नवी मुंबईतील ५०४ धोकादायक इमारतींची यादी जाहीर; ‘सी-१’ प्रवर्गातील इमारती तात्काळ रिकाम्या करण्याचे आवाहन
नवी मुंबई, दि. २१ : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने मोठी कारवाई करत महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ५०४ धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. सन २०२६-२०२७ या वर्षासाठी करण्यात आलेल्या विभागनिहाय सर्वेक्षणानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २६४ अन्वये या इमारतींना धोकादायक घोषित करण्यात आले असून, विशेषतः ‘सी-१’ प्रवर्गातील इमारती तात्काळ रिकाम्या करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करण्याच्या ‘सी-१’ प्रवर्गात ५२ इमारतींचा समावेश आहे. तसेच इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती आवश्यक असलेल्या ‘सी-२ ए’ प्रवर्गात १०२ इमारती, इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करण्याच्या ‘सी-२ बी’ प्रवर्गात २९७ इमारती आणि किरकोळ दुरुस्ती आवश्यक असलेल्या ‘सी-३’ प्रवर्गात ५३ इमारतींचा समावेश करण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही यादी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील ‘विभाग’ विभागामध्ये ‘अतिक्रमण विभाग’ अंतर्गत ‘सामान्य माहिती’ या पर्यायात संबंधित यादी पाहता येणार आहे. विशेष म्हणजे ‘सी-१’ प्रवर्गातील ५२ अतिधोकादायक इमारतींची नावे नागरिकांना सहज ओळखता यावीत यासाठी ठळक अक्षरांत प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या दि. ५ नोव्हेंबर २०१५ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार संबंधित इमारतींमधील मालक आणि भोगवटादारांना लेखी नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये संबंधित इमारती निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले असून, तात्काळ वापर बंद करून इमारती रिकाम्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच धोकादायक इमारतींचे बांधकाम विनाविलंब पाडण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
विशेषतः ‘सी-१’ प्रवर्गातील इमारतींची वीज आणि पाणी जोडणी खंडित करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास राहिल्यास किंवा वापर सुरू ठेवल्यास इमारत कोसळून जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका असल्याने नागरिकांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेने जाहीर केलेल्या नोटिशीत संबंधित इमारतींमध्ये वास्तव्यास नागरिक राहतात की नाही, याचीही नोंद करण्यात आली आहे. ज्या इमारतींना संरचनात्मक दुरुस्तीची आवश्यकता आहे, त्या इमारतींच्या भोगवटाधारकांनी तातडीने दुरुस्ती करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही नमूद करण्यात आले आहे.
पावसाळ्यात जुन्या आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. मागील काही वर्षांत राज्यातील विविध शहरांमध्ये इमारती कोसळण्याच्या घटना घडल्या असून त्यात जीवितहानीही झाली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करत धोकादायक इमारतींचा वापर त्वरित बंद करण्यास सांगितले आहे.
महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, संबंधितांनी सूचना आणि नोटिशींचे पालन न केल्यास तसेच इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मालक अथवा भोगवटाधारकांची राहील. अशा परिस्थितीत महानगरपालिका जबाबदार राहणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्टपणे नमूद केले आहे.
Image Source – NMMC
