रायगडातील महावितरणची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे ऊर्जा राज्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई, दि. ८ जून : रायगड जिल्ह्यातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर महावितरणची प्रलंबित आणि अपूर्ण कामे मान्सूनपूर्व कालावधीत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे–बोर्डीकर यांनी दिले आहेत. विशेषतः अलिबाग तालुक्यातील आवास ते रेवदंडा या किनारपट्टी भागात पर्यटनवाढीमुळे निर्माण झालेल्या अतिरिक्त वीजभाराचा विचार करून तेथे शंभर केव्ही क्षमतेचे पंचवीस नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या कार्यालयात आवास ते रेवदंडा किनारपट्टी परिसरातील वाढत्या वीज मागणी आणि वीजपुरवठा व्यवस्थेच्या आढाव्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड, अलिबाग मंडळाचे कार्यकारी अभियंता राजेश भगत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आकाश तायडे, कार्यकारी अभियंता अविनाश पगारे, सतीश धारप, वैकुंठ पाटील, संकेत जोशी, उदय काठे यांच्यासह महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री मेघना साकोरे–बोर्डीकर यांनी सांगितले की, अलिबाग तालुक्यातील आवास, किहीम, नागाव, रेवदंडा आणि लगतच्या किनारपट्टी भागांमध्ये गेल्या काही वर्षांत पर्यटन व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. स्थानिक नागरिकांनी पर्यटनपूरक व्यवसाय म्हणून गृह निवास, कॉटेज, निवास सुविधा आणि इतर सेवा उभारल्या असून त्यामुळे विजेची मागणी झपाट्याने वाढत आहे. वाढत्या ग्राहकसंख्येमुळे आणि व्यावसायिक वापरामुळे वीज वितरण यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याने आवश्यक पायाभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
मान्सून काळात वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना टाळण्यासाठी महावितरणने सर्व प्रलंबित दुरुस्ती आणि देखभाल कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश देताना त्यांनी वितरण वाहिन्या, रोहित्रे, खांब आणि उपकेंद्रांच्या स्थितीची विशेष तपासणी करण्यास सांगितले. पावसाळ्यात नागरिकांना अखंडित आणि सुरक्षित वीजपुरवठा मिळणे ही महावितरणची प्राथमिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत आवास ते रेवदंडा परिसरातील ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. यावेळी या भागात विशेष ग्राहक संपर्क शिबिरे आयोजित करून वीजबिल, नवीन जोडणी, कमी दाबाचा वीजपुरवठा, ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढ, मीटरविषयक समस्या आणि इतर तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्राहकांना कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी स्थानिक पातळीवर सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
ऊर्जा राज्यमंत्र्यांनी यावेळी केंद्र शासनाच्या पीएम सूर्य घर योजनेचाही विशेष उल्लेख केला. घरगुती सौरऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये नागरिकांना या योजनेची सविस्तर माहिती देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. सौरऊर्जेचा वापर वाढल्यास पारंपरिक वीजेवरील भार कमी होण्यास मदत होईल आणि ग्राहकांच्या वीजबिलातही बचत होईल, असे त्यांनी नमूद केले.
रायगड जिल्ह्यातील पर्यटनवाढ, नागरीकरण आणि औद्योगिक विकास लक्षात घेता आगामी काळात वीज पायाभूत सुविधांचे अधिक बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. वाढत्या मागणीला सामोरे जाण्यासाठी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर, नवीन वीजवाहिन्या आणि वितरण यंत्रणेच्या आधुनिकीकरणावर भर दिला जाणार आहे.
राज्यमंत्री मेघना साकोरे–बोर्डीकर यांनी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नागरिकाभिमुख दृष्टिकोन ठेवून काम करण्याचे आवाहन केले. ग्राहकांच्या समस्या तातडीने सोडविणे, अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करणे आणि मान्सूनपूर्व सर्व कामे वेळेत पूर्ण करणे यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना देणाऱ्या आवास ते रेवदंडा किनारपट्टी पट्ट्यात वीज पायाभूत सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली असून, आगामी पावसाळ्यात या भागातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना गतीने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
