अन्न प्रक्रिया उद्योगांचा विस्तार, संशोधनाला चालना आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे महाविद्यालय उपयुक्त ठरणार आहे.
महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर अन्नतंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, अन्न सुरक्षा आणि कृषी आधारित उद्योगांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होईल. त्यामुळे राज्यातील कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यासह रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. तसेच उर्वरित सर्व कामांचा नियमित आढावा घेऊन नियोजित कालावधीत महाविद्यालय कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
