‘सुगंधी अंगण अभियान’चा वाशीगावातून शुभारंभ; स्वच्छतेसोबत सुगंधी शहराकडे नवी मुंबईची वाटचाल
नवी मुंबई, दि. १७ : स्वच्छतेत देश-राज्यात अग्रस्थानी असलेल्या नवी मुंबई शहराने ‘सुगंधी शहर’ बनण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत ‘सुगंधी अंगण अभियान’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात वाशीगावातून करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते आणि उपमहापौर दशरथ भगत यांच्या संकल्पनेतून या अभियानाचा शुभारंभ झाला. ‘सुंदर माझे अंगण, सुगंधी माझे शहर’ हे अभियानाचे घोषवाक्य असून बोधचिन्हाचेही अनावरण करण्यात आले.
वाशीगावातील पारंपरिक गावदेवी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या अभियानाची सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक परंपरेला स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीची जोड देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान स्थानिक युवक-युवतींनी पारंपरिक कोळी वेशभूषेत सादरीकरण करून वातावरण उत्साही केले.
महापौर सुजाता पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत नवी मुंबईतील सर्व गावांमध्ये आणि शहरभर हे अभियान राबविण्याचा मानस व्यक्त केला. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये शहराचा दर्जा उंचावण्यासाठी या अभियानाचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांनी आपल्या घरासोबतच घरासमोरील परिसरही स्वच्छ ठेवत सुगंधी फुलझाडांची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास उपमहापौर दशरथ भगत, सभागृह नेते सागर नाईक, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, नगरसेवक निशांत भगत, प्रिती भगत, उपआयुक्त डॉ. अजय गडदे, कार्यकारी अभियंता पंढरीनाथ चौडे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजूसिंह चव्हाण, नरेश अंधेर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
उपमहापौर दशरथ भगत यांनी सांगितले की, स्वच्छतेसोबतच सौंदर्य आणि सुगंध यांचा समन्वय साधून शहराचा दर्जा उंचावण्याचा उद्देश या अभियानामागे आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांच्या सक्रिय सहभागातून तो व्यापक लोकचळवळ बनेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे, पडीक जागा आणि दुर्लक्षित भाग स्वच्छ करून त्यांचे सुशोभीकरण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
सभागृह नेते सागर नाईक यांनी या संकल्पनेमुळे स्वच्छता मोहिमेला नवे परिमाण मिळेल, असे नमूद केले. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी नवी मुंबईतील विविध उपक्रमांना मिळणाऱ्या प्रतिसादाचा उल्लेख करत या आगळ्यावेगळ्या अभियानाची दखल इतर शहरांमध्येही घेतली जाईल, असे सांगितले. नागरिक स्वयंस्फूर्तीने पुढे येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नगरसेवक निशांत भगत यांनी शहराच्या स्वच्छतेत नागरिकांचा मोठा वाटा असल्याचे सांगत आता ‘स्वच्छ’सोबत ‘सुगंधी’ शहर घडविण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारावी, असे आवाहन केले. वाशीगावातून सुरू झालेले हे अभियान व्यापक स्वरूप धारण करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या अभियानांतर्गत नागरिकांनी आपल्या घरासमोरील अंगण, इमारतींचे आवार तसेच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याबरोबरच त्या ठिकाणी सुगंधी फुलझाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले. फुटपाथ, चौक, वाचनालय परिसर किंवा बसथांबे यांसारख्या ठिकाणांचा ‘दत्तक’स्वरूपात स्वीकार करून त्यांचे सुशोभीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे.
नागरिकांच्या वतीने बोलताना जयदास सूर्यवंशी यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. वाशीगाव आणि नवी मुंबई शहर स्वच्छ व सुगंधी ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, असे सांगत त्यांनी उपस्थितांना अभियानात सहभागी होण्याची शपथ दिली.
