“बंगळुरु-मुंबई वंदे भारत स्लीपर सेवाही लवकरच सुरू होणार” – अश्विनी वैष्णव
बंगळुरू, दि. १८ : कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन महत्त्वाच्या राज्यांमधील रेल्वे संपर्क अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बंगळुरू-मुंबई एक्सप्रेस रेल्वेगाडीला काल रविवार दि. १८ मे रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला. या नव्या सेवेमुळे दोन्ही राज्यांतील प्रवाशांना अधिक सुलभ, वेगवान आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, व्यापारी, औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे.
यावेळी बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील नागरिकांची बंगळुरू-मुंबई दरम्यान अधिक सक्षम रेल्वे सेवेसाठीची दीर्घकालीन मागणी आता पूर्ण झाली आहे. या मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या आणि वाढती गरज लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळुरू आणि मुंबईदरम्यान लवकरच वंदे भारत स्लीपर रेल्वेसेवाही सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देताना त्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत कर्नाटक राज्यासाठी रेल्वे निधीत मोठी वाढ करण्यात आली आहे. या वाढीव निधीमुळे राज्यातील अनेक महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहेत. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत कर्नाटकमधील ६१ रेल्वे स्थानकांचा तब्बल २ हजार १६० कोटी रुपयांच्या खर्चातून पुनर्विकास सुरू असून त्यापैकी ९ स्थानकांची कामे पूर्णत्वास पोहोचली आहेत. बंगळुरू कॅन्टोन्मेंट स्थानकाच्या पुनर्विकासासाठी ४८५ कोटी रुपये तर यशवंतपूर स्थानकासाठी ३६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अश्विनी वैष्णव यांनी पुढे सांगितले की, सन २०१४ नंतर कर्नाटकात जवळपास १ हजार ७५० किलोमीटर नव्या रेल्वेमार्गांचे बांधकाम करण्यात आले आहे. हसन-मंगळुरू विभागातील गुंतागुंतीची रेल्वे कामे पूर्ण झाली असून सध्या त्या मार्गावर चाचण्या सुरू आहेत. बंगळुरू उपनगरीय रेल्वे प्रकल्पातील चारही मार्गिकांवरील कामे प्रगतीपथावर असून बैय्यनाहली-चिक्काबनावरा आणि हीलालगे-राजनुकुंटे विभागांतील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
केएसआर बंगळुरू-देवानहल्ली मार्गाला रेल्वे मंत्रालय आणि राज्य शासनाने संयुक्त मंजुरी दिली असून या मार्गाचे भू-तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. केंगरी-व्हाईटफील्ड मार्गालाही नुकतीच मंजुरी मिळाली असून लवकरच सर्वेक्षण सुरू होणार आहे. या उपनगरी रेल्वे जाळ्यामुळे विमानतळ, इलेक्ट्रॉनिक सिटी, मराठाहल्ली आणि हेब्बलसारखी महत्त्वाची केंद्रे एकमेकांशी जोडली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कर्नाटकात १२ वंदे भारत रेल्वेगाड्यांच्या जोड्या कार्यरत आहेत. बंगळुरू-मंगळुरू मार्गावर चाचण्या सुरू असून त्यानंतर मडगावपर्यंत किनारपट्टीवरील संपर्क अधिक सक्षम होणार आहे. बंगळुरूला हैदराबाद आणि चेन्नईशी जोडणाऱ्या बुलेट ट्रेन मार्गिकेलाही मंजुरी देण्यात आली असून, मुंबईसह प्रमुख शहरांना जोडणारे रेल्वे जाळे भविष्यात सुमारे ७ हजार किलोमीटरपर्यंत विस्तारण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्या हस्ते गाडी क्रमांक १६५५३/१६५५४ एसएमव्हीटी बंगळुरू-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानत सांगितले की, या रेल्वेसेवेचा लाभ हजारो प्रवाशांना होणार असून बंगळुरू-मुंबई मार्गावरील ताण कमी होण्यास मदत मिळेल.
व्ही. सोमण्णा यांनी सांगितले की, कर्नाटकातील १४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या १२ वंदे भारत रेल्वेगाड्या सध्या कार्यरत आहेत. थानिसंद्रा येथे २७० कोटी रुपयांच्या खर्चातून वंदे भारत स्लीपर गाड्यांच्या देखभालीसाठी आधुनिक डेपो उभारण्यात येणार आहे. तसेच एसएमव्हीटी बंगळुरू येथे ५२.७३ कोटी रुपयांच्या खर्चातून चेअर कार गाड्यांच्या देखभालीसाठी विशेष सुविधा उभारल्या जाणार आहेत.
रेल्वेची वहनक्षमता वाढवण्यासाठी बैय्यप्पनहल्ली-होसूर मार्गाचे १ हजार ११६ कोटी रुपये खर्चून दुपदरीकरण, बेट्टाहलसूरू-राजनुकुंटे मार्गाचे २४८ कोटी रुपयांत दुपदरीकरण आणि बंगळुरू परिसरातील रेल्वेमार्गांचे १ हजार ३४७ कोटी रुपयांच्या खर्चातून चौपदरीकरण सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
याशिवाय यशवंतपूर, केएसआर बंगळुरू, लोट्टेगोल्लहल्ली, बैय्यप्पनहल्ली, पेनुकोंडा, म्हैसूर आणि जोलारपेट्टाई या प्रमुख विभागांमध्ये ६ हजार ३९६ कोटी रुपयांच्या खर्चातून स्वयंचलित सिग्नल यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. सन २०१४ नंतर कर्नाटकात सुमारे ३ हजार ८४० किलोमीटर रेल्वेमार्गांचा विकास करण्यात आला असून ३ हजार ७४२ किलोमीटर मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे राज्य शंभर टक्के रेल्वे विद्युतीकरणाच्या अत्यंत जवळ पोहोचले असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला बंगळुरू मध्य मतदारसंघाचे खासदार पी. सी. मोहन, राज्यसभा सदस्य लहर सिंग सिरोया तसेच बंगळुरू दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या आणि रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
