ग्रामीण पशुवैद्यकीय सेवांना मिळणार मोठा दिलासा
मुंबई, दि. ८ : राज्यातील पशुसंवर्धन विभागातील दीर्घकाळ रिक्त असलेल्या अधिकारी पदांच्या भरती प्रक्रियेला अखेर वेग आला असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पशुधन विकास अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त पदांसाठी संगणकाधारित चाळणी परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ही महत्त्वाची भरती प्रक्रिया सुरू होत असल्याने ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट ‘अ’ अंतर्गत पशुधन विकास अधिकारी पदाच्या २ हजार ७९५ जागा तसेच सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन गट ‘अ’च्या ३०८ जागांसाठी ११ जून २०२६ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या केंद्रांवर आयोजित करण्यात आली असून सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत परीक्षा पार पडणार आहे.
आयोगाच्या माहितीनुसार, परीक्षेतील गुणांच्या आधारे स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यानंतर पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्यातील पशुसंवर्धन विभागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर अधिकारी पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवा, जनावरांचे आरोग्य तपासणी शिबिरे, लसीकरण मोहीमा आणि शेतकऱ्यांना तातडीची पशुवैद्यकीय मदत पुरविण्यात अडचणी निर्माण होत होत्या.
विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागात पशुधनावर आधारित अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता ही गंभीर समस्या बनली होती. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा करत भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची मागणी केली होती.
या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, पशुधन विकास अधिकारी गट ‘अ’च्या २ हजार ७९५ आणि सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन गट ‘अ’च्या ३०८ जागांसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय हा राज्यातील पशुसंवर्धन क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. या मोठ्या प्रमाणातील भरतीमुळे विभागाच्या कामकाजाला गती मिळेल आणि ग्रामीण भागातील शेतकरी तसेच त्यांच्या पशुधनाला अधिक सक्षम सेवा उपलब्ध होतील.
त्या पुढे म्हणाल्या की, राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुधन क्षेत्राचा मोठा वाटा असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी पशुसंवर्धन सेवा सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन अधिकारी रुजू झाल्यानंतर पशुधन आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबविता येतील तसेच विविध शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यास मदत होईल.
दरम्यान, या भरती प्रक्रियेमुळे पशुवैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या हजारो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून राज्यातील पशुसंवर्धन यंत्रणेला दीर्घकालीन बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देत अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहनही केले.
