विषारी दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले वैयक्तिक मत
भिवंडी, दि. २ : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भिवंडी दौऱ्यादरम्यान हातभट्टीच्या दारूबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. पुणे परिसरात विषारी दारू प्राशनामुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हातभट्टीची दारू अधिकृत करण्याचा विचार शासनाने करावा, असे मत व्यक्त केले. मात्र हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भिवंडी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले की, “हातावर पोट असणारा मजूर आणि कामगार वर्ग प्रामुख्याने स्वस्त असणारी हातभट्टीची दारू पितो. माझं वैयक्तिक मत असं आहे की, सरकारने हातभट्टीची दारू अधिकृत करावी. यामुळे ही दारू सर्वसामान्य मजूर वर्गाला परवडणाऱ्या दरात मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्यावर शासनाचे कायदेशीर नियंत्रण राहील, ज्यामुळे विषबाधेसारख्या घटना टळतील. यातून शासनाला मोठा महसूलही मिळेल आणि गोरगरीब मजुरांचे जीवही वाचतील.”
पुणे परिसरात विषारी दारू प्राशनामुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत मांडले. हातभट्टीच्या दारूचे उत्पादन आणि विक्री शासनाच्या नियंत्रणाखाली आल्यास अवैध दारू निर्मितीला आळा बसू शकतो, असेही त्यांनी सूचित केले. मात्र, हे आपले वैयक्तिक मत असून याबाबतचा अंतिम निर्णय शासनाने घ्यायचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात अलीकडेच विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यूंनंतर राज्यातील अन्न व औषध प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभागांनी मिथेनॉल व अन्य घातक रसायनांच्या अवैध साठ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. अशा पार्श्वभूमीवर आठवले यांच्या विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
